इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण विखेंनी दोस्तीसाठी पद नाकारलं..

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज मुख्यमंत्री होऊन गेले. वसंतराव नाईक यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीपासून ते बाबासाहेब भोसले, नारायण राणे यांच्या कमी कालावधीचं मुख्यमंत्रीपद अनुभवलं. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आपली छाप मात्र सोडली.

राज्यात असेही अनेक नेते होते ज्यांचं नाव नेहमी सीएम इन वेटिंग असं असायचं. त्यांची राजकीय ताकद मुख्यमंत्रीपद मिळवण्याची होती पण काही ना काही कारणामुळे ती खुर्ची त्यांच्यापासून हुकत गेली. यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, पतंगराव कदम, गोपीनाथराव मुंडे, राजाराम बापू पाटील, एस एम जोशी अशी अनेक नावे यात सांगता येतील.

यातीलच एक नाव म्हणजे नगरचे बाळासाहेब विखे पाटील 

महाराष्ट्रातल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे निर्माते विठ्ठलराव विखे पाटील यांचे सुपुत्र. वडिलांची सहकारी चळवळ त्यांनी पुढे नेली, प्रवरा नगर येथे अनेक सहकारी संस्था उभा केल्या आणि त्या कार्यक्षमतेने चालवून देखील दाखवल्या. विठ्ठलराव विखे निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहिले.

बाळासाहेब विखे यांनी मात्र जिल्हापरिषद निवडणुकीपासून सुरवात केली. अण्णासाहेब शिंदेसारख्या दिग्गज नेत्याला हरवून लोकसभेत गेले. तिथून पुढे अनेक वर्षे ते खासदार राहिले.

सत्तरच्या दशकात महाराष्ट्राचं राजकारण बदलत होतं. यशवंतराव चव्हाणांच्या आदेशानुसार चालणाऱ्या महाराष्ट्रात त्यांच्यापेक्षा वेगळी मते असणाऱ्या नेत्यांचा देखील उदय होत होता. यातच प्रमुख नाव होत शंकरराव चव्हाण.

पश्चिम महाराष्ट्रातील नेते सहकाराच्या नावाखाली फक्त आपल्याच भागाचा विकास करत आहेत असं मराठवाड्याच्या अनेक नेत्यांचं मत होतं, यात शंकरराव चव्हाण आघाडीवर होते. त्यांनी पाटबंधारे खात्याचा मंत्री म्हणून अनेक धरणे उभारली, सिंचन योजना सुरु केल्या.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या गटाला शह म्हणून शंकरराव चव्हाण यांना इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपद दिलं.

पश्चिम महाराष्ट्रातले सगळे साखर कारखानदार शंकरराव चव्हाणांच्या विरोधात होते फक्त बाळासाहेब विखे पाटील त्यांच्या सोबत होते. याकाळात वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यातील वाद वाढत गेला. दादांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले, त्यांनी राजकीय संन्यास घेतला.

आणीबाणी नंतरच्या काळात दोन्ही गट हमरीतुमरीवर आले.वसंतदादांनी जोर लावून शंकरराव चव्हाणांना खाली खेचलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. नाराज झालेल्या चव्हाणांनी वेगळा पक्ष काढला,

महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस.

शंकरराव चव्हाण यांच्यासोबत खताळ पाटील, बाळासाहेब सावंत, प्रभाकर कुंटे आदी अनेक दिग्गज नेते होते. या पक्षाचा अध्यक्ष बाळासाहेब विखे पाटलांना करण्यात आलं. 

पण दुर्दैवाने १९७८च्या विधानसभा निवडणुकीत शंकराव चव्हाणांच्या पक्षाचे त्यांच्यासह आणखी दोनच आमदार निवडून आले. वसंतदादा पाटील यांच्या सरकारने या माजी मुख्यमंत्र्यांचा जमेल तितका पाणउतारा केला.

त्यांना मुंबईत आमदार निवासच्या छोट्या खोलीत राहावे लागले.

बाळासाहेब विखे पाटील हे या पक्षाचे एकमेव खासदार होते. आणीबाणी नंतरचा हा काळ. वेगाने राजकीय गणिते बदलत होती. जनता पक्षाचं सरकार निवडून आलं होतं. अशातच यशवंतराव चव्हाण देखील काँग्रेस मधून बाहेर पडले होते आणि त्यांच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातले मोठमोठे नेते सुद्धा बाहेर पडले.

