हिंदुस्तानातला सर्वात पहिला सुपरफ्लॉप सिनेमा होता, “शहेनशहा अकबर”.

भारतात दादासाहेब फाळकेनी राजा हरीश्चंद्र हा मूकपट बनवून सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. काही वर्षांनी सिनेमा बोलू लागला. पल्लेदार संवाद असलेले ऐतिहासिक सिनेमे बनवण्याची लाट आली होती. रामायण महाभारत पासून ते संत तुकाराम,महाराणा प्रताप अशा अनेक विषयावर सिनेमे बनत होते. गाजत देखील होते.

अशातच १९४१ साली एक सिनेमा आला नाव होत,

“शहेनशहा अकबर”.

कमल रॉय पिक्चर्सनी भव्य हिंदी सिनेमा बनवला होता. जी.एल.सेठी या सिनेमाचे दिग्दर्शक होते. त्यांनी सिनेमाबनवताना कोणतीही तडजोड केली नव्हती. त्या काळाचचे सिनेमा बनवण्याच्या खर्चाचे सगळे रेकॉर्ड  शहेनशहा अकबर या सिनेमाने मोडले. रिलीज होण्याच्या आधीच या सिनेमाची चर्चा होती.

मुंबईला रॉयल ओपेरा हाउसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा थिएटरच्या बाहेर तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी सांगत होती की सिनेमा सुपरहिट होणार. पण या गर्दीच्या मागे आणखी एक कारण होते. शहेनशहा अकबर च्या उद्घाटनाला ब्रिटीश गव्हर्नर येणार होते.

पारतंत्र्याचा काळ होता. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांचा गव्हर्नर म्हणजे राज्यातले सर्वोच्च पद. खुद्द गव्हर्नर येतोय म्हटल्यावर शहेनशहा अकबर बनवनाऱ्यानी किती वजन या सिनेमाच्या मागे लावले होते याचा अंदाज यावा. 

ठरल्याप्रमाणे गव्हर्नर सहपत्नीक रॉयल ऑपेरा थिएटरमध्ये आले. सिनेमाचा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. गव्हर्नर आला तसा निघून गेला. पण त्या पहिल्या शो नंतर एकएक शो गणिक सिनेमाची गर्दी कमीकमी होत गेली. सिनेमा अतिशय रटाळवाना बनला होता.

तरी मुंबईचं पब्लिक सुसंस्कृत होते. काही दिवस सिनेमा थिएटरमध्ये तग धरून होता मग काही दिवसांनी प्रेक्षकांच्या अभावी तिथून उतरवण्यात आला. हा सिनेमा लाहोरमध्ये सुद्धा रिलीज करण्यात आला होता. तिथलं पब्लिक मात्र खूप वांड होत.

लाहोरच्या रीजंट थिएटरमध्ये सुरवातीला तर खूप गर्दी झाली. पण पहिल्याच शोच्या इंटरव्हलपर्यंत प्रेक्षक वैतागले. नुसता वैतागले नाहीत तर जोरजोरात शिवीगाळ सुरु झाली. काही प्रेक्षकांनी आपली नापसंती जाहीर करायला खुर्च्यांची मोडतोड सुरु केली. हा हा म्हणता म्हणता पूर्ण सिनेमाघरात ही मोडतोड झाली.

जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज करून प्रेक्षकांना घालवलं. थिएटर रिकाम झालं तेव्हा तिथ फक्त तीन खुर्च्या शाबूत उरल्या होत्या. लाहोरच्या आडदांड पब्लिकनी खरोखरच थिएटर रिकाम करून टाकलं होत. परत कधीच तो सिनेमा कुठल्याच थिएटरमध्ये दाखवला गेला नाही.

लाहोरच्या एका वृत्तपत्रात या सिनेमाच्या खेळादरम्यान झालेल्या मोडतोडीची बातमी छापण्यात आली. आणि  त्यासोबत एक व्यंगचित्र छापण्यात आल. त्याचित्राखाली लिहिण्यात आलं होत.

“थ्री चेअर्स फोर शहेनशहा अकबर”

भारतातला पहिला सुपरफ्लॉप म्हणून शहेनशहा अकबर या सिनेमाला ओळखलं जात. या चित्रपटाचा हिरो कोण होता माहित आहे का? त्याचं नाव होत एस.कुमार. आणि हिरोईन होती पुढे शामची आईमुळे फेमस झालेल्या वनमाला बाई. 

तर एस. कुमार हे या सिनेमात सम्राट अकबर झाले होते. पण काळाचा महिमा  बघा पुढे काही वर्षांनी आलेल्या अकबर सलीम अनारकली या विषयावर बनलेल्या भारताच्या सर्वात मोठा सुपरहिट सिनेमा मुघल ए आझम मध्ये त्यांनी शिल्पकाराची छोटी भूमिका केली. 

हा एस कुमारसुद्धा जिद्दी कलाकार होता. भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर बरेचसे मुस्लीम कलाकार पाकिस्तानला गेले. एस.कुमार सुद्धा पाकिस्तानला जाणार होते पण मुघले आझम चं शुटींग सुरु झालं आणि ते खूप वर्ष लांबलं. एस कुमारला आपल्या वरचा डाग मिटवून टाकायचा होता की काय माहित नाही पण तो शुटींग संपल्यावरच पाकिस्तानला गेला. 

मुघले आझम जेव्हा रिलीज झाला तेव्हा मात्र तो पाकिस्तानहून खास या सिनेमाच्या उद्घाटनाच्या शोसाठी आला. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.