४० वर्षांपूर्वी स्वतः इंदिरा गांधींनी यवतमाळ मधल्या सभेत आणिबाणीबद्दल माफी मागितली होती

आणीबाणीच्या नंतरचा काळ. इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे इंदिरा आणि संजयचे सर्व भ्रष्ट कारभार बाहेर काढणार अशी भीष्म प्रतिज्ञा करून आले होते. त्यांच्यावर निरनिराळ्या केसेस चालू होत्या. कधीही या दोघांना अटक होईल याची शक्यता व्यक्त केली जात होती.

स्वातंत्र्यापासून सत्तेच्या छायेत वावरलेल्या इंदिरा गांधी कधी नव्हे ते नामोहरम झाल्या सारख्या वाटत होत्या. अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात होते. मीडियामधून सतत आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचाराची बातमी तिखट मीठ लावून प्रसारित केली जात होती. गर्दीने भरलेला त्यांच घर आता निर्मनुष्य झालं होतं.

एकूणच इंदिरा गांधी संपल्या अशीच सगळ्यांची धारणा झाली होती. सत्तेच्या राजकारणात कोणलाही त्यांची सावली सुद्धा नको होती.

हताश झालेल्या इंदिरा गांधी यांच्या मनात निवृत्तीचे विचार डोकावू लागले होते. अखेरचा सल्ला घेण्यासाठी म्हणून त्यांनी सर्वोदयी गांधीवादी नेते आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार आश्रम येथे जायचं ठरवलं. दिल्लीहून नागपूर विमानतळावर त्या आल्या. एकेकाळी पंतप्रधानांच्या थाटात येणाऱ्या इंदिराजींच्या भोवती कसलंही वलय नव्हतं.

सामान्य प्रवाशाप्रमाणे त्या विमानतळावर उतरल्या. पण पाहतात तर काय तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

इंदिरा गांधी कि जय च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. या लोकांना आवरण्याचा पोलीस आटोकाट प्रयत्न करत होते. वरून आदेश आले असल्यामुळे त्यांनी तिथे आधीच संचारबंदी लागू केली होती. पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता.

अखेर पोलिसांची आणि या तरुण कार्यकर्त्यांची झटापट सुरु झाली. पोलिसांनी त्यांना दडपण्यासाठी लाठीचार्ज सुरु केला. विमानतळावर गोंधळ झाला. या झटापटीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी निर्घृण लाठीमारात एकाचं तर डोकं फुटलं होतं.

ते होते विलास मुत्तेमवार.

या दौऱ्यात इंदिरा गांधींना जाणवलं की आपण अजून संपलेलो नाही. विनोबा भावेंनी देखील त्यांना आशीर्वाद दिला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा महाराष्ट्रात काँग्रेस फुटली होती, मोठे नेते पक्ष सोडून गेले होते तरी कार्यकर्ते अजूनही इंदिरा गांधींच्या पाठीशी आहेत हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

म्हणूनच काँग्रेसच्या पुनरुज्जीवन करायची मोहीम इंदिरा गांधींनी महाराष्ट्रापासून सुरु केली तेही विदर्भात.

१९७८ सालच्या जानेवारी महिन्यात त्या पुन्हा विदर्भ दौऱ्यावर आल्या. नागपूर काँग्रेसचे मोठे नेते नरेंद्र तिडके आता रेड्डी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तरीही नासिकराव तिरपुडे यांनी इंदिरा गांधींच्या स्वागतासासाठी १०००० कार्यकर्ते विमानतळाबाहेर सज्ज केले. या जोरदार स्वागतामुळे इंदिराजींना सुखद धक्का बसला. तिरपुडे यांचं महत्व यामुळे प्रचंड वाढलं.

यापेक्षाही जास्त आश्चर्य त्यांना यवतमाळ मध्ये वाटलं. तिथं झालेल्या सभेत लाखोंची गर्दी गोळा झाली होती. नुकतंच पक्षांतर करून इंदिरा गांधींच्या गटात आलेल्या जवाहरलाल दर्डा यांना देखील स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आता इंदिरा गांधींच्या पक्षात नव्हते तरी त्यांच्या बालेकिल्ल्यात इंदिरा गांधी यांना पाहण्यासाठी एवढा जनसमुदाय गोळा होणे हा एक चमत्कारच मानला गेला. 

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंदिरा गांधींच्या सोबत या दौऱ्यामध्ये विदर्भाचा शेर म्हणवले जाणारे  जांबुवंन्तराव धोटे देखील होते. त्यांनी एकेकाळी आणीबाणीला मोठा विरोध केला होता. ते इंदिराजींच्या समवेत आहेत म्हणजे येत्या निवडणुकीत वेगळी समीकरणे आकारास येतील याचे सूतोवाच होत होते.

सगळा देश थक्क होईल अशी घटना याच सभेत घडली.

२४ जानेवारी १९७८ रोजी झालेल्या सभेत इंदिरा गांधी म्हणाल्या,

“मी आणिबाणीमध्ये जे काही घडलं त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे. या काळात इतरांनी देखील काही चुका केल्या आणि ते आता मान्य करायला तयार नाही आहेत त्यांची देखील जबादारी मी घेण्यास तयार आहे.” 

आणीबाणीत लोकशाहीचा घोट घेणाऱ्या हुकूमशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींनी जनतेकडे पहिल्यांदाच त्या काळात घडलेल्या अत्याचाराबद्दल माफी मागितली होती. त्यांचे विरोधक देखील दंग झाले. कठोर आणि स्वाभिमानी म्हणवल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींचं वेगळंच रूप पाहायला मिळालं होतं.

त्यांनी या सभेत आणीबाणी लागू करण्याच्या वेळच्या अनागोंदीची आठवण करून दिली आणि बांगलादेश सारखी परिस्थिती ओढवू नये म्हणून हा कठोर निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. शिवाय लोकशाही टिकवून धरण्यासाठी आपण आणीबाणी मागे घेतली आणि निवडणूक लावली, जनतेने आपल्या विरोधात दिलेल्या निर्णयाचा स्वीकार देखील केला. त्यांनी मोठ्या मनाने आपल्या चुका मान्य केल्या.

त्यांच्या विरोधात होत असलेल्या आरोपांची हवाच त्यांनी या एका माफीमुळे काढून टाकली.

खुद्द जनतेने त्यांना माफ करून टाकलं होतं. पुढच्या निवडणुकांमध्ये ते दिसलं देखील. जनता पक्ष जो आणीबाणीवर टीका करत सत्तेत आला होता त्यांना केंद्रात आपले सरकार चालवता आले नाही. १९८० सालच्या निवडणुकांत त्यांचा मोठा पराभव झाला आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी आल्या.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.