लोकांनी दगड मारून नाक फोडलं, तरीही इंदिरा गांधींनी सभा रद्द केली नाही…

इंदिरा गांधी म्हणजे फायरब्रॅन्ड नेत्या. करारी नजर, जबरदस्त आवाज आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर त्यांनी भारताचं राजकारण गाजवलं. काँग्रेसला लोकप्रिय करण्यात त्यांच्या झंझावाती सभांचा आणि अमोघ वक्तृत्वाचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या सभांना गर्दीही अफाट व्हायची. आपल्या राहत्या ठिकाणापासून लांब असलं तरीही लोक इंदिराजींच्या सभा ऐकायला आवर्जून गर्दी करायचे.

मात्र एक काळ असा होता जेव्हा इंदिरा गांधींचं नेतृत्व नवं होतं आणि संबंध देशाला अपरिचितही. पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्या टर्मदरम्यान माध्यमांनी त्यांची ‘गुंगी गुडिया’ असं म्हणत हेटाळणी केली. सगळ्या टीकाकारांना आणि माध्यमांना सडेतोड उत्तर देण्याची आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्याची संधी ही १९६७ च्या लोकसभा निवडणुकांद्वारे इंदिरा यांना मिळाली.

त्या प्रचारात काय बोलणार? आपली पंतप्रधान पदाची खुर्ची टिकवून ठेऊ शकणार का? काँग्रेसला यश मिळणार का? अशा बऱ्याच गोष्टींकडे लोकांचं लक्ष लागलेलं होतं.

तारीख होती ८ फेब्रुवारी १९६७. इंदिरा प्रचारासाठी ओडिसामध्ये गेल्या होत्या. भुवनेश्वरच्या परेड ग्राऊंडवर त्यांची सभा होती. तेव्हा ओडिसाला ‘स्वतंत्र’ पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. इंदिरा यांच्या सभेला गर्दी होती, पण त्या गर्दीत सगळेच जण काँग्रेस समर्थक होते असं नाही.

इंदिरा यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि समोर जमलेल्या गर्दीतून दगडांचा वर्षाव सुरू झाला. हे दगड इंदिरांच्या दिशेनेच फेकले जात होते. साहजिकच बावरलेल्या स्थानिक नेत्यांनी इंदिरा यांना भाषण थांबवण्याची विनंती केली. स्टेजवर दगडांचा वर्षाव होत होता, इंदिरा यांना काही दगडही लागले मात्र त्यांनी भाषण थांबवायला स्पष्ट शब्दांत नकार दिला.

तेवढ्यात एका दगडाचा आघात त्यांच्या नाकावर बसला आणि त्यांचं नाकाचं हाड तुटलं. नाकातून रक्त यायला लागलं. वरचा ओठही फाटला, त्यांनी आपल्या बॅगेतून रुमाल काढला. शांतपणे रक्त पुसलं आणि भाषणाला पुन्हा एकदा सुरुवात केली.

नाकावर दगड लागण्यापूर्वी त्यांचं वाक्य होतं, ”तुम्ही अशाप्रकारे आपला देश बनवणार आहात? तुम्ही अशा लोकांना मत देणार आहात?”

चेहऱ्यावरुन वाहणारं रक्त आणि तुटलेलं हाड यामुळं इंदिरा यांचं मनोबल जराही खचलं नाही. त्यांच्यावर ओडिसामध्येच प्रथमोपचार करण्यात आले आणि दिल्लीत गेल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

त्यांच्या चेहऱ्याभोवती प्लास्टर गुंडाळण्यात आलं. आपल्या नाकाबद्दल कायम अभिमान असणाऱ्या इंदिरांनी स्वतःच आपण बॅटमॅनसारखे दिसत असल्याचा विनोद स्वतःच केला. चेहऱ्याभोवती लागलेलं प्लास्टर, दुखरं नाक आणि ओठ घेऊन त्या देशभर प्रचारासाठी फिरल्या आणि काँग्रेसच्या प्रचार मोहिमेत खंड पडू दिला नाही.

त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं तब्बल २८३ जागा जिंकल्या आणि पुन्हा एकदा बहुमत मिळवलं. इंदिरा यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शप्पथ घेतली. त्यानंतर, मात्र इंदिरा यांनी मागं वळून पाहिलं नाही. फक्त सभाच नाही, तर संसदेतली भाषणंही त्यांनी गाजवली. आपल्या कार्यकाळात आणीबाणी, पाकिस्तानचं विभाजन असे धाडसी निर्णयही त्यांनी घेतले.

त्यांच्या या धाडसी निर्णयांसोबतच ओडिसातल्या सभेत दगडांचा वर्षाव होत असताना त्यांनी दाखवलेली इच्छाशक्ती कायम देशातल्या नागरिकांच्या स्मरणात राहिल, हे निश्चित.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.