बाळासाहेब विखे पाटलांचे दिल्लीत इंदिरा गांधींशी चांगले संबंध होते. मात्र त्या स्वतःच निवडणुकांमध्ये पडल्या असल्यामुळे त्यांनी आपल्या निष्ठावंत नेत्यांना स्थानिक पातळीवरचे निर्णय स्वतः घ्यायला सांगितले.

दरम्यानच्या काळात एक विलक्षण घटना घडली. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजले जाणारे वसंतदादा गटाचे नेते शरद पवार अचानक पक्ष सोडून बाहेर पडले. त्यांनी वेगळा पक्ष बनवला. वसंतदादांचं सरकार त्यांनी पाडलं, जनता पक्षाच्या मदतीने स्वतःच पुलोद सरकार स्थापन केलं.

दादांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून ही घटना फेमस झाली.शरद पवार राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. जनता पक्ष, जनसंघ, कम्युनिस्ट पक्ष अशा अनेक विचारांच्या नेत्यांची मोट बांधत हे पुलोद सरकार उभं राहील होतं. पवारांना हे सरकार चालवण्यासाठी एका अनुभवी नेत्याची साथ हवी होती. त्यांनी शंकरराव चव्हाणांना सोबत घेतलं.

मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण आपल्या पेक्षा ज्युनियर असणाऱ्या पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनले.

इकडे केंद्रात जनता पक्षाच्या कारभारामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता पुन्हा वाढीस लागली होती. त्यांना सोडून गेलेले जुने नेते एकेक करून परत येत होते. शंकरराव चव्हाणांनी देखील राज्यमंत्रिमंडळाचा राजीनामा देत आपला पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. इंदिरा गांधींनी १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जोरदार यश मिळवलं. त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या.

सत्तेत आल्या आल्या त्यांनी ज्या ज्या राज्यांमध्ये आपल्या विरोधी सरकारे होती तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली. 

यात शरद पवारांचे पुलोद सरकार देखील होते. तेव्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेसने मोठा विजय मिळवला. पुन्हा सत्ता आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्यांसमोर पडला. वसंतदादा पाटील देखील काँग्रेस मध्ये परत आले होते. त्यांना आमदारांचे मोठे पाठबळ देखील होते.

पण इंदिरा गांधींना मुख्यमंत्रीपद आपल्या निष्ठावंतांना करायचं होतं. त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील त्यांना शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री करा अशी विनंती करायला पंतप्रधान निवास मध्ये गेले. पण त्यांची मागणी ऐकून इंदिरा गांधी विखेंवर खवळल्या. त्या म्हणाल्या,

“मी त्यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांनी मात्र आमच्या विरोधकांच्या मंत्रिमंडळात साधं मंत्रिपद स्वीकारलं !  एके लिए बोलो, चव्हाण कि बात क्यूँ करते हो ? आप अपने लिए तो कूछ बातही नही करते.” 

विखे पाटलांचा सहकार क्षेत्रातील दबदबा, त्यांचे राजकारणातील वर्चस्व, त्यांचे मागे असलेली तरुणांची फळी यामुळे शरद पवारांना ते आव्हान निर्माण करू शकतील असं इंदिरा गांधींना वाटत होतं. म्हणूनच त्या तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी का प्रयत्न करत नाही असं त्यांना विचारात होत्या.

विखे पाटील म्हणाले,

“जिनको हमने दोस्त माना है, उनके लिए मै चेष्टा (प्रयत्न) करता हूं. खुद के लिए करेंगे तो मित्रत्व कैसे मानेंगे हम?”

बाळासाहेबांनी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला.कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावं म्हणून शंकरराव चव्हाण पवारांच्या मंत्रिमंडळात गेले वगैरे सांगितलं. पण इंदिरा गांधी म्हणत होत्या कि त्यांनी हे कुठूनतरी माझ्या पर्यंत पोहचवायला हवं होतं.

अखेर ही बैठक काही यशस्वी झाली नाही. शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आलं. पुढे दादांना शह देण्यासाठी संजय गांधी समर्थक अंतुलेंच नाव समोर करण्यात आलं. विखे पाटलांनी याला पाठिंबा दिला.

ते देह वाचावा कारणी या आपल्या आत्मचरित्रात बाळासाहेब विखे सांगतात, जून १९८० साली बॅ. ए.आर.अंतुले  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकत होतो, परंतु त्यांना मुख्यमंत्री करावं या शिष्ठमंडळात मी होतो. आपण ज्यांना निष्ठा देतो, त्यांना फसवणं माझ्या विचारसरणीत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.