इंदिराजींनी भरवलेल्या संगीत मैफिलीत सर्वात गाजला तो मराठी खासदारांचा पोवाडा…

पुणेकर दिवाळीच्या काळात फराळाच्या खालोखाल सर्वाधिक चर्चा करतात ते दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाची. अगदी पारंपरिक वेशभूषा परिधान करून अद्वितीय अशा संगीत मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर अगदी लगबगीने गोळा होतात. राहुल देशपांडे, महेश काळे, संदीप सलील अशा दिग्गजांची मैफिल म्हणजे स्वर्ग सुखच.

पण अशीच एक मैफिल थेट दिल्लीत देखील भरली होती, आणि त्याला खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी हजर होत्या.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. आणिबाणीनंतरच्या भयंकर पराभवातुन पुनरागमन करत इंदिरा गांधींनी पुन्हा दिल्ली काबीज केली होती. मागच्या वेळी केलेल्या चुका सुधारण्यासाठी इंदिरा गांधी प्रयत्नशील होत्या. जनतेशी समरस होण्याचा त्यांचे प्रश्न थेट त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. फक्त आपल्या पक्षातीलच नाही तर इतर पक्षातील नेत्यांशी सौहार्दपणे चांगले संबन्ध ठेवण्याकड्डे त्यांचा कल होता.

यातूनच एकदा त्यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबवर खासदारांची संगीत मैफिल आयोजित केली.

संसदेच्या इतिहासातला असा हा पहिलाच कार्यक्रम होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले खासदार आपली कला सादर करत होते. काही खासदारांनी तामिळमधून ‘सॉटिसचा खटला’ हे लघुनाट्य सादर केले. इंदिरा काँग्रेसचे खासदार एरा अन्नाबरासू यांनी सॉक्रेटिसची भूमिका अत्यंत समरसून केली.

लोकसभेचे उपाध्यक्ष जी. लक्ष्मणन हे नाटकात ज्युरींच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी सुरुवातीला ‘सायलेन्स’ म्हणताच आपण लोकसभागृहात तर नाही ना, असे वाटून खासदारांत एकच हशा पिकला.

श्रीमती गुरविंदर कौर ब्रार, श्रीमती भिंडर, श्रीमती कृष्णा साही या महिला खासदारांनी पंजाबी गीते म्हटली. तर खासदार संतोष मोहन देव यांच्या पत्नीने बंगाली गीत पेश केले. आरंभी उत्तम राठोड व इतरांनी ‘नया सवेरा आयेगा’ हे समूहगान म्हटले, तर रणजित गायकवाड यांनी ‘मंदिरवा में मोरे आज… हे भजन म्हणून सांगता केली. सौ. विदुला साठे, सौ. शीला पोतदार यांनी ‘नवरा नको ग बाई’ हे भारूड म्हटले. कार्यक्रमाचे खुसखुशीत निवेदन श्रीमती नजमा हेपतुल्ला व उत्तम राठोड यांनी केले.

सर्वात रंगत भरली वसंत साठेंनी गायलेल्या पोवाड्याने.

वसंत साठे मूळचे नाशिकचे. पुढे ते नागपुरला स्थलांतरित झाले. आणि कट्टर विदर्भवासी म्हणून ओळखले जावू लागले. आणिबाणी नंतरच्या इंदिरा गांधीच्या कठिण काळात वसंत साठे इंदिराजींच्या पाठीमागे एकनिष्ठपणे उभा राहिले. जनता सरकार कोसळलं आणि नव्याने आलेल्या इंदिरा सरकारमध्ये वसंत साठे माहिती व नभोवाणी मंत्री झाले.

या आपल्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे भारतात कलर टीव्ही आणले. मोठा विरोध असूनही वसंत साठेंनी पहिली एशियाड गेम संपूर्ण भारताला रंगीत टीव्हीवर दाखवली.

असे हे वसंत साठे कलरफुल्ल म्हणून ओळखले जायचे. त्यांच्याच लिखाणातून उतरलेलं एक वाक्य म्हणजे,

 “जब तक सुरज चांद रहैंगा इंदिरा तेरा नाम रहैंगा..”

आपल्या रंगीत व्यक्तिमत्वाला जागून त्यांनी त्या संगीत मैफिलीला गाजवायच ठरवलं. सुरवार, जाकीट आणि डोक्यावर भगवा फेटा अशा खास शाहिरी पोशाखात वसंत साठे या कार्यक्रमाला अवतरले. संसदेच्या खासदारांसमोर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या भरदार आवाजाने लावणीचे नाजूक लावण्य खुलवले व पोवाड्याचा मर्दानी जोश घुमवला.

आधी त्यांनी पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर यांचा ‘मुरारबाजीचा पोवाडा’ सादर केला. पोवाड्याला सुरुवात करताना वसंत साठेंनी खास ढंगात मुजरा करताच सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ‘आधी नमन शारदाचरण’ म्हणून नमन म्हणताना साठे यांनी “इंदिरा गांधींना प्रणाम करून…” असेही सांगून टाकले. शाहीर पांडुरंग रचणार, वसंत साठे गाणार, अशीही पुस्ती जोडली.

मराठी मातीची हि अस्सल लोककला काय्त असते याचं प्रात्यक्षिकच त्यांनी देशभरातल्या खासदारांना दाखवले.

सुन्दरा मनामधे भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली, मोत्याचा भांग….

साठेंनी गायलेल्या या लावणीला तुफान प्रतिसाद मिळाला. रामजोशींच्या या अजरामर लावणीला साठेंनी आपल्या भरदार आवाजाने आणखी रंग चढवला. खुद्द इंदिरा गांधी देखील त्यांच्यावर खुश झाल्या.

त्या दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण वेळ हजर होत्या. भाषण करण्याच्या विनंतीला त्यांनी नम्रपणे नकार दिला. त्यांना शाल देण्यात आली, तेव्हा त्या गमतीने म्हणाल्या,

 “ज्याने काहीच कार्यक्रम सादर केला नाही त्यालाच शाल मिळाली आहे.”

व्यंकटरामन, लोकसभाध्यक्ष बलराम जाखर, राज्यसभेचे उपसभापती श्यामलाल यादव, शिवराज पाटील, मल्लिकार्जुन, पी. व्यंकटसुबय्या, के.पी. सिंगदेव, अशोक गेहलोत प्रभृती मंत्री हजर होते. दुसऱ्या दिवशी लोकसभेत प्रश्नोत्तरे सुरू होण्याआधी राम गोपाल रेड्डी यांनी खासदारांचे अभिनंदन करावे, असे सभागृहात सुचवून अटलबिहारी वाजपेयींनी या कार्यक्रमात आपण सहभागी का झालो नाही, याचा खुलासा करावा, असे सांगितले.

त्यावर वाजपेयी तत्काळ उत्तरले, ‘मी मैफिलीचा माणूस नसून मैदानाचा आहे. ‘

एरवी राजकारणात रंगणारे, वादविवादात रममाण होणारे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे खासदार हे सारे विसरून त्या संगीत मैफिलीच्या आठवणीत आणि विशेषतः वसंत साठे यांच्या पोवाड्याचं कौतुक करण्यात रमले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.