इंदिरा वडिलांनी वर्णन केलेला वरणभात चाखायला लिमयांच्या घरी आली.

स्वातंत्र्यानंतरची सुरवातीची काही वर्षे. खुर्चीमधून डोकावणारा मुजोरपणा अजून सत्ताधाऱ्यांमध्ये यायचा होता. गांधीवादी साधेपणा फक्त पुस्तकी नव्हता. दौऱ्यावर आलेले मंत्री वगैरे विश्रामगृहापेक्षा कार्यकर्त्यांच्या घरी मुक्कामास असायचे. यातूनच कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या गाठी जिवाभावाच्या अशा बांधलेल्या असायच्या. जेवणाचे इव्हेंट होण्यापूर्वीचा तो काळ. अशीच एक आठवण सांगत आहेत श्री दिलीप लिमये.

आई व मी, आम्ही दोघंच घरात होतो. राघुआण्णा नेहमीप्रमाणे गडबडीत होते. साताऱ्यातच कुठेतरी होते. प्रचाराची धामधूम चालू होती. बासष्टच्या निवडणुका अगदी दारात उभ्या नसल्या तरी वेशीवर तिचे ढोल वाजू लागले होते..
दाराची कडी वाजली.

गोऱ्यापान शरीराची व फिकट पोपटी रेशमाची साडी नेसलेली एक कार्यकर्ती दारात उभी. तिला मोती चौकातील वसंतराव लम्ब्यांच्या माडीवरील तिसऱ्या मजल्यावर आणून सोडणारे कार्यकर्ते त्यांना दारात सोडून निघून गेले…

आईला कदाचित अवचित पाहुणी जेवायला येणार असल्याची कुणकुण असावी. तिनं वरणभाताचा पितळी कुकर तयारच ठेवला होता. मग पाहुणी सैपाकघराच्या बाहेरच्या मोरीजवळ गेली. तिनं हातपाय धुतले. मी तोवर पाट मांडलेला होता. आईनं मग तिला ऊनउन भात वाढला. त्यावर वरण, तूप.
बोलणे जवळजवळ काही नाही. दगदग व पायपीट यामुळं आलेला थकवा कमी होत गेला असावा. भूकही कडकडीत लागली असेल.


जेवल्यानंतर त्या बाईंनी आईला मनापासून नमस्कार केला.
म्हणाल्या ,

“ इलेक्शन के दर्मियान सतारा जुरूर जाओगी. तब भोजन करने राघूअन्ना के हि घर जाना है . मै भी उनके हि घर भोजन कर चुका हुं ..पंडित जी ने कहा था… धन्यवाद, ताई  ”


महाबळेश्वर-प्रतापगड भेटीच्या दरम्यान त्यांचे वडील पंडितजी नेहरू राघूअण्णांच्या घरी हात ओले करून गेले होते. त्याची आठवण त्यांच्या लेकीने स्मरून आईच्या हातचा वरणभात एकदा कालवला होता..

कोणताही कार्यकर्त्यांचा लवाजमा सोबत नाही. अतिशय साधेपणाने इंदिरा वडिलांनी वर्णन केलेला वरणभात चाखायला  लिमयांच्या घरी आली. 

राघूअण्णा लिमयांनी त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी या घटनेचा भांडवल म्हणून उपयोग केला नाही, हा त्यांचा मोठेपणा. त्यांच्या माघारी राघुअण्णा लिमयांच्या पत्नीनं याचं भांडवल कधी केला नाही, ही त्या आईची विचारबैठक आम्ही इतर लिमयांनी नक्की सांभाळली. आजच्या पिढीला हे सांगताना त्यात कसलाही जगावेगळा मोठेपणा नाही…

दर वर्षी आजच्या तारखेला मला इंदिराबाईंची आठवण होते. पन्नाससाठ वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आठवतो.

Leave A Reply

Your email address will not be published.