सत्ता गेली तरी बॉलिवुड इंदिरा गांधींच्या मागे ठामपणे उभा राहिला…

साल होतं १९७७. इंदिरा गांधी रायबरेली इथून खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. पंतप्रधानपद गेलं होतं. बांग्लादेशच्या युद्धावेळी ज्यांची दुर्गा म्हणून देशभर कौतुक झालं होतं त्या इंदिरा गांधी अचानक आता व्हिलन बनल्या होत्या.

हा सगळा आणीबाणीचा परिणाम होता.

संजय गांधींनी सुरु केलेली कुटुंबनियोजनाची मोहीम, विरोधकांची धरपकड, मीडियावर लादलेली बंधने या सगळ्या गोष्टी इंदिरा गांधींच्या विरोधात गेल्या. निष्तेज झालेले विरोधक यामुळे आक्रमक झाले. जनतेने देखील इंदिरा गांधींची साथ सोडली. बघता बघता काँग्रेसचा जनाधार गायब झाला.

जनता पक्षाने स्वप्नवत वाटेल असा विजय मिळवला. मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. त्यांनी इंदिरा गांधींच्या विरुद्ध अनेक कोर्ट केसेस दाखल केले. त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं. आपण यात अडकू नये म्हणून इंदिरा गांधींचे जुने सहकारी त्यांच्यापासून दूर जाऊ लागले. अनेकांनी त्यांची साथ सोडली. काही मोजके कार्यकर्ते वगळल्यास इंदिरा गांधी एकट्या पडल्या.

नेहरूंच्या काळापासून असलेलं गांधी घराण्याचं वलय संपुष्टात आलं. एकेकाळी त्यांचा जयजयकार करण्यात धन्यता मानणारे नेते आता त्यांच्या  नावाशी दुरानव्ये देखील आपला संबंध येऊ नये म्हणून धडपडताना दिसत होते.

इंदिरा गांधींचे दिवस फिरले याची सगळ्यांना खात्री झाली होती. 

अशातच एकदा इंदिरा गांधी मुंबईला आल्या. एकेकाळी पंतप्रधान म्हणून ऐटीत त्या मुंबईला यायच्या. त्यांचं जल्लोषात स्वागत व्हायचं मात्र आता वेळ अशी आली होती की त्यांना मुंबईत पत्रकार परिषद घेण्यासाठी हॉल मिळेनासा झाला होता.

हिंदी सिनेमासृष्टीत सज्जन आणि चारित्र्यवान समजले जाणारे सुनील दत्त हे त्यांच्या जवळकीतले समजले जायचे. विशेषतः त्यांची पत्नी नर्गिस यांचं इंदिराजींशी अगदी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या कानावर हि घटना पडली. मुंबईत इंदिरा गांधींना हॉल मिळवून देण्याची जबाबदारी सुनील दत्त यांनी उचलली मात्र त्यांनाही सगळीकडून नकार मिळत होता.

दिव्य मराठी या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रसिद्ध चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसेयांनी हा प्रसंग सांगितला आहे. अखेर शेवटचा उपाय म्हणून सुनील दत्त यांनी राज कपूर यांना फोन केला.

 “हे जे सरकार आले आहे, यामध्ये इंदिरा गांधी यांना प्रेस कॉन्फरन्साठी मुंबईत कुठेही हॉल उपलब्ध होत नाहीये. प्रत्येक जण बुकिंगचा बहाणा पुढे करत आहेत, काय करु?

राज कपूर म्हणाले काही काळजी करू नका. मी माझ्या नावावर हॉटेलच बुकिंग करतो. इंदिरा गांधींची प्रेस कॉन्फरन्स तिथेच घेण्यात येईल.

आणि तसच घडलं. एअरपोर्टसमोरच्या आलिशान सहारा हॉटेलचं राज कपूर यांनी स्वतःच्या नावावर बुकिंग केलं. इंदिरा गांधींची प्रेस कॉन्फरन्स तिथे यशस्वी पार पडली. इतकंच नाही तर या हॉटेलच्या लॉनमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील सर्व दिग्गज एकत्र आले होते. हा क्षण त्यावेळी कॅमे-यात कैद झाला होता.

जेव्हा अख्खा देश इंदिराजींची साथ सोडत होता तेव्हा हिंदी फिल्म इंडस्ट्री त्यांच्या पाठीशी उभी राहिली. असं नव्हतं की आणीबाणीचा फटका फिल्म इंडस्ट्रीला बसला नव्हता. उलट याच काळात फिल्म इंडस्ट्रीवरील सेन्सॉर कडक करण्यात आला होता. किशोर कुमार, देव आनंद असे काही फिल्म स्टार यांनी इंदिरा गांधींवर टीका देखील केली होती.

मात्र आता अख्खी हिंदी फिल्म इंडस्ट्री संकटाच्या काळात इंदिरा गांधी यांच्या पाठीशी उभी राहिली.

याच्या मागे महत्वाची भूमिका बजावली राज कपूर आणि दिलीप कुमार या दोन सुपरस्टार यांनी. हे दोन्ही फिल्मस्टार विचारांनी नेहरूवादी होते. राज कपूर यांच्या सुरवातीच्या सिनेमात समाजवादी विचारसरणीची झलक दिसायची.

पूर्वी एकदा तर राज यांनी नेहरूंना आपल्या अब दिल्ली दूर नही या सिनेमात काम करण्याची गळ देखील घातली होती. क्लायमॅक्समध्ये गावातील एक मुलगा पंतप्रधानांकडे त्याच्या वडिलांसाठी न्याय मागतो असा सिन होता. नेहरूंनी ही भूमिका करण्यासाठी होकार देखील दिला होता मात्र ते प्रत्यक्षात घडू शकले नाही.

स्वतः इंदिरा गांधींनी राज कपूर यांना फोन केला आणि त्यांनी स्पष्टीकरण दिल,

“भारताच्या पंतप्रधानाने सिनेमात काम करु नये, यासाठी मोरारजी देसाईंनी खूप दबाव आणलाय. त्यांनी हा मोठा मुद्दा बनवला होता. नेहरुजी कुठल्याही वादात अडकू इच्छित नाहीत. त्यांच्यासमोर देशातील इतर मोठ्या समस्या आहेत. मी तुमची माफी मागते.”

राज कपूर यांनी फिल्म डिव्हिजनमधून शॉट वापरून हा सिनेमा पूर्ण झाला. अनेकदा दिलीप कुमार, राज कपूर, आनंद हे त्रिकुट नेहरूंना भेटायला दिल्लीला जात असे. तेव्हा पंतप्रधान निवास मध्ये इंदिरा गांधी त्यांच्या होस्ट असायच्या.

इंदिरा गांधी आणि राज कपूर यांचे नाते त्या काळापासूनचे  होते. असं म्हणतात की राज कपूर यांच्या मुलीचा विवाह राजीव गांधींशी ठरत होता. काही कारणास्तव हा प्रस्ताव बारगळला. पण राज कपूर हे नेहमी इंदिरा गांधींचे समर्थक राहिले. आणीबाणीनंतरच्या काळात त्यांना या जुन्या मैत्रीतूनच मदत केली.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.