फक्त इंदिराजींना आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी मराठवाड्यात विमानतळ तयार करण्यात आलं होतं…

किनवट तालुका हा नांदेड जिल्ह्यात येतो. किनवट तालुक्यात हा तेलंगाना राज्याला लागून आहे. तालुक्यातील  अनेक गावात गोंडी आणि इतर आदिवासी भाषा बोलण्यात येते. तसेच नक्षलग्रस्त भाग समजला जात असल्याने पोलीस आणि इतर काही शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात येतो. आदिवासी भागात ढेमसा नृत्य फार फेमस आहे.

बकरीच्या कातडीच्या ढोलक्या, फेफाऱ्या (पुंग्या) यांची साथ या नृत्याला असते. ढेमसा म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या पूजनासाठी गायली गेलेली गीते. जळणारे दिवे असलेली मातीची भांडी हाती घेऊन ढेमसा गीत-नृत्य सादर केले जाते. तर डोक्यावर मोरांच्या पिसा पासून तयार केलेला टोप असतो.

 प्रजासत्ताक दिनाला

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील ‘जवराला’ आणि ‘बुधवार पेठ’ या गावातील आदिवासीनी प्रसिद्ध ‘ढेमसा’ हे आदिवासी नृत्य सादर केले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हे नृत्य पाहून त्यांच्या कुतूहल जागे झाले. आणि त्यांनी या नृत्या बद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ठिकाणची संस्कृती, त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचे ठरविले. प्रजासत्ताक दिनाच्या पथकात सामील झालेल्या कलाकारांच्या या दोन्ही गावांना भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

खुद्द पंतप्रधान येणार होते. मात्र ३०० किलोमीटरच्या आत कुठेच विमानतळ नव्हते. त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर त्या भागात उतरावे आणि त्यांना या दोन्ही गावांत जाता यावे म्हणून जवळचा पर्याय म्हणून किनवट तालुक्यातील राजगड येथे वन विभागाच्या जमिनीवर धावपट्टी तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि अवघ्या काही महिन्यात १९८० मध्ये रोजगार हमीच्या कामावरील मजूरांच्या साहाय्याने विमानाची धावपट्टी तयार करण्यात आली होती.

पुढे काही कारणास्तव इंदिरा गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. नंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडीनंतर या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद करण्यात आहे. म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद नंतर कुठेच विमानतळ नव्हते आणि नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच धावपट्टी होती.

नांदेडचे विमानतळ यानंतर तयार करण्यात आले हे विशेष. हे विमानतळ कार्यन्वित करण्यात आल्यास विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघासोबतच आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद, निझामाबाद, निर्मल या ठिकाणच्या नागरिकांना सोयीचे होऊन त्यांचा विमान प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकतो. तसेच गडचिरोली आणि किनवट मधील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राज्य राखीव जवानांच्या (सीआरपीएफ) तुकड्या उतरविण्यासाठी या विमानतळाचा उपयोग होऊ शकतो.

अनेक वर्ष धावपट्टी बांधून तशीच पडून आहे. पुढे यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही आणि हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये उपेक्षित राहीले.

खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजगड येथे भेट दिली होती. तेव्हापासून या धावपट्टीला पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळामध्ये रुपांतर करावे, या ठिकाणाहून विमान वाहतूक सुरू करण्याचा मनोदय त्यांनी केला.

त्यांनी काही दिवसापूर्वी  केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी या भागाची आणि संबंधित धावपट्टीची पार्श्वभूमी सांगितली आणि या ठिकाणी पुन्हा ही धावपट्टी सुरू करून त्याचे विमानतळामध्ये रूपांतर करावी अशी मागणी केली आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.