इंदिरा गांधी काश्मीर जिंकण्यासाठी हिंदुत्वाचं कार्ड खेळल्या होत्या..

मध्यंतरी परशुराम जयंती निम्मित सेक्युलर विचारधारा असलेल्याला राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सेक्युलर वर्ग व स्वतः काँग्रेसमधील बऱ्याच जणांनी याबद्दल निषेध व्यक्त केला.

राहुल गांधी सुद्धा बहुसंख्यांकवादी आहेत म्हणून चर्चा सुरु झाली. तर काहींचं असं म्हणणे आले की की हा राहुल गांधींच्या राजकारणाचा एक भाग होता.

पण काँग्रेसने पहिल्यांदाच असं केलंय का..?

या आधी पण राहुल गांधी यांनी मंदिरे, मठ, महंत यांना भेटी दिलेल्या आहेत. काँग्रेसने सुद्धा बहुसंख्यवाद्यांच्या बाजूनेच राजकारण केले आहे.

इतिहासात पाहायला गेले तर राजीव गांधींनी सुद्धा बाबरी मशिदीमध्ये विराजमान रामल्ललाच्या मंदिराचे कुलूप उघडण्यास परवानगी दिली होती. काँग्रेसचा हिंदूविरोधी प्रचार करणे हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे.

इंदिरा गांधींनी सुद्धा हिंदु हिताचे आम्ही रक्षण करु असे सांगत जम्मु काश्मीर मध्ये निवडणुक लढवली होती.

ही गोष्ट आहे १९८३ च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची.

शेख अब्दुल्ला यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा फारुख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा झाले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून शेर ए कश्मीर म्हणून ओळखले जाणारे शेख अब्दुल्ला काश्मीर व्हॅली मध्ये प्रचंड फेमस होते. त्यांच्या लोकप्रियतेला धक्का देणे खुद्द नेहरूंना जमले नव्हते. असे हे शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री असतानाच त्यांचं निधन झालं.

त्यांच्या निधनानंतर काश्मीर मध्ये सगळी सहानुभूती फारुख अब्दुल्ला यांच्या पाठीशी राहणार हे स्पष्ट होतं. त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला रोखणे हे काँग्रेसपुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं. साम दाम दंड भेदचा वापर करून निवडणूक जिंकण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंदिरा गांधींच्या सल्लागारांनी काश्मीर जिंकण्यासाठी एक डाव खेळला.

जम्मू विरुद्ध काश्मीर वादाचा फायदा घेणे

या निवडणुकीत शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना जम्मू-काश्मीर विधानसभेने जे १९८२ साली मंजुर केलेले ‘रिसेटलमेंट बिल’ मुख्य वादाचा विषय बनले होते. काँगेस इतकाच संघ आणि जम्मूमधील हिंदुसंभेने ह्या बिलाविरोधात विरोध सुरु केला. जम्मू मध्ये या रीसेटलमेंट कायद्यांबद्दल रोष होता. याचाच फायदा घेऊन तिथे भाजप आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होती.

इंदिरा गांधींनी एका दगडात दोन पक्षी मारायचे ठरवले, आपण इथल्या हिंदुंचा चेहरा होऊ शकतो अशी रणनिती आखून ‘ जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’ विरोधात दंड थोपटले व हिंदुत्ववादी भाजपच्या वाढत्या ताकदीला रोखायचे ठरवले.

काय होता ‘रिसेटलमेंट बिल’ कायदा ?

१९५४ च्या आधी पाकिस्तानला गेलेल्या काश्मिरी रहिवाशांना राज्यात परत येण्याचा, त्यांच्या मालमत्तांचा पुन्हा हक्क सांगण्याचा आणि पुनर्वसन करण्याचा हक्क देण्यात आला होता.

धर्मनिपेक्षतेच्या आधारे इंदिरा काँग्रेस या बिलाला विरोध करु शकत होते. पण हिंदु कार्ड वापरून हिंदु हिताचे आम्ही रक्षण करु असा प्रचार करत इंदिरा गांधी यांनी निवडणूक लढवली. आणि संघ व जम्मू हिंदुसभेने सुद्धा इंदिरा गांधी यांच्या पारड्यात मत टाकली.

याचाच परिणाम सहानुभूतीची लाट असूनही फारुख अब्दुल्ला यांना खूप मोठा विजय मिळवता आला नाही. त्यांनी उलट त्यांची एक जागा कमीच झाली. तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपदावर आपला शिक्कामोर्तब केला होता.

विरोधी पक्षाची जागा काँग्रेसने भरून काढली. इंदिरा गांधींच्या हिंदुत्ववादी कार्डमुळे ते ११ सीटवरून २४ सीटवर मजल मारू शकली. जम्मू क्षेत्रात काँग्रेसला चांगले यश मिळाले व भाजपची डाळ तिथे शिजु न देता इंदिरा गांधींनी हिंदूंचे प्रतिनिधित्व पार पाडले.

– कपिल जाधव.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.