नऊवारी नेसलेल्या इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं.

मुंबईच्या नरीमन पॉइंटजवळ मोठमोठाल्या उत्तुंग इमारतींच्या मधोमध उभी असलेली महाराष्ट्र विधानभवनाची आकर्षक इमारत. संपूर्ण भारतातच नाही तर जगभरातील सर्वात सुंदर विधिमंडळ इमारतीमध्ये तिचा समावेश होतो.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडून आलेले आमदार या इमारतीमधून राज्याचे कायदे बनवतात, त्याची अंमलबजावणी होते का याची तपासणी करतात.

मराठी मनाचा अभिमान म्हणून या इमारतीला ओळखल जातं.

यापूर्वी गेट वे ऑफ इंडिया पासून जवळ असणाऱ्या जुन्या कौन्सिल हॉलमध्ये महाराष्ट्राचे विधीमंडळ भरायचे. 1874 सालच्या त्या इमारतीमध्ये सगळ्या राज्याच्या आमदारांसाठी अपुरी पडू लागली. अखेर 1974 साली निर्णय घेण्यात आला की राज्याच्या विधिमंडळ सभागृहासाठी नवी इमारत उभा करायची. 

राज्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण त्यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्रालय सांभाळत होते. वसंतराव नाईकांनी या इमारतीची सगळी जबाबदारी करड्या शिस्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शंकररावांना दिली.

येणाऱ्या भविष्यात देखील आमदारांच्या सोईसुविधांसाठी कोणतीही तडजोड होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. इमारतीचा प्लॅन कसा असावा यासाठी मलेशिया वगैरे देशाचा दौरा करून डिझाईन फायनल करण्यात आले होते.

२७ मे १९७४ रोजी बांधकाम सुरु करण्यात आल. 

दरम्यानच्या काळात अनेकदा सरकारे बदलली तरी विधानभवनाच्या बांधकामावर कोणताही परिणाम झाला नाही.  शंकरराव चव्हाण स्वतः मुख्यमंत्रीपदी आले. त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील, शरद पवार असा बराच कालखंड लोटला आणि १९८१ साली इमारत सज्ज झाली तोवर बॅरीस्टर अंतुले मुख्यमंत्री झाले होते.

विधानभवनाच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायचे यावरून चर्चा झाली. मुख्यमंत्र्याची इच्छा होती की देशाचे राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांना बोलवावे मात्र त्यांच्या मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाच बोलवावे असा आग्रह धरला.

तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना इंदिराजींनां निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला पाठवून देण्यात आले.

इंदिरा गांधी आनंदाने तयार झाल्या. १९ एप्रिल १९८१ ही तारीख निश्चित करण्यात आली. आदल्या दिवशी पंतप्रधानांच मुंबईच्या विश्रामगृहात आगमनही झालं.  डोळे दिपून जातील असा भव्य कार्यक्रम आखण्यात आला होता. मुबई एखाद्या सणावाराप्रमाणे सजली होती.

मंत्रीमंडळातील काही जणांची इच्छा होती की इंदिरा गांधीनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचे उद्घाटन मराठी पोशाखात करावे. पण त्यांना हे कोण सांगणार? इंदिराजींची प्रतिमा एवढी उत्तुंग होती की त्यांच्यापुढे उभे राहून बोलण्याचीही कोणाची टाप नसायची.

खुद्द मुख्यमंत्री अंतुले हे इंदिराजींच्या कृपेने खुर्चीवर बसले होते, त्यांनी असली विनंती करण्यास नकार दिला.

अखेर बांधकाम मंत्री निलंगेकर यांना एक कल्पना सुचली. आदल्या रात्री एक महिलांचं शिष्टमंडळ घेवून ते इंदिराजींच्या भेटीला विश्रामगृहावर आले.  मंत्रीमंडळातील सदस्या वर्तक बाई काही महिलांना सोबतीला घेऊन आल्या होत्या. तरीही त्यांचं धाडस होत नव्हते. निलंगेकर पाटलांनी आधीच सांगितलं होतं,

“मी फक्त सोबत म्हणून येत आहे. तिथे साडीच्या विषयावर मी काही बोलणार नाही.”

अखेर कोणी तरी घाबरत घाबरत पंतप्रधानांसमोर तो विषय काढला. इंदिराजी हसल्या. त्यांनी ओळखल निलंगेकर काही बोलत नाही आहेत पण त्यांचा या महिलांना पाठींबा आहे. अखेर त्यांनी मूकसंमती दिली.

दुसऱ्या दिवशी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन संपूर्ण मराठी वेशात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं उद्घाटन केलं. आजही ही आठवण अनेकांच्या मनात ताजी आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाच्या विधानभवनाच उद्घाटन मराठी संस्कृतीप्रमाणे झालं होतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.