मुलावरचे खटले मागे घेण्यासाठी इंदिरा गांधींनी चरणसिंग सरकार पाडलं होतं?

१९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला होता. मतदार राजाने जनता पक्षाच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. पण निवडणुकीपूर्वी काँग्रेस विरोधाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेवेळी पंतप्रधानपदासाठी मात्र रस्सीखेच सुरु झाली.

पण जयप्रकाश नारायण यांच्या मध्यस्थीने मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तर चरणसिंग यांना उपपंतप्रधान आणि गृहमंत्री पदावर समाधान मानावे लागले.

सत्तेवर येताच मोरारजी देसाई सरकारने आणीबाणीची चौकशी सुरु केली होती. आणीबाणीच्या काळात काँग्रेसमध्ये संजय गांधी आणि त्यांच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नसबंदी सारख्या भयंकर कार्यक्रमातून उच्छाद मांडला. कित्येक विरोधकांना जेलमध्ये टाकलं, माध्यमांवर बंदी आणण्यात आली. या सगळ्या बद्दल चौकशी सुरु झाली, गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. 

मात्र त्यानंतर अवघ्या २ वर्षात अंतर्गत राजकारणामुळे जनता पक्षात फुटीचे वातावरण तयार झाले. आपापसातली भांडण चव्हाट्यावर येवू लागली. आणि याचा अंतर्गत कलहाने अखेरीस मोरारजी देसाई सरकार पडले. यानंतर उपपंतप्रधान आणि गृहमंत्री पदावर समाधान मानाव्या लागलेले चरणसिंग पंतप्रधान पदावर विराजमान झाले.

काँग्रेसच्या १५० खासदारांच्या पाठींब्याने चरणसिंग यांचे बहुमत तयार झाले होते. त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला, आणि

२८ जुलै १९७९ रोजी देशाचे ५ वे पंतप्रधान म्हणून शपथबद्ध झाले.

पण गोष्ट इथंच संपत नाही. पंतप्रधान होऊन २१ दिवसाचं झाले होते. सरकार स्थापनेच्या २२ व्या दिवशी म्हणजे २० ऑगस्ट १९७९ रोजी त्यांना लोकसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. पण २० ऑगस्टला बहुमत सिद्ध न करताच चरणसिंग यांनी अचानक आपला राजीनामा सादर केला आणि सरकार पडले. सगळेच आश्चर्यचकित होते. काँग्रेसने पाठिंबा काढला अशा चर्चा सुरु झाल्या.

पण चरणसिंग सांगतात, काँग्रेसने पाठिंबा काढून घेण्यासोबत मी देखील राजीनामा देण्याची तयारी केली होती. त्याच कारण होतं इंदिरा गांधी यांनी त्यावेळी ठेवलेली अट. इंदिरा गांधी यांची इच्छा होती कि जर सरकारला पाठिंबा हवा असेल तर संजय गांधी यांच्या विरोधात दाखल झालेले खटले मागे घेण्यात यावेत.

एकेकाळचे अत्यंत लोकप्रिय साप्ताहिक ‘पत्रिका रविवार’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चरणसिंग यांनी आपली बाजू मांडत हा गौप्यस्फोट केला होता. या साप्ताहिकाचे संपादक उदयन शर्मा यांनी हि मुलाखत घेतली होती.

चरणसिंग म्हणतात,

इंदिरा गांधींची इच्छा होती कि मी संजय गांधी यांच्या विरोधातील खटले मागे घ्यावेत. मात्र मी या गोष्टीला स्पष्टपणे नकार कळवला होता. परिणामी १९ तारखेला काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि २० तारखेला मी राजीनामा सादर केला. मी सरकार बनवले होते ते केवळ एका चांगल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी. आणि इंदिरा गांधी यांनी देखील बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता.

त्यावेळी सरकार स्थापन केल्यानंतर लवकरच इंदिरा गांधी यांच्या नजीकच्या लोकांचे मला मेसेज येऊ लागले होते. संजय गांधी यांच्या विरोधातील खटले मागे घ्या असे इंदिरा गांधी यांचे आदेश असल्याचं सांगितले जाऊ लागले. पण चरणसिंग यांच्या मते हे मूल्यात्मक राजकारण नव्हतं आणि मूल्यांच्या बाहेर जाऊन मी राजकारण करत नाही असं त्यांचं मत होतं.

आणीबाणीच्या काळात ज्यांनी अनेक अत्याचार केले त्यांच्याविरोधात सुरु असलेले खटले मागे घेणं हे माझ्यासाठी काही केल्या शक्य नव्हते. ब्लॅकमेलच्या राजकारणात मला एक दिवस पण काम करणे शक्य नव्हते असं देखील चरणसिंग सांगतात.

चरणसिंग पुढे सांगतात,

१९ तारखेला मला आदेश मिळाला कि ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाशी संबंधित खटल्याची जारी करण्यात आलेली अधिसूचना परत घेतली जावी. या खटल्यात संजय गांधी यांच्यावर गुन्हा दाखल होता. हा तोच क्षण होता ज्यावेळी मी सरकार वाचवण्याच्या ऐवजी नवीन निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा जनतेकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि २० तारखेला पाठिंबा काढल्याच्या घोषणेसहित मी देखील राजीनामा दिला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.