ढोलगरवाडीच्या या शाळेत १९६६ सालापासून चक्क सापांना पाळल जातं
कोल्हापूर जिल्ह्यातल्या ढोलगरवाडी गावात असणाऱ्या मामासाहेब लाड विद्यालयाची ओळख देशातील पहिली सर्पशाळा अशी आहे. इथे सापांना पाळल जात आणि त्यांच्याबद्दल माहितीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचवली जाते.
गेल्या 54 वर्षांपासून ही शाळा तालुका, जिल्हा आणि बाहेरून येणाऱ्या कित्येकांच्या मनातील सापांविषयी असणारे गैरसमज, अंधश्रद्धा नाहीशी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतेय.
शाळा म्हटलं की फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान न्हवे तर त्यापलीकडे जाऊनही काहीतरी शिकता आलं पाहिजेत हा हेतू जोपासत सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर सर यांनी या शाळेचा पाया रचला.
वन्यप्राणी संरक्षण कायदा 1972 साली लागू झाला मात्र त्याआधीच 1966 साली टक्केकर सरांनी हे सर्पोद्यान सुरू केलं जे कुठल्याही माणसाला सहजासहजी शक्य न्हवत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे त्याला मारून काहीही मिळत नाही त्याला जपल पाहिजेत ही टॅगलाईन होती सरांची..
1966 पासून आजपर्यंत या शाळेत चक्क सापांना पाळल जात.
त्यांचं संगोपन करत त्यांच्याविषयीची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचा वसा आजही सूरु आहे तो फक्त बाबुराव टक्केकर सरांच्यामुळे. दरवर्षी नागपंचमीला हजारोंच्या गर्दीने येणारे लोक यंदा दिसत नाहीयेत त्याच कारण फक्त एकच ते म्हणजे कोरोना.
गेल्यावर्षी सबंध जिल्हा महापुरात अडकला तेंव्हाही गर्दी कमीच होती आणि यंदा लागोपाठ कोरोनाच संकट आल. कोरोनाचा वाढता धोका पाहून लॉकडाऊन पाठोपाठ लॉकडाऊन सुरू आहे. पण परंपरेनुसार सुरू असलेल्या ढोलगरवाडीच्या सर्पप्रदर्शनाला यंदा खंड पडला.
कोरोनाला थांबवायचं असेल तर गर्दी होता कामा नये म्हणूनच प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा हे प्रदर्शन रद्द करण्यात आलंय…
कोणत्याही शासकीय अनुदानाविना ही सर्पशाळा आजही सुरू आहे. ग्रामीण भागातील एकमेव सर्पोद्यान अशी ओळख असूनही ते अबाधित राहावं यासाठी लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत काहीही प्रयत्न केले नाहीत.
अंधश्रद्धेच्या विरोधात नेहमी बंड पुकारणाऱ्या बाबुराव टक्केकर सरांनी हयात असेपर्यंत या शाळेला जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. पण आता अशीच परिस्थिती येत्या काळात राहिली तर हे सगळं काही बंद कराव लागेल की काय अशी भीती वाटते. या शाळेच्या वेगळेपणामुळे जिल्ह्याच्या गळ्यातील ताईत असणारी शाळा अस जरी म्हटलं तरी वावग ठरणार नाही पण तरीसुद्धा लोकप्रतिनिधी इकडे फिरकतसुद्धा नाहीत.
वनविभाग आणि नॅशनल झु अथोरिटीची परवानगी असूनसुद्धा या शाळेच्या पदरात विशेष अस काहीच नाही मिळालं. 8 वी ते 10 पर्यंत या शाळेत मला शिकता आलं, पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त काहीतरी घेता आल ते टक्केकर सरांच्या मेहनतीमुळेच. इथली मूल सगळ्या प्रकारचे साप ओळखू शकतात, विषारी किंवा बिनविषारी यातला फरक सांगू शकतात.
योग्य प्रशिक्षण घेऊन कित्येकजण सर्पमित्र बनलेत असा या शाळेचा इतिहास आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना या शाळेन बरच ज्ञान दिलंय. पण आता शाळेचा प्रवास कठीण पद्धतीने सुरुय. आज नागपंचमी आहे शाळेच्या मागचा इतिहास भरभरून डोळ्यासमोरून जात असताना टक्केकर सरांच्या मेहनतीतून साकार झालेला हा ज्ञानाचा डोंगर अबाधित राहायला हवा अशी मनापासून इच्छा आहे…
फोटोत बाबुराव टक्केकर सर आहेत. व्हिडिओत असणाऱ्या मोठ्या टाक्या या विविध प्रजातीचे साप ठेवण्यासाठी आहेत. आजपर्यंत याच टाक्यांमध्ये सापांच संगोपन होत आलंय. सध्याच्या परिस्थितीत जास्त सापांची देखभाल करणं शक्य नसल्याने कमी साप ठेवण्यात आलेत. मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी ढोलगरवाडी
लेखक : कृष्णा सोनारवाडकर