आणि, हत्तीवर बसून इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.
‘सिंहासन खाली करो, के जनता आती है’
लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात घोषणा दिली होती. सारी जनता इंदिरा गांधींच्या विरोधात उभा ठाकली होती. देशात इतिहास रचला जाईल अस वातावरण होतं आणि झालं देखील तसच. इंदिरा गांधींच सरकार कोसळलं. मोठ्या फरकाने जनता पक्ष सत्तेवर आला.
मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. देशात पहिल्यांदा बिगर कॉंग्रेसी सरकार सत्तेवर विराजमान झालं होतं. इंदिरा गांधी सत्तेच्या वर्तूळातून बाहेर फेकल्या गेल्या होत्या. पण आणिबाणीच्या जखमा ताज्या होत्या. इंदिरा गांधीची रोखठोक बदला घेण्याची वेळ आत्ता जनता पक्षाची होती.
जनता पक्ष सत्तेवर येताच त्यांनी सर्वात प्रथम आणिबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी शाह आयोग लागू केला. ते वर्ष होतं एप्रिल १९७७ चं. शाह कमिशनने इंदिरा गांधीवर आरोप ठेवले. भारतीय राजकारणातच पहिल्यांदाच बाईंच राजकारण कमकुवत झाल्याचं देश पहात होता.
देशाला समजल होतं आत्ता बाई संपल्या. त्यांच राजकारण संपल.
कदाचित हिच गोष्ट इंदिरा गांधींना पण समजून आली होती. पण त्यांना आपल्या जीवापेक्षाही संजय गांधीची काळजी होती. यावर एकमेव उपाय होता. सक्रिय राजकारणातून संन्यास. राजकिय संन्यास घेतला तर जनता पक्षाचं सरकार त्यांच्या मागे टांगती तलवार लावणार नाही असा इंदिरा गांधींना समज होता. शिवाय परावभवातून आलेली हतबलता त्यांनी राजकिय संन्यास घेण्याच्या निर्णयावर घेवून गेलीच होती.
याच वेळी देश एका वेगळ्याच घटनेनं ढवळून निघाला.
बिहारमधील ‘बेलछी’ या गावात एक भयंकर घटना घडली. गावातील दलितांवर अनन्वित अत्याचार करून ११ दलितांना जाळून त्यांना मारून टाकण्यात आलं.
इंदिरा गांधींना हि बातमी समजली आणि इंदिरा गांधीनी बेलछीला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो अस त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच म्हणणं होतं. पहिली गोष्ट म्हणजे आणिबाणीमुळे देशात त्यांच्याविरोधात संताप होताच शिवाय जनता पक्षाचे सरकार त्यांना आवश्यक ती सुरक्षा देवू शकेल याबाबत देखील संशय होता. सुरक्षा अधिकाऱ्यांपासून ते राजकिय सल्लागारांपर्यन्त प्रत्येकांने त्यांची समजूत काढली पण इंदिरा गांधींचा पक्का निर्णय झाला होता.
बेलछी हे गावं अतिशय दुर्गम भागात वसलेलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते आणि पुरामुळे गावाचा इतर जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे इंदिरा गांधी आधी शक्य आहे तिथपर्यंत जीपने प्रवास करत गेल्या. जेव्हा जीप पुढे जाणे शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी ट्रॅक्टरने प्रवास केला. शेवटी पुरामुळे जेव्हा ट्रॅक्टरने सुद्धा पुढे प्रवास करणं शक्य नव्हतं तेव्हा परत एकदा त्यांचे सल्लागार त्यांना पुढचा प्रवास रद्द करून दिल्लीला परतण्याचा सल्ला देऊ लागले.
पण इंदिरा गांधी आपल्या निर्णयावर ठाम होत्या. पुढे जाण्यासाठी त्यांनी हत्तीची व्यवस्था केली. ६० वर्षांच्या इंदिरा गांधी हत्तीवर बसून पुढचा प्रवास करत बेलछीला पोहोचल्या.
इंदिरा गांधींच्या सल्लागारांच्या अपेक्षेपेक्षा वेगळाच नजरा बेलछीमध्ये बघावयास मिळाला. विरोधाचा कुठलाही लवलेश नव्हता, उलट गावात इंदिरा गांधींचं जोरदार स्वागत झालं.
“इंदिरा तेरे अभाव में, हरिजन मारे जाते है”
सारख्या घोषणा दिल्या गेल्या. बख्तियारपूरमध्ये इंदिरा गांधींनी सभा देखील घेतली. या सभेला लोकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. इथेही लोकांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी केली.
“आधी रोटी खायेंगे, इंदिरा को जीतायेंगे”
ही घोषणा इथूनच आलेली. बेलछी दौऱ्यांने इंदिरा गांधींना एक प्रकारचा आत्मविश्वास दिला. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याची ही वेळ नाही, याची जाणीव त्यांना झाली. त्या परत राजकीयदृष्ट्या सक्रीय झाल्या. ‘जनता पार्टी’च्या भोंगळ कारभाराची इंदिरा गांधींना मदतच झाली. त्या दिवशी मिळालेल्या विश्वासातून पुन्हा इंदिरा नावाची बाईं देशाचा कारभार घेण्यासाठी सिद्ध झाल्या. राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय कुठल्या कुठे पळाला आणि, हत्तीवर बसूनच इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.
हे ही वाचा –
- इंदिरा वडिलांनी वर्णन केलेला वरणभात चाखायला लिमयांच्या घरी आली.
- संजय गांधीनी खरच इंदिरा गांधींना मुस्काड लगावली होती ?
- जेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले !
- इंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं !
- इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?
- इंदिरा गांधीचं राष्ट्रपती होण्याचं स्वप्न अपुर्ण का राहिलं ?