इंदिरा गांधींना आपला राजकीय वारसदार बनवण्याबद्दल नेहरूंचं काय म्हणणं होतं ?

भारताच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा असते घराणेशाहीची. ती देखील गांधी घराण्याची घराणे शाही. पंडित मोतीलाल नेहरू यांच्या पासून सुरु झालेली ही घराणेशाही जवाहरलाल नेहरू, त्यांची लेक इंदिरा गांधी, जावई फिरोझ गांधी, नातू राजीव गांधी, संजय गांधी, नातसुना सोनिया गांधी, मनेका गांधी, पणतू राहुल गांधी, वरुण गांधी, प्रियांका गांधी यांच्या पर्यंत चालत आलेली आहे. पुढे देखील ती अशीच चालत राहील यात शंका नाही.

सोनिया गांधी आणि राहुल प्रियांका आजही काँग्रेसची सूत्रे आपल्या हातात घट्ट धरून आहेत. आजवर नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी असे तीन पंतप्रधान देखील या घराण्याने दिले आहेत. अशावेळी अनेक जणांना प्रश्न पडतो की स्वातंत्र्यानंतरचा काळ हा अत्यंत साफ सुथऱ्या राजकारणाचा मानला जातो. मग अशा वेळी  नेहरूंनी आपली घराणेशाही आणली तर कशी हा प्रश्न अनेकांना पडतो. 

आधी नेमकं कस काय काय घडलं ते बघू.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अख्ख नेहरू घराणे ब्रिटिशांविरुद्धच्या आंदोलनात उतरले होते. अगदी नेहरूंची आई पत्नी या देखील रस्त्यावर उतरून सत्याग्रह करत होत्या आणि त्यासाठी तुरुंगात देखील जाऊन आल्या होत्या. मग नेहरूंची लेक यात मागे कशी राहील ? इंदिरा गांधींनी अगदी लहान वयात वानर सेना नावाची संघटना सुरु केली होती. त्यांचं लग्न देखील स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या फिरोझ गांधींशी झालं.

पुढे स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान बनले. ते प्रचंड लोकप्रिय होते. गांधीजींनी आपला वारसदार म्हणून त्यांची निवड केली होतीच शिवाय ते प्रचंड लोकप्रिय होते. १९५२ साली  जेव्हा पहिल्यांदा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा इंदिरा गांधी यांना कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण राजीव आणि संजय हि मुले लहान असल्यामुळे इंदिरा गांधींनी त्यासाठी नकार दिला.

पुढच्या काळात मात्र त्या राजकारणात सक्रिय झाल्या. नेहरूंच्या पत्नी म्हणजेच कमला नेहरू यांचं कधीच निधन झालं होतं त्यामुळे वडिलांच्या मदतीसाठी आणि त्यांच्याकडे येणाऱ्या राजकीय पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी म्हणून इंदिरा गांधी आपल्या मुलांसह पंतप्रधान निवास येथेच राहण्यासाठी आल्या. इंदिरा गांधी यांचे आणि फिरोज गांधी यांचे संबन्ध देखील ताणलेले होते. 

जसेजसे वय वाढत गेले तसे नेहरू प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या मुलीवर अवलंबून राहू लागले होते. त्यांना भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना एखादी गोष्ट पंतप्रधानांपर्यंत पोहचवायची असेल तर इंदिरा गांधींचा मार्ग सोपा वाटू लागला. 

१९५८ च्या सुमारास काँग्रेसचे महत्व लोकचळवळ अथवा जनतेची संघटना म्हणून कमी होऊ लागले. काँग्रेसचे कार्यक्रम आणि सरकारची धोरणे ठरवण्यात देशातल्या आमदार, खासदारांचे महत्व वाढले. नेहरूंच्या समाजवादी संकल्पनांचा आग्रही पाठपुरावा करण्यासाठी काँग्रेस पक्षातल्या डाव्या साम्यवादी विचारांच्या मंडळींनी १९५९ साली जिंजर ग्रपची निर्मिती केली मात्र काँग्रेस पक्षातल्याच उजव्या विचारांच्या मंडळींनी या ग्रपला लगेच विरोध केला.

अशा वैचारिक मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, फेब्रुवारी १९५९ मधे अनेकांना आश्चर्याचा धक्का देत इंदिरा गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. 

पंतप्रधान पदासाठी कन्येच्या उमेदवारीचा हक्क आत्तापासून प्रस्थापित करण्यासाठीच, ही निवड झाल्याचा आरोप नेहरूंच्या विरोधकांनी सुरू केला, मात्र इंदिरा गांधींना वैयक्तिक गुणवत्तेवर पक्षाचे अध्यक्षपद मिळाले आहे, असे बहुतांश काँग्रेसजनांचे मत होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवणाऱ्या इंदिरा गांधी या चौथ्या महिला. आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांच्या निर्मितीच्या प्रस्तावाची शिफारस करून दोन राज्यातला भाषिक वाद कायमचा मिटवण्यात, केरळातील पेचप्रसंग दूर करण्यात, इंदिराजींनी आपल्या क्षमतेची पुरेपूर चुणूक दाखवली. 

