भारताच्या नीरज चोप्रान गोल्ड जिंकलंय खरं जल्लोष तिकडं जर्मनीतल्या एका गावात सुरूय.

आपला भारत तसा क्रिकेट वेड्यांचा देश. पण ऑलिम्पिक म्हणलं की कसं सगळ्यांच्याच अंगात जोश येतो. तेव्हा मात्र आपण सगळ्या खेळांना सर्वधर्म समभावाने वागवतो. आणि त्यातल्या त्यात एखाद मेडल जिंकलं की, मग विषयच संपला. नुसता जल्लोष. आता टोकियो ऑलिम्पिक झालं. यात आपल्या नीरज चोपडान भालाफेकीत गोल्ड जिंकलं आणि जल्लोष सुरु झाला.

अगदी त्या दिवसापासून ते आजअखेर संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. नीरजच्या गावापासून ते राजपुताना रायफल्सपर्यंत सगळीकडंच हे ऐतिहासिक यश साजरे करण्यात येतंय. नीरजला तर  मायदेशी आल्यापासून वेळच नाहीये. त्याच्या सन्मानार्थ विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

पण नीरजच्या या यशाचा जल्लोष फक्त भारतापुरताच मर्यादित राहिला नाही, तर तो जल्लोष जर्मनीतील एका छोट्या गावातही सुरूय.

जर्मनीच्या बार्टोनिट्झ गावात. आणि ओबर्सक्लेटनबाक गावात.

खरं तर नीरजचे प्रशिक्षक आहेत जर्मनीचे रहिवासी. नाव त्यांचं डॉ. क्लॉस बार्टोनिट्झ. नीरजच्या यशात यांनी महत्वाची भूमिका बजावली. ऑलिम्पिकनंतर जेव्हा क्लॉस जर्मनीत त्यांच्या गावी पोहोचले, तेव्हा त्यांना नीरजला सुवर्णपदक मिळालं म्हणून तिथं जल्लोष सुरु होता.

हे बघून खुद्द डॉ. क्लॉस बार्टोनिट्झ यांना आश्चर्य वाटलं. क्लॉस यांचं हे १३० घरांचं गाव पूर्व जर्मनीत आहे. अगदी घनदाट जंगलांच्या मध्यभागी. क्लॉस आता तिथल्या लोकांसाठी एक सेलिब्रिटीच बनलेत.

त्यांच्या संपूर्ण गावाने नीरजचा अंतिम सामना टीव्हीवर पाहिला आणि सगळे गाववाले डॉक्टरांवर फिदाच झाले. 

आता ही बातमी लगोलग इंडियन एक्सप्रेसच्या एका पत्रकाराला समजली त्याने लगेचच क्लॉस यांना फोन लावला, त्यावर क्लॉस म्हणतात,

माझ्या गावातील लोक साधीभोळी माणसं आहेत, त्यांचा खेळाशी काही संबंध नाही. आता एवढं असूनही ते नीरजच्या कामगिरीने प्रभावित झाले. मला आमच्या देशातल्याच बऱ्याच खेळाडूंचे फोन आले. एका पोरानं कसा काय इतिहास घडवला, हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक होते.

क्लॉस डॉक्टर एवढे फेमस झालेत की, नीरजचे माजी प्रशिक्षक उर्व्हे हॉन यांनी पण क्लॉस यांचं कौतुक केलयं. 

खरं तर नीरजच्या माजी प्रशिक्षकांना म्हणजेच उर्व्हे हॉन यांना पण नीरजच्या कामगिरीमुळे आश्चर्यच वाटलंय. गोल्ड भारतासारख्या देशात किती महत्त्वाचं आहे, हे त्यांना माहित आहे. ते यावर म्हणतात की,

माझं फेसबुक अकाउंट नुसतं सेलिब्रेशनच्या व्हिडिओंनी, फोटोंनी भरलंय. मला खात्री आहे की, नीरजचा प्रभाव इतर खेळाडूंवरही दिसून येईल. नीरजकडे कोणताही प्रशिक्षक नसल्याचे मला माहित होते, त्यामुळे मी क्लॉसना सांगितलं होत. पण त्याने खरंच खूप चांगल काम केलय. नीरजच्या टेक्निक मध्ये खूपच सुधारणा झाली. त्याने जिंकलेले गोल्ड हा त्याचा पुरावा आहे.

झालं…हे खरचं लै भारी होत. असच भारताच्या पोराठोरांनी गोल्ड आणावं म्हणजे जल्लोष कसा ओ  सगळ्या जगभर होईल.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.