इंदिरा गांधींना हरवून सुद्धा जेपी यांना रडू कोसळलं होत.

भारतरत्न जयप्रकाश नारायण अर्थातचं जेपी एक दूरदर्शी राजकारणी म्हणून ओळखले जातात. भारतात न्याय्य समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी  त्यांचं मोलाचं योगदान आहे. स्वातंत्र मिळेपर्यंत ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग राहिले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कामगार आणि कर्मचाऱ्यांचा आवाज बनले. १९७० मध्ये त्यांनी विरोधी पक्षात उभे राहण्याचे धाडस दाखवले आणि देशभरात क्रांती चळवळ चालवून लोकनायक बनले.

जेपी जितके रोखठोक नेते, तितकेच ते हळवे. याच उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर  इंदिरा गांधी यांच्या विरोधात आवाज उठवत उभे राहिले आणि त्यांचा पराभव देखील केला. पण हेच जेपी जिंकून सुद्धा रडले होते. त्या संदर्भातलाच आजचा हा किस्सा..

असं म्हणतात कि,  जर जेपी नसते तर इंदिरा गांधींना कोणीही हरवू शकलं नसतं. पण जेपी इंदिरा गांधींना आपल्या मुलीप्रमाणे वागवायचे. कारण जेपींच्या पत्नी प्रभावती या  इंदिरा गांधींच्या आई कमला नेहरूंच्या खास मैत्रीण होत्या. त्यामुळे प्रभावती इंदिरा गांधींना आपल्या मुलगी मानायच्या.

असे म्हणतात की, जर प्रभावती जिवंत असत्या तर कदाचित जेपी ही चळवळ सुरू करू शकले नसते. मात्र १९७३ मध्ये प्रभावती यांचा  कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर जेपी खूप एकटे पडले. जेपीला या वेदनातून सावरायला जवळपास वर्ष लागलं आणि त्यानंतर जेपींनी निर्माण केलेल्या चळवळीने इतिहास घडवला.

जयप्रकाश नारायण इंदिरा गांधींच्या प्रशासकीय धोरणांच्या विरोधात होते. १९७४ मध्येच विद्यार्थ्यांनी पाटणामध्ये चळवळ सुरू केली. हि चळवळ शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने होईल या अटीवर जेपीने यांनी त्याचे नेतृत्व करण्यास सहमती दर्शविली. तब्येत खालावलेली असूनही जेपी या चळवळीत सामील झाले. ही चळवळ नंतर बिहारमधील सरकारी भ्रष्टाचाराविरोधात एक मोठी चळवळ म्हणून उदयास आली आणि शेवटी जयप्रकाश यांच्यामुळेच ही चळवळ ‘संपूर्ण क्रांती’ चळवळ बनली.

जेपी यांच्या चळवळीतून मुलायमसिंह यादव, लालू प्रसाद यादव, नितीशकुमार यांच्यासारखे राजकीय चेहरे समोर आले. त्यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स फ्रंटने गुजरात राज्याच्या निवडणुका जिंकल्या.

जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीनंतर देशात सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आणि इंदिरा गांधींना सत्तेत राहणं अवघड झालं, त्यानंतर १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. जेपी यांच्यासोबत ६०० पेक्षा जास्त विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि मीडियात गवगवा होऊ नये म्ह्णून सेन्सॉरशिप लादण्यात आली.

आणीबाणीचे हे १९ महिने देशाच्या इतिहासातील काळे दिवस म्हणून ओळखले जातात. या दरम्यान,  तुरुंगात असलेल्या जेपींची तब्येत बिघडली. ७ महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली. किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर असलेल्या जेपींनी निवडणुकीचे आव्हान स्वीकारले. मार्च १९७७ च्या निवडणुकीत उत्तर भारतातून काँग्रेसचा सफाया झाला. इंदिरा आणि संजय दोघेही निवडणूक हरले होते. जेपींच्या ५ वर्षे चाललेल्या इंदिरा निषेधाचा हा परिणाम होता.

१९७७ मध्ये, जेपीच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून इंदिराजींचा पराभव करून जनता पक्ष सत्तेवर आला, तेव्हा २४ मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर एक विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, पण जेपी स्वतः त्या रॅलीमध्ये पोहोचले नव्हते. आपल्या राजकीय विजयाच्या सर्वात मोठ्या दिवशी जेपी गांधी शांति फाउंडेशनमधून बाहेर पडत आणि रामलीला मैदानावर जाण्याऐवजी सफदरजंग रोडवरील कोठी नंबर एकवर गेले, जिथे पहिल्यांदा पराभूत झालेल्या इंदिरा बसल्या होत्या.

जयप्रकाश नारायण यांना भेटल्यानंतर इंदिरा गांधींना रडू आवरलं नाही. पण त्यापेक्षा आश्चर्य म्हणजे जेपी आपल्या पराभूत मुलीसमोर जिंकूनही रडत होते.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.