भारताच्या दुसऱ्या महिला डॉक्टर कृष्णाबाईंकडे कोल्हापूरचं अख्खं हॉस्पिटल सोपवलं…

आनंदीबाई जोशी यांच्यानंतर दुसऱ्या स्त्री डॉक्टर होत्या कृष्णाबाई केळवकर.

अफाट बुध्दीमत्तेच्या जोरावर आणि शाहू महाराजांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याने त्यांनी हे यश संपादन केलं. पण या प्रवासात त्यांच्या वाटेला निराशा, अपेक्षाभंग, दुःख अशा सगळ्या अडचणी आल्या मात्र या सगळ्यांवर मात करत कृष्णाबाई केळवकर या डॉक्टर झाल्या त्यांची हि संघर्षगाथा.

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात डॉ. कृष्णाजी दादाजी आणि त्यांच्या पत्नी रखमाबाई वसईहुन कोल्हापुरात आले आणि कायमचेच इथले कोल्हापुरकर झाले. कृष्णाजी दादाजी हे क्रांतिकारक विचारसरणीचे होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला रखमाबाई यांना शिक्षित केले. त्यांची शिफारस पुढे कोल्हापुरात आनंदीबाई महाराणींना शिकवण्यासाठी झाली.

कृष्णाजी आणि रखमाबाई या दाम्पत्याच्या पोटी आलेली सगळी मुलं कर्तृत्ववान निघाली.द्वारकाबाई, यमुनाबाई, अहिल्याबाई आणि कृष्णाबाई या चार मुली तर माधवराव, शामराव व यशवंतराव हि तीन मुले आपापल्या क्षेत्रात चमकली. पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत या दाम्पत्यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी धाडलं.

या भावंडात कृष्णाबाई या हुशार होत्या. त्यांचा जन्म १८७९ शाळांचा. वयाच्या आठव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्या जाऊ लागल्या. इथे त्यांना न्या. रानड्यांच्या पत्नी रमाबाईंचे त्यांना विशेष प्रेम लाभले. रखमाबाईंना आपल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च झेपत नसे तरी काबाडकष्ट करून त्या आपल्या मुलींना शिकवण्याची धडपड करत असे.

कृष्णाबाई बुद्धिमान आणि नम्र स्वभावाच्या होत्या. सतत नवीन काहीतरी करायची आणि शिकायची त्यांची धडपड असे. शाळेत लोकप्रिय असल्याने त्यांनी लहान वयातच बालसमाजाची स्थापना केली. पुढे या बालसमाजाचे रूपांतर वनीतासमाजमध्ये झाले.

मॅट्रिकची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी  त्यांनी फर्ग्युसन कॉलेज निवडले. पण मुलींना महाविद्यालयात प्रवेश देण्यावरून सनातन संचालक आणि महाविद्यालयाच्या मजाही प्राध्यपकांनी याला कडाऊन विरोध केला. मुलांच्या कॉलेजात मुली शिकू लागल्या तर त्या बिघडतील , बेताल होतील आणि कॉलेजचं नाव खराब करतील असं त्यांना वाटत होतं.

गोपालकृष्ण गोखले यांनी पुष्कळ प्रयत्न करून आगरकरांच्या मदतीने कृष्णाबाई आणि गोदूबाई देशपांडे यांना फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या विद्यार्थिनी होण्याचा मान मिळाला. तिथेही त्यांना बराच संघर्ष करावा लागला. गोखले आणि आगरकरांनी त्यांची यथोचित मदत केली आणि त्यांना पुढे शिकण्यास प्रोत्साहित केले.

१८९५च्या इंटर आर्ट्सच्या परीक्षेत कृष्णाबाई पहिल्या आल्या आणि कोल्हापुरात परतल्या. वयाच्या सोळाव्या वर्षी कृष्णाबाईंना शाहू महाराजांनी राष्ट्रीय महासभेसाठी करवीर संस्थानाचे प्रतिनिधी म्हणून निवड केली. शाहू महाराजांनी स्त्रियांना राजकीय प्रवाहात आणण्याचा नवीन उपक्रम राबवला.

आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे कृष्णाबाई याना डॉक्टर बनायचे होते.आर्थिक अडचण असल्याचे शाहू महाराजांना कळले आणि त्यांनी कृष्णाबाईंच्या पुढच्या शिक्षणासाठी दरबाराची खास शिष्यवृत्ती देऊ केली आणि ग्रँट मेडिकल कॉलेजात त्यांना शिकवण्याची तरतूद केली.

कृष्णाबाईंवर रानडे, गोखले, आगरकर, कर्वे यांच्या पुरोगामी विचारांचा संस्कार झाला आणि त्या ग्रांट मेडिकल कॉलेजातही बुद्धिमत्तेने चमकू लागल्या.१९०१ साली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्या शाहू महाराजांच्या करवीर नगरीत परतल्या. कृष्णाबाई डॉक्टर होण्याच्या चौदा वर्षे अगोदरपासून शाहू महाराज स्त्री डॉक्टरच्या शोधात होते.

