एक दिवस त्याने घाबरत घाबरत आपली अंताक्षरीवाली कन्सेप्ट चॅनलवाल्यांना सांगितली.

“बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी लेके प्रभू का नाम.”

नव्वदच्या दशकात म्हणजे रामायण, महाभारत संपल्यावर आणि केबीसी, क्योंकी सास भी बहु थी सुरु व्हायच्या आधी सगळ्यात सुपरहिट सिरीयल कोणती होती माहिती आहे ना? भारतातला पहिला रियालिटी गेम शो,

अन्नू कपूरची “अंताक्षरी.”

अंताक्षरी या खेळाची सुरवात कधी पासून झाली माहित नाही. अश्मयुगीन काळापासून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पूर्ण देशभर शाळां कॉलेजची ट्रीप असो वा फॅमिली गेटटुगेदरसारखे घरगुती कार्यक्रम असो सगळीकडे खेळला जाणारा फेव्हरेट पास्टटाईम म्हणजे अंताक्षरी असेल असा आमचा अंदाज आहे.

ट्रीप मध्ये जर अंताक्षरी खेळली नाही तर आपल्या इथे फाउल पकडला जातो. कधीही न गाण म्हणणारा बाथरूम सिंगर सुद्धा या अंताक्षरी मध्ये आपल्या भसाड्या आवाजात लिरिक्स चुकवून गायचा पण अंताक्षरी मध्ये सगळ माफ असायचं.

असा हा भारतीयांचा राष्ट्रीय पास्टटाईम खेळ अंताक्षरी. ऐंशीच्या दशकात गजेंद्रसिंह नावाच्या एका खटपट्या तरुणाच्या मनात अंताक्षरी पूर्ण देशभरात एवढा पॉप्युलर आहे तर टीव्हीवर सुद्धा खेळला जाऊ नये ही सुपीक कल्पना आली. 
त्याकाळात एकच चॅनल असायचं ते म्हणजे दूरदर्शन. तर हे दूरदर्शन होत सरकारी चॅनल आणि ते चालवायचे सरकारी अधिकारी. फायलीचा गठ्ठा घेऊन बसलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी गजेंद्र सिंहला आणि त्याच्या अंताक्षरीच्या आयडियाला बाहेरचा रस्ता दाखवला.

गजेंद्रसिंह बाहेर कुठे कुठे स्ट्रगल करत होता. त्याच काळात झीचं आगमन झालं. घराघरात केबल जोडले जाऊ लागले. गजेंद्र सिंह झी वर असिस्टंट प्रोड्युसर म्हणून नोकरीला लागला. एक दिवस त्याने घाबरत घाबरत आपली अंताक्षरीवाली कन्सेप्ट चॅनलवाल्यांना सांगितली.

काहीच वर्षापूर्वी आलेल्या मैने प्यार किया सिनेमात लक्ष्या सलमान आणि भाग्यश्रीनी खेळलेली अंताक्षरी गाजली होती. झी वाल्यांनी या कन्सेप्टमागचे पोटँशियल ओळखलं. गजेंद्रसिंहना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

१९९३ साली सुरु झालेल्या या सिरियलची मुख्य ओळख म्हणजे या सिरीयलचा होस्ट अन्नू कपूर हाच राहिला. दुर्गा जसराज, रेणुका शहाणे, राजेश्वरी सचदेव आणि पल्लवी जोशी असे अनेक सोबती आले आणि गेले पण अन्नू कपूर आहे तसाच राहिला.

अन्नू कपूर एनएसडी मधून पासआउट झालेला तयारीचा अभिनेता. तेजाब, रामलखन, चालबाज अशा सिनेमात छोटे रोल तो करायचा. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला हजारो गाणी पाठ होती, हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा तो चालता बोलता एनसायक्लोपिडिया होता. उर्दू शायरीवर त्याची पकड होती. या सगळ्या भांडवलावर त्याने अंताक्षरी सिरीयल मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला.

तीन टीम असायचे. दिवाने मस्ताने और परवाने. यांच्यात अंताक्षरी व्हायची. फक्त शेवटच्या अक्षरावरून पुढचं गाण म्हणणे इतपत ही स्पर्धा न ठेवता यात अनेक प्रयोग केले गेले. स्क्रीनवर व्हिज्युल दाखवून त्यावरून गाने ओळखणे असो किंवा एखाद्या हिरोच नाव ओळखून त्याच्यावर चित्रित झालेले गाणे म्हणणे. बरोबर गाण्याला १०० गुण चुकीच्या गाण्याला मायनस ५०. स्पर्धकांना जर एखाद गाण ओळखता आलं नाही तर प्रेक्षकांना सुद्धा चान्स.

पूर्ण सिरीयल मध्ये अन्नूची दादागिरी असायची. त्याचा निर्णय फायनल. स्पर्धकांना एन्करेज करून त्यांच्या सोबत गाणी गाऊन नाचून तो शो मध्ये गंमत आणायचा, त्याच्या सोबत असणारी दुसरी होस्ट नेहमी त्याच्या एनर्जी पुढे दबलेली असायची. त्यामुळेच पल्लवी जोशी वगळता कोणीही जास्त त्याच्यासोबत टिकले नाही. पल्लवी मात्र पाच वर्ष या शो मध्ये होती.

पल्लवी म्हणते तिच्या पहिल्या एपिसोडच्या शुटींग वेळी ती खूप नर्व्हस होती. जेव्हा तिला गाण म्हणायची वेळ आली तेव्हा कसं तरी तिने ते गायलं पण मेकप रूम मध्ये आल्यावर ती खूप रडली. पण हळूहळू सरावाने रियाझ करून मगच ती अन्नू कपूर सोबत स्टेजवर उभी राहू लागली आणि प्रेक्षकांनी देखील तिला अन्नूच्या साथीने स्वीकारले.

जवळपास १४ वर्षे हा शो झी टीव्हीवर गाजला. यापैकी अकरा बारा वर्षे अन्नू कपूर अंताक्षरीचा होस्ट राहिला. बारा वेगवेगळ्या देशात याचे शुटींग करण्यात आलं होत.

गजेंद्र सिंहनी या सिरीयल मध्ये अनेक प्रयोग केले. या प्रयोगांची कॉपी करून पुढे अंताक्षरी सारखे वेगवेगळ्या भाषांमध्ये शेकडो सिरीयल आले. गजेन्द्रसिंहना नाकारणाऱ्या दूरदर्शनने देखील या सिरियलची कॉपी केली. झी नंतर हा शो वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा दाखवला गेला.

आज रियालिटी शो म्हटल की त्याच्या दिखावे पणाला आपण नाके मुरडतो. पण नव्वदीतल्या अंताक्षरीमध्ये मात्र एक प्रकारची निरागसता होती. तुमच्या आमच्यासारखी साधी माणस स्पर्धेत असायची. गाणी चुकल्यावर जीभ चावणारी, गाताना एकच असलेला माईक आपल्या साईडला ओढणारे दिवाने परवाने मस्ताने. आणि अन्नू कपूरच्या बुलंद आवाजातल्या देशभक्तीपर गीतावर नाचणारे स्टुडीओतले प्रेक्षक. हे दृश्य आजही घर करून आहे.

आपली संस्कृती, परंपरा आपली गाणी यांचा अनोखा मिलाफ करणारी घराघरात अख्खं कुटुंब एकत्र बसून एन्जॉय केलेली अंताक्षरी विसरावं म्ह्टल तरी विसरता येत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.