मालेगावची दंगल शांत करण्यासाठी स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या …

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव. मोसम नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर आणि आटोपशीर शहर. महाराष्ट्रातील मँचेस्टर सिटींपैकी एक अशी या शहराची महत्वाची ओळख. त्यासोबतच राज्यातील इतर शहरांप्रमाणे या शहराला पण स्वतःचा असा इतिहास आहे भूगोल आहे. पण या शहराची सांस्कृतिक ओळख मात्र देशभरात अनोखी आहे.

कारण मालेगावात असं म्हंटलं जातं कि इथला पाऊस देखील झांजेश्वराचा अभिषेक आणि ईदगाह मैदानावरची नमाज ऐकल्याशिवाय पडत नाही. असं हे हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांच्या संस्कृतीची सरमिसळ आणि एकरूपता असणारे एक महाराष्ट्रातील शहर.

पण या सगळ्या वैशिष्ठयांसोबत या शहाराला एकेकाळी महाराष्ट्रातील दंगलींच शहर म्हणून देखील ओळखलं जातं होतं.

अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२१ ला खिलाफतचं आंदोलनादरम्यान इथं पहिली दंगल झाल्याची नोंद सापडते. खिलाफत चळवळ रद्द झाली म्हणून मुस्लिम समाजाने आंदोलन केलं होतं. त्यावेळी खवळलेल्या जमावानं २ पोलिसांना ठार केलं होतं.

त्यानंतरही अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरून इथं दंगली झाल्या होत्या. अशीच एक दंगल झाली होती जून १९८३ मध्ये, ज्यात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे वातावरण तणावाचं होतं. हेच वातावरण शांत करायला थेट देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी मालेगावमध्ये आल्या होत्या.

१८ ऑगस्ट १९८३.

महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांच्या वायरलेसवर अचानक घोषणा झाली,

उद्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी २ तासासाठी मालेगावमध्ये येणार आहेत.

कोणालाच काहीच अंदाज नव्हता पंतप्रधान अचानक का येत आहेत? त्यामागे काय कारण आहेत? वर पासून खाली पर्यंत सगळं प्रशासन टेन्शनमध्ये आलं होतं. सुरक्षेबाबत कोणताही आढावा घेण्यात आला नव्हता.

जेव्हा इंदिरा गांधींनी १८ तारखेला जाहीर केलं कि त्या मालेगावमध्ये येणार आहेत तसं प्रशासन कामाला लागलं. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आपला दुसऱ्या दिवशीचा राज्यभरातील नियोजित दौरा रद्द केला. त्यांच्यासह सगळे वरिष्ठ मंत्री, अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मालेगावमध्ये पोहोचले.

यातील बहुतांश अधिकारी नेमकं असं काय झालयं? ज्याची माहिती इथं बसून आपल्याला नाही, पण इंदिरा गांधींना दिल्लीत बसून लागली हे बघण्यासाठी मालेगावमध्ये आले होते. इंदिरा गांधी यांच्या दौऱ्याची शहारातील हिंदू – मुस्लिम समाजाला माहिती देण्यात आली.  आजूबाजूच्या नाशिक, धुळे, पुणे या ठिकाणी सुरक्षेसाठीच्या मदतीचा वायरलेस मेसेज पाठवण्यात आले.

त्याचवेळी वृत्तसंस्थेने बातमी दिली कि, इंदिरा गांधी मालेगावातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. पण तर प्रत्यक्षात त्यावेळी मालेगावात कुठेही पूरपरिस्थिती नव्हती. राज्यात इतरत्र पूरपरिस्थिती होती, पण ती पंतप्रधानांनी येऊन पाहणी करण्याइतकी गंभीर नव्हती. विशेष म्हणजे ती परिस्थिती देखील निवळत आली होती.

त्यामुळे इंदिरा गांधी यांना राज्यातून राजकीय पातळीवर हा दौरा रद्द करण्याचे संदेश पाठवले जाऊ लागले. पण इंदिरा गांधी या दौऱ्यावर ठाम होत्या.

ठरल्यानुसार पंतप्रधान गांधी यांचं ओझर विमानतळावर आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी तत्कालिन राज्यपाल इद्रिस हसन लतीफ, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, उपमुख्यमंत्री रामराव आदिक आदी सगळे उपस्थित होते. पाऊस पडत होता, पण इंदिरा गांधी बंद गाडीतून मालेगावात आल्या. दंगलग्रस्त भागाचा त्यांनी अर्धा तास दौरा केला. मात्र या अर्ध्या तासात त्या कुठेही गाडीतून खाली उतरल्या नाहीत.

इंदिरा गांधींच्या संपूर्ण दौऱ्याच्या काळात पोलिसांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता, पण त्यासोबतच काहीस हसू देखील होतं.

पंतप्रधानांसह सगळे प्रशासन विश्रामगृहावर दाखल झाले. त्यावेळी तिथं हिंदूंनी गोवंश हत्येबद्दल आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी केल्या. सोबतच मुस्लिम समाजाला आपल्या प्रार्थनेबद्दल होणाऱ्या त्रासाबद्दल आणि पोलिसांनी जून महिन्यात दिलेल्या त्रासाबद्दल देखील तक्रार केली.

अखेरीस २ तासानंतर इंदिरा गांधी यांनी आपला दौरा आटोपता घेतला. त्या २ तासात त्यांनी आपण इथं का आलो याबद्दल एक चाकर शब्दही काढला नाही. जो तो आपला अंदाज लावत होता. पंतप्रधानांना आगामी निवडणुकीत मुस्लिम वोट बँक सुरक्षित ठेवायची असेल म्हणून त्या आल्या असतील इथं पासून ते अगदी त्यांना माध्यमातून प्रसिद्धी हवी म्हणून आल्या असतील, असे अंदाज वर्तवले गेले. 

पुढचे अनेक दिवस राजकीय विश्लेषक पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या या मालेगाव दौऱ्याचा खरं विश्लेषण करत होते.

अनेक दावे केले गेले. यात त्यावेळी नुकतच प्रा. शेख मोहम्मद इस्माईल असीर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. 

त्यामुळे मुस्लिम समाजात काही प्रमाणात नाराजी होती असं सांगितले गेले. सोबतच त्यावेळी दंगल झाल्यानंतर त्या भागात वसंतदादा पाटील आणि रामराव आदिक यांनी दौरा केला नव्हता. त्यामुळे बरीच चर्चा चालू होती.

त्याबरोबच मालेगावच्या तणावग्रस्त परिस्थितीची चर्चा पाकिस्तान मध्ये होऊ लागली होती, पत्रकार परिषद देखील झाल्याचं सांगण्यात येतं. याबाबत इंदिरा गांधी यांना माहिती मिळाली होती. याच सगळया कारणांमुळे त्या चिंतेत होत्या असं देखील म्हंटलं जाऊ लागलं होतं.

अखेर पर्यंत सगळे जण इंदिरा गांधी यांच्या या अचानकच्या झालेल्या दौऱ्याचे अंदाज वर्तवत होते. यात ठोस अंदाज होता तो दंगलग्रस्त भाग शांत करण्यासाठीच…!!!

पुढच्या काळात देखील मालेगावात बऱ्याच दंगली झाल्या, पण शेवटची दंगल झाली ती २००१ साली. त्यानंतर मागच्या २०वर्षांत मालेगावमध्ये दंगल झालेली नाही. अगदी २००६ आणि २००८ सालच्या बाँबस्फोटांनंतरही मालेगावमध्ये दंगल झाली नाही. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये एकरूपता आली आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.