किनारपट्टीवर राहणाऱ्या मुस्लीमांमुळे भारताची समुद्री व्यापारात भरभराट झाली होती..

एक लय इंटरेस्टिंग फॅक्ट आहे.

भारतात पहिल्यांदा इस्लाम मुळात मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांच्या मार्फत आलाच नव्हता. आणि त्याचाही पुढं जाऊन अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारतातील इस्लाम जवळजवळ इस्लामइतकाच जुना आहे. 

प्रेषित मुहम्मद यांच्या हयातीतच  इ.स. ६२९ मध्ये  केरळमधील कोडुंगल्लूर इथं व्यापाऱ्यांनी चेरामन जुमा मशीद बांधली होती. 

ही संपूर्ण दक्षिण आशियातील सर्वात जुनी मशीद  मानली जाते. या मशिदीचं ऐतिहासिक महत्व नरेंद्र मोदी सरकारनं पण मान्य  केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये सौदी अरेबियाला याच मशिदीची सोन्याची प्रतिकृती भेट केली होती. 

तर या दोन फॅक्टस मधून एक सरळ कन्क्लुजन निघतं ते म्हणजे व्यापाऱ्यांमुळं इस्लाम धर्म पहिल्यांदा भारतात आला. मान्सूनच्या वाऱ्यांनी २००० वर्षांहून अधिक काळ कन्व्हेयर बेल्ट सारखं काम करत पूर्व आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये माल आणि लोकांची वाहतूक करण्यास मदत केली एवढं तर तुम्हाला पण माहित असेलच. 

त्यामुळे हे व्यापारी जरवर्षी मान्सून येईपर्यंत थांबायचे आणि मग समुद्रातून भारतीय किनारपट्टीकडे वारं वाहू लागलं का मग आपल्या शिडाच्या नौका समुद्रात उतरवून भारताकडे प्रस्थान करायचे.

सुरवातीला मान्सून रूटने भारताशी व्यापार करणाऱ्यांमध्ये ख्रिश्चन आणि पारशी व्यापाऱ्यांचा समावेश असायचा. मात्र ७ व्या शतकानंतर मुस्लिम अरब व्यापाऱ्यांची संख्या या मार्गावर वाढत गेली. हे मुस्लीम व्यापारी भारताच्या जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण होते कारण त्यांच्या कौटुंबिक आणि भाषिक संबंधांमुळे त्यांना पश्चिम आशियाई बाजारपेठेतील माहिती होती. 

त्याचबरोबर त्यांच्याकडे भांडवल देखील बऱ्यापैकी असायचं. त्यामुळं भारतातले कारागीर आणि त्यांची उत्पादनं यांना एक नवीन मार्केट मिळालं. अनेकदा हे व्यापारी स्वतःचा एक गिल्ड म्हणजेच ग्रुप बनवायचे. गिल्डमधे भारतीय आणि पश्चिम आशियाई ज्यू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी यांचाही समावेश असायचा. 

यापेकीच एक असलेलं अंजुवन्नम भारताला आफ्रो-युरेशियामधील नेटवर्कशी जोडण्यासाठी विशेषतः महत्वाचे होते. 

हे व्यापारी फक्त पैसा हे एव्हढच डोळ्यापुढं ठेवून आपलं काम करीत. लोकल लोकांशी मिळून मिसळून वागणे, लोकल राजाशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हा त्यांचा अलिखित नियम होता.  

हिंदी महासागराच्या इतिहासावर काम करणाऱ्या एलिझाबेथ लॅम्बोर्नइ सांगतात, 

”इसवी सन ९ व्या आणि १० व्या शतकात आपल्या दख्खनच्या बलाढ्य राष्ट्रकूट सम्राटांनी अरब व्यापार्‍यांचा पर्सनल लॉ हॅन्डल करण्यासाठी मुस्लिम अधिकार्‍यांची व्यवस्था केली होती आणि सध्याच्या गुजरातमधील संजान बंदरावर त्यांनी मुस्लिम गव्हर्नर देखील नेमले होते.”

राज्याचा अर्थव्यस्थेत असलेलं मुस्लिम व्यापारांचं योगदान लक्षात घेऊन त्यांची एवढी खातिरदारी केली जायची बरं हे फक्त भारतातच होत होतं असं नव्हतं. समकालीन आग्नेय आशियातले राजे पण भारतीय ब्राह्मण विद्वानांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठी आमंत्रित करत होते. 