शाहू महाराजांनी आनंदीबाई जोशी यांची परदेशातून येण्याची सगळी आर्थिक अडचण मिटवली आणि त्यांना अट घातली कि अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये स्त्री डॉक्टर म्हणून काम पहा. पण दुर्दैवाने अल्पकाळातच आनंदीबाईंचे निधन झाले. महाराजांचे स्वप्न अपुरे राहिले. पुढे आनंदीबाईंच्या जागी कृष्णाबाई यांची नेमणूक झाली.

संपूर्ण हॉस्पिटल कृष्णाबाई सांभाळत होत्या, तिथल्या पुरुषांना वाटे कि बाई आहे म्हणून हि परीक्षा पास झाली, अनुभव कुठून येणार ? पण कृष्णाबाई या महत्वाकांक्षी होत्या, मेहनतीने त्यांनी सगळं शिकून घेतलं आणि बोलणाऱ्यांची तोंडं गप्प केली.

उच्च शिक्षण घेण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यांच्या डोळ्यांसमोर आनंदीबाईंच्या आदर्श होता. त्यावेळी इंग्लंडला जाऊन एफआरसीएस करण्याचे ठरविले. इंग्लंडमध्ये हिंदी मुलींसाठी असणारी स्कॉलरशिप त्यांनी मिळवली. त्यावेळी इंग्लंडला जाण्यासाठी दोन महिने बोटीने प्रवास करावा लागत असे.

इंग्लंडची स्कॉलरशिप त्यांनी मिळवली खरी पण ती प्राप्त करण्यासाठी जाणार कस ? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यांची हि अडचण शाहू महाराजांनी ओळखली आणि कोल्हापूर दरबाराकडून इंग्लंडला जाण्याची संमती आणि शिक्षणाच्या कालावधीत पूर्ण पगार देण्याचे ठरवले. शाहू महाराजांचा निरोप घेऊन त्या एकट्याच बोटीने नऊवारी साडी नेसून आणि कपाळाला मोठं कुंकू लावून निघाल्या.

ज्या स्कॉलरशिपच्या जीवावर कृष्णाबाई इंग्लंडला आल्या तिथे मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा पडली, वेळेत न पोहचल्याने त्यांची स्कॉलरशीप चुकली होती. तिथे अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी मिडवायफरिचा डिप्लोमा केला आणि मायदेशी परतल्या.

कोल्हापुरात आल्यावर त्यांनी अल्बर्ट मेमोरियल हॉस्पिटलची सूत्रे पुन्हा आपल्या हातात घेतली. त्यांच्यामुळे स्त्री रुग्णांना आधार वाटू लागला. त्यांनी रोगाविषयी सांगितलेले निदान अचूक असायचे, त्याचा अनेक स्त्रियांना फायदा होऊ लागला.

शाहू महाराज कृष्णाबाईंचे कार्य पाहून भारावून गेले होते, पुढे राणीसाहेब आजारी पडल्या त्यावेळी ऑपरेशन थेटरमध्ये कृष्णाबाई सहाय्यक डॉक्टर म्हणून होत्या. कृष्णाबाईंचं काम पाहून महाराजांनी त्यांना मोत्यांनी मढवलेल्या सोन्याच्या बांगड्या बक्षीस म्हणून दिल्या होत्या.

कोल्हापुरातल्या एकमेव हॉस्पिटलात त्यांनी नर्सेसच्या कोर्सची पहिल्यांदा सुरवात केली. स्त्रियांना या शिक्षणासाठी सहा स्कॉलरशिपही देऊ केल्या. रुग्णांची हेळसांड होऊ नये, स्वछता ठेवावी यांसारख्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवायला सुरवात केली.

शाहू महाराज सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करत असलेल्या कृष्णाबाईंवर खुश होते. बडे इंग्रज अधिकारी आले तर शाहू महाराज त्यांना हॉस्पिटल दाखवण्यास जरूर घेऊन जात आणि कृष्णाबाईंचा स्त्री रुग्णांचा विभाग खास कौतुकाने दाखवत असे.

१९२२ साली शाहू महाराजांचे निधन झाले या घटनेचे कृष्णाबाईंना अतीव दुःख झाले. १९२३ साली त्या सेवानिवृत्त झाल्या. प्रॅक्टिस चालू असताना त्या लेखनही करायच्या. कृष्णाबाई जन्मभर ब्रह्मचारिणी राहिल्या. आपल्या कार्याने त्यांनी समाजसेवेचे धडे लोकांना दिले. आनंदीबाईंनंतर केवळ दुसऱ्या स्त्री डॉक्टर कृष्णाबाई होत्या.

संदर्भ- कर्तृत्ववान मराठा स्त्रिया विजय चोरमारे 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.