वर्षभराची मुदत फेब्रुवारी १९६० मधे संपली. अध्यक्षपदाची निवडणूक इंदिराजींनी पुन्हा लढवावी, असा आग्रह काँग्रेस कार्यकारिणीत अनेकांनी केला.    

तथापि आपल्या भूमिकेवर इंदिराजी ठाम होत्या. त्यांनी स्पष्ट नकार दिला व अध्यक्षपदासाठी पक्षातले बुजुर्ग नेते के.कामराज यांच्या निवडीचा मार्ग मोकळा केला.

चीनच्या आक्रमणानंतर पंडित नेहरूंची प्रकृती वेगाने खालावत गेली. साहजिकच नेहरूंनंतर कोण ? या प्रश्नाचे आडाखे सुरू झाले. नेहरूंइतकी संपन्न राजकीय प्रतिभा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समस्यांचा प्रचंड आवाका, विलक्षण लोकप्रियता आणि देशव्यापी स्विकारार्ता असलेला एकही नेता काँग्रेस पक्षात नव्हता. 

या घटनेचे वर्णन करतांना, तत्कालिन राजकीय विश्लेषकाने नेहरूंची तुलना वटवृक्षाशी केली. वटवृक्षाच्या सावलीखाली जसे कोणतेही झाड वाढत नाही, त्याप्रमाणे नेहरूंच्या व्यक्तिमत्वाच्या तुलनेत सारेच फिके असा या विश्लेषणाचा मतितार्थ होता. 

आजारी पडलेल्या नेहरूंनी आपला राजकीय वारस नियुक्त करण्याचा मुद्दा मात्र वारंवार फेटाळला. या संदर्भात कोणीही त्यांना विचारले, तर नेहरू शांतपणे म्हणायचे, लोकशाही व्यवस्थेत आपला नेता निवडण्याचा अधिकार केवळ लोकांचा आहे.

इंदिरा गांधींना आपली कारकीर्द पुढे चालवण्यासाठी आपण तयार करीत आहात काय? हा प्रश्न विचारल्यावर स्वत: नेहरूंनी या प्रश्नाचे मुलाखतकाराला जे उत्तर दिले, ते पुढीलप्रमाणे, 

इंदिरेला मी माझी राजकीय वारस अथवा तत्सम पदांसाठी कधीही तयार करण्याचा प्रयत्न केलेला नाही. अर्थात याचा अर्थ असाही नाही की मी स्वीकारलेली पदे ग्रहण करण्यासाठी तिच्या नावाचा विचारच होऊ नये. सर्वांना पूर्ण कल्पना आहे की १९५९ साली इंदिरेने काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हा मी कोणतेही प्रयत्न केले नव्हते अथवा तिला त्यासाठी उद्युक्तही केले नव्हते. मी अनू माझी धोरणे ज्यांना अजिबात पसंत नाहीत, अशा लोकांच्या तोंडून तिच्या कामकाजाची प्रशंसा ऐकली तेव्हा मला कळले की काँग्रेसचे अध्यक्षपद तिने समर्थपणे सांभाळले. 

माझ्या ज्ञात विचारसरणीच्या विरोधात अनेकदा स्वतंत्रपणे विचार करून इंदिरा भूमिका घेत असे, एकप्रकारे ते बरोबरही होते. काही गोष्टींबाबत आमचे एकमत असायचे तर काही मुद्यांबाबत मतभेद. बऱ्याचदा असेही झाले की तिच्या काही संकल्पनांना मी सक्त विरोध दर्शवला, तरीही अध्यक्ष या नात्याने तिने त्याचा एकदा पुरस्कार केल्यानंतर, व्यक्तिगत नाते मी बाजूला ठेवले आणि राजकीय सहकाऱ्याच्या भूमिकेतून त्या संकल्पनावर एकत्रपणे आम्ही काम केले. 

थोडक्यात नेहरूंचा मुद्दा असा की काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षासारख्या महत्वाच्या पदासाठी मी इंदिरा गांधीला तयार केले नाही. जे काही केले ते सारे काँग्रेसजनांनीच केले. 

पण एकूणच त्यांनी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरीत्या इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीला आक्षेप घेतला नाही आणि इंदिराजींना त्याची मदतच झाली. याचा परिणाम भविष्यात त्यांच्या पंतप्रधानपदात झाली हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.