EVM सोडा, निवडणूक जिंकण्यासाठी इंदिरा गांधी म्हणे मॅजिक शाई वापरायच्या..

गोष्ट आहे १९७१ सालची. इंदिरा गांधी पूर्ण भरात होत्या. बँकांचे राष्ट्रीयीकरण संस्थाने खालसा असे तडाखेबाज निर्णय त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दाखवून देत होते. काँग्रेसच्या जुन्या ढुढ्ढाचार्यांना बाजूला सारून त्यांनी पक्षावर तर पकड मिळवली होतीच पण आपल्या झंझावती व्यक्तिमत्वामुळे जनतेमध्ये देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या होत्या.

पण तरीही ती लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची होती. काँग्रेसच्या फुटीनंतर स्वतःच्या बळावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. प्रत्येक मतदारसंघ महत्वाचा होता.

पण सगळ्या देशाचं लक्ष एका विशिष्ट मतदारसंघाकडे लागून राहिलं होतं. “दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ”

भारतातील सर्वात उच्च्भ्रू वसाहत असलेला हा मतदारसंघ. याचे वैशिष्ट्य म्हणजे मागच्याच निवडणुकीत मुंबईचा सम्राट समजल्या जात असणाऱ्या स.का.पाटील यांचा कामगार चळवळीतील नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभव केला होता. जायंट किलर म्हणून फर्नांडिस यांना देशभरात ओळख मिळाली होती.

यावेळी निवडणुकीच्या रिंगणात स.का.पाटील नव्हते त्यांच्या ठिकाणी डॉ.कैलास नावाचे एक नवखे उमेदवार उभे होते. त्यामुळे जॉर्ज फर्नांडिस यांच्यापुढे हा विजय एकदम सोपा मानला जात होता.

अशातच टाटा ग्रुपच्या नवल टाटा यांनी निवडणुकीत अर्ज भरून खळबळ उडवून दिली. असं म्हणतात कि नवल टाटा यांनी अर्ज दाखल केल्यावर इंदिरा गांधी जेआरडी टाटा यांच्यावर नाराज झाल्या. त्या तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्यांनी जेआरडी टाटा यांना विचारणा केली,

‘So the Tata group wants to set up a front against me?

सर्व बाजुंनी नवल टाटा यांच्या उमेदवारीला विरोध होत होता. फक्त एकच माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहिला. तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

बाळासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता. आणि  साम्यवादी कामगार चळवळीशी निगडित असलेल्या जॉर्ज फर्नांडिसशी तर त्यांचं उभं वैर होतं.

जॉर्ज फर्नांडिस आणि टाटा उद्योगसमूहाचं नातं देखील तितकं खराब होत असं नाही. फर्नांडिस यांना एकदा ताज हॉटेलसमोर मारहाण झाली होती तेव्हा जेआरडी यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. पुढे काही वर्षांनी त्यांना जमशेदपूरच्या कामगार युनियनचा प्रमुख होणार का याची विचारणा केली होती. पण फर्नांडिस यांचा त्याकाळचा डॅशिंग स्वभाव आणि भांडवलशाही विरुद्ध उभारलेला लढा यामुळे त्यांनी ताटांच्यापासून अंतरच राखलं होत.

मात्र या निवडणुकीमुळे फर्नांडिस आणि टाटा एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले होते.

बाळासाहेबांच्या आदेशामुळे शिवसैनिक नवल टाटा यांच्या प्रचारात उतरले. स्वतः बाळासाहेब त्यांचे प्रचारप्रमुख होते असं म्हणतात. तळागाळातला शिवसैनिक टाटा उद्योगाच्या राजकुमारच्या निवडणुकीसाठी जीवाचं रान करत होता. जयंत साळगावकर हे देखील नवल टाटा यांच्या प्रचारात आघाडीवर होते.

निवडणूक तज्ञ पंडित म्हणत होते की हमखास नवल टाटा विजयी ठरणार.

या सगळ्याचा परिणाम दिसून आला. निवडणुकीच्या निकालानंतर जॉर्ज फर्नांडिस यांचं डिपॉझिटच जप्त झालं. नवल टाटा देखील निवडणुकीत पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला पण नवल टाटांनी त्यांना चांगलीच लढत दिली होती. दोघांच्यात फक्त १९ हजार मतांचे अंतर राहिले होते.

शिवसैनिकांनी केलेला प्रचार दिसून येत होता. बाळासाहेब म्हणाले,

“हा बाईचा नाही तर शाईचा विजय आहे.”

त्याकाळी चर्चा होती कि इंदिरा गांधींनी सोव्हिएत रशिया मधून खास शाई मागवली आहे ज्यामुळे अन्य उमेदवारांच्या बाजूने जे मतदान झाले आहे ते गायब होत होते.

अशातच निवडणूक आयोगाने या निवडणुकीपासून वेगवेगळ्या बुथवरच्या बॅलट पेपर ड्रममध्ये मिक्स करून रोटेट करण्याची पद्धत सुरु केली होती. विरोधी पक्षांचे म्हणणे होते कि केमिकल वाले बॅलेट पेपर ओळखू येऊ नयेत म्हणून इंदिरा गांधींनी हि आयडिया केली आहे.

त्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी एकहाती विजय मिळवून आणला. या विजयामुळे त्यांचे देशावरचे आणि काँग्रेस वरचे वर्चस्व सिद्ध झाले. आज ज्याप्रमाणे मोदींच्या ईव्हीएम वर टीका केली जाते त्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या बॅलेट पेपर आणि शाई ही वादग्रस्त बनली होती. पुढे अनेक वर्षांपर्यंत याच्या चर्चा सुरु राहिल्या. आणीबाणीच्या गोंधळात झालेल्या अनेक कोर्ट केस मध्ये या निवडणुकीच्या शाईचा देखील समावेश होता. आरोप प्रचंड झाले मात्र सिद्ध काही झाले नाही.

आजही ईव्हीएम वर टीका झाली की भाजपचे प्रवक्ते ” बाईचा नाही तर शाईचा विजय ” हे बाळासाहेबांचे वाक्य फेकून काँग्रेस कार्यकर्त्यांना गप्प करताना दिसतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.