किनाऱ्यावर आलेले व्यापारी स्थानिक समुदायांमध्ये मिक्स होऊन गेले. मग लोकल तामिळ मुस्लिम, मल्याळी मुस्लिम असा समुदाय तयार झाला. 

आपल्या कोकण किनार पट्टीवर राहणाऱ्या मराठी मुस्लिम समुदायतील अनेक जमाती चालुक्य आणि राष्ट्रकूट राजवटींच्या काळात सातव्या ते आठव्या शतकादरम्यान कोकण किनारपट्टीवर आलेल्या अरब मुस्लिम व्यापाऱ्यांकडे वंशज म्हणून पाहतात.

याच किनारपट्टीवर राहणाऱ्या मुस्लिम व्यापार्‍यांनी भारतात खूप समृद्धी आणली.

१४व्या शतकातील अरब लेखक इब्न फदबुल्ला उल-ओमारी यांनी लिहिले होते की भारताचा समुद्र म्हणजे मोती आणि झाडं म्हणजे अत्तरं होती.

१२ व्या शतकापर्यंत हे मुस्लिम व्यापारी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर देखील पसरले होते. प्रोफेसर वाय. सुब्बारायुलु ‘साऊथ इंडिया अंडर द चोलाज’ मध्ये लिहितात की ‘सन ऑफ द सिटी’ ही पदवी धारण करणार्‍या असवू (असफ) नावाच्या श्रीलंकन ​​मुस्लिम व्यापाऱ्याला ऐनुरुवर व्यापारी महामंडळाने ऐनुत्तुवा नावाच्या मशिदीला अनुदान देण्याचे काम सोपवले होते. म्हणजेच इथल्या लोकजीवनात, संस्कृतीत ते बऱ्यापैकी मिसळून गेले होते.

डच आणि इंग्रजांचं कोरोमंडल किंवा पूर्व तामिळनाडू किनारपट्टीवर आगमन होण्यापूर्वी  सागरी व्यापार पूर्णपणे मुस्लिमांच्या हातात होता.

याचकाळात आताच्या तामिळनाडू आणि केरळमधील मूळ हिंदू शासकांनी अरब-मुस्लिमांना स्थायिक होण्यासाठी आणि व्यापार करण्यास प्रोत्साहित केलं होतं.

त्यांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील व्यापार मुक्त ठेवला होता. कोणालाही व्यापारात एंट्री करता येत होती.

पण एकदा का धूर्त, निर्दयी आणि उत्तम संघटित युरोपियन व्यापारी रिंगणात उतरले तेव्हा या मुस्लिम व्यापाऱ्यांचं वर्चस्व झपाट्याने कमी होत गेलं.

 त्यात आता परिस्थिती बदलली होती. व्यापार आता राजकीय आणि लष्करी सामर्थ्याशी जोडून पहिला जात होता. इथंच हे राजकारणापासून लांब राहणारे मुस्लिम व्यापारी मागं पडले.

पोर्तुगीजांनी लष्करी सामर्थ्य आणि राजकीय दबदबा यावर आधारित मक्तेदारी असलेली व्यापारी व्यवस्था सुरू केली. 

तसेच किनारी भागातील राजांना पोर्तुगीजांनी या मुस्लिम व्यापाऱ्यांपेक्षा चांगल्या स्कीम टाकल्या होत्या. ज्यामध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांबरोबरच मौल्यवान वस्तूंचा देखील समावेश होता. त्यामुळं आता या राजांनी पण आपला राजश्रय युरोपियांकडे फिरवला.

यामुळं लवकरच पोर्तुगीजांनी समुद्री व्यापारात मोनोपॉली प्रस्तापित केली. 

याचबरोबर या संपूर्ण प्रदेशातील व्यापार नियंत्रित करण्यासाठी पोर्तुगीजांनी पर्शियन आखातातील होर्मुझ आणि दक्षिण पूर्व आशियातील मलाक्का या प्रमुख ठिकाणांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. श्रीलंकेवर पण त्यांनी कब्जा केला.

त्यात पोर्तुगीजांनी आणलेल्या कार्टाझ सिस्टिम तर या व्यापाऱ्यांचा पूर्ण बाजारच उठवला. या सिस्टिममध्ये पोर्तुगीज कार्टाझ (दस्तऐवज किंवा परवानगी) असलेली जहाजंच या प्रदेशातील बंदरांमध्ये व्यापार करू शकत होती.

आणि शेकडो वर्षे समुद्री व्यापारावर दबदबा राखून असलेली हे मुस्लिम व्यापारी किनारपट्टीवर लागले ते कायमचेच. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.