शेकडो लेकरांना आधार देणाऱ्या इंदिरा मावशीनां कोकणच्या मदर तेरेसा अशी ओळख मिळाली…

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कोणाला इतरांबद्दल साधा विचार करायला देखील वेळ नसतो. लांब कशाला आपल्या रोजच्या प्रवासातचं बघा ना, आपण अनेक दुर्बलांना पाहतो, पण फक्त पाहून दुर्लक्ष करतो. त्यांच्याबद्दल काहीतरी करावे, असा विचार देखील येत असेल पण त्याच पुढं काहीच होत नाही. पण याला काही जण अपवाद आहेत. ज्यांनी  फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्षात काम केलं.

यातलंच एक नाव म्हणजे इंदिराबाई हळबे. ज्यांनी समाजसेवेत स्वतःला वाहून घेतलं. ज्यांच्या मातृसंस्थेची कामगिरी आज देशभरात चर्चित आहे. 

समाजसेविका इंदिराबाई हळबे मूळच्या रत्नागिरीच्या केळये- माजगावच्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यामुळं चौथी पुढे शिक्षण घेता आलं नाही. ज्यानंतर वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. लग्नाला १० वर्ष होत नाही तर पतीचं निधन झालं. आणि त्यातून सावरत नाही तर आपल्या मुलीला सुद्धा त्यांना गमवावं लागलं.

एवढं सगळं सहन करूनही न खचलेल्या इंदिराबाई हळबे यांनी आपल्या मुलीचं मीनाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नर्सिंग शिकण्याचा निर्णय घेतला आणि साने गुरुजींच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजसेवेत स्वतःला वाहून देण्याचा संकल्प केला. 

याच प्रयत्नातून इंदिराबाईंनी नागपूरमध्ये कमलाताई हॉस्पेट यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग प्रशिक्षण घेऊन देवरुख येथे छोटे प्रसूतिकेंद्र सुरू केले. जिथे गरीब, दलित आणि उपेक्षितांसाठी काम करण्याचं ध्येय ठेवलं.  परिसरातली मंडळी त्यांना मावशी म्ह्णून हाक मारायची.

१९५४ मध्ये इंदिराबाई हळबे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख भागात मातृमंदिर संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला एका गोठ्यात फक्त दोन खाटांच्या मदतीने प्रसूती सुविधा सुरु करण्यात आली.

आता देवरुख हा जिल्ह्यातला अत्यंत दुर्गम भाग. या ठिकाणी त्यावेळी नागरी सुविधा तर सोडाच साधे रस्ते आणि विजेचे वांदे होते. अश्या परिस्थिती प्रसूतीच्या वेळी महिलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण व्हायचा. हेच लक्षात घेता इंदिराबाईंनी या दुर्गम भागात महिलांना आरोग्य सेवा देण्यासाठी मातृमंदिर रुग्णालय सुरू केले.

आता चांगल्या कामाला अडथळा तर येणारचं ना, इंदिराबाईं सोबतही असचं काहीस झालं, अनेकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करत इंदिराबाईंनी आसपासच्या खेड्यातही  प्रसूतिसेवा सुरू ठेवली.

फक्त संस्थेतचं नाही तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अनेक फिरते दवाखाने सुरू केले, जेणेकरून रुग्णांना घरपोच सेवा मिळू शकेल.

त्यांच्या या समाजकार्याला पुढे साथही मिळत गेली. अश्याच एके दिवशी एक लहान मुलं त्यांच्याकडे सांभाळ करण्यासाठी आणलं गेलं, गावकऱ्यांना ते बहुधा कुठं तरी सापडलेलं असावं, ज्याच्या अंगारवर कावळ्यांनी टोचा मारल्या होत्या. इंदिराबाईंनी त्याचा स्वीकार केला आणि त्यातूनचं १९६५ मध्ये ‘गोकुळ अनाथालय’ उभं राहिलं. मावशींनी अनेक मुलांचा सांभाळ केला. या अनाथालयातील मुलांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी पुढे त्यांनी साडवली येथे मातृमंदिरचे ‘आयटीआय’ सुरू केले.

आरोग्य, अनाथालय यासोबतच मावशींनी १९५६ मध्ये शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी प्रसाद बालवाडी सुरु केली. दलित वस्तीमधून या कामाला सुरुवात केली गेली. आज जर पहिले तर  रत्नागिरी-सिंधुदुर्गात बालवाड्या, पाळणाघरांचे ४० प्रकल्प राबवले गेलेत.

इंदिराबाई एवढ्यावरचं थांबल्या नाहीत तर त्यांनी शेतीप्रयोग, शेतकरी प्रशिक्षण मार्गदर्शन, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, वर्मीकल्चर, रुरल कमिन्सअंतर्गत अनेक प्रकल्प शेकडो शेतकऱ्यांसोबत राबविले. साडेतीनशे महिला बचतगट, मातृमंदिर महिला उद्योग संस्थेच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण,  हायड्रमसारखे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पाण्याचा पंप  कोकणापासून छाप्रापर्यंत बसवून ग्रामीण भागाला एका नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.

इंदिराबाई यांच्या जाण्यानंतरही संस्थेचे काम तितक्याचं निस्वार्थीपणे सुरु आहे. आज मातृमंदिरमध्ये तिसरी पिढी कार्यरत आहे. कोरोना काळातही संस्थेने ३० ऑक्सिजन बेड आणि १० आयसीयू बेड उपलब्ध करू देत शेकडो रुग्णांना आरोग्य सुविधा दिली.  एवढच नाही तर येत्या काळातही परिसरातील शंभर गावांमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा प्लॅन आहे. 

एस. एम. जोशी, भाऊ तेंडुलकर, वामन भिडे, बाबा आमटे, गोविंद तळवळकर, वसंत बापट, दुर्गा भागवत अश्या अनेक दिग्गज मंडळींनी त्यांच्या संस्थेला भेट दिली आणि त्यांना सहकार्य देखील केले. स्वतः पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवलं कि,

 ‘सार्वजनिक हिताचे संकल्प तडीस नेण्याची या संस्थेच्या कार्यकर्त्यांची जिद्द सार्वजनिक कार्य करणाऱ्यास आदर्शवत आहे. ‘

त्यांच्या याचं कामाची दाखल घेत  इंदिराबाईंना जमनालाल बजाज, दलित मित्र, चतुरंग पुरस्कार, राज्य शासन सावित्रीबाई पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.