सलग पाच वेळा सर्वात स्वच्छ शहर बनण्यामागची इंदौरची स्ट्रॅटेजी

“मैं गंदगी ढूंढने के लिए शहर घूमा था, लेकिन गंदगी मिली नहीं”

असे शब्द एका जपानी नागरिकांनं भारतातल्या एका शहरासाठी वापरलेत. ते शहर म्हणजे मध्यप्रदेशातलं इंदौर. ज्यानं  भारताच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पुन्हा एकदा ‘सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून रँकिंग मिळवलयं. आणि एक – दोनदा नाही बरं का तर सलग पाच वेळा इंदौरने हा मान पटकवलाय. जो आजपर्यंतचा एक रेकॉर्ड असेल. 

आता आधी या अभियानाबद्दल जाणून घेऊया. तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान चालवलं जातं.स्वच्छ सर्वेक्षण हे भारतातील सगळ्या शहरं आणि महानगरांमधलं स्वच्छतेचे वार्षिक सर्वेक्षण आहे. हे जगातील सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण असल्याचे म्हटले गेले.

ज्यानुसार दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहरं सहभागी होऊन आपल्याला चांगल रँकिंग मिळावं यासाठी स्वच्छता अभियान राबवताना. ज्यात, रस्ते सफाई, कचऱ्याची विल्हेवाट लावणं, सार्वजनिक ठिकाणांचं सुशोभीकरण, शहरं राहण्याजोगी करणं, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणं यांसारख्या गोष्टी सामाविष्ट आहेत.

आता यंदाच्या म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा निकाल २० नोव्हेंबर ला जाहीर झाला. यावर्षीच्या या रॅकिंगमध्ये मध्य प्रदेशातील इंदौर शहराला सलग पाचव्यांदा हा किताब मिळाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचे सुरत शहर, तर तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे विजयवाडा शहर आहे. 

आता कोणत्याही शहराने स्वच्छ सर्वेक्षणात टॉपला येणं आणि आपला हा रेकॉर्ड कायम ठेवणं खरचं अभिमानस्पद आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता असं नाही कि बाकीचे शहर यासाठी काही करत नाहीत, देशातील अनेक शहरांमध्ये स्वच्छतेबाबत अनेक प्रकारच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. पण तरीही इंदौर आपली क्रमांक एकची जागा काही सोडेना. त्यामुळे इंदौरची स्ट्रॅटेजी तर जाणून घ्यायलाचं पाहिजे ना.. 

तर २०१७ मध्ये पहिल्यांदाच इंदौरला स्वच्छतेच्या बाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून घोषित करण्यात आलं. यानंतर, इंदौरने २०१८,२०१९, २०२० आणि आता २०२१ मध्ये म्हणजे सलग पाचही वर्ष नंबर वन मिळवलाय. आता यात तिथल्या प्रशासनाची भूमिका, इंदूरच्या लोकांची मेहनत, त्यांच्या चांगल्या सवयींचा वाटा  सुद्धा तितकाच आहे. 

पुरस्कार मिळण्याच्या कित्येक वर्ष आधी तिथल्या प्रशासनानं स्वच्छ शहरासाठी तयारी सुरु केली आहे. अनेक महत्वाची पावली उचलली, अगदी गल्ली बोळात स्थानिक लोकांच्या मदतीने अभियानं चालवली. ज्यासाठी दंड स्वरूपात काही कठोर पावलं सुद्धा उचलली.

याच साखळीत २०१७ इंदौरने सगळ्यात आधी डोर-टू-डोर कलेक्शन सुरू केलं. प्रत्येक घरातून कचरा उचलण्याचे एक आव्हान होत. पण यामागचा उद्देश होता कि, रस्त्यावरचे डस्टबीन काढून टाकणे किंवा त्यांची संख्या कमी करणं. पण इंदौर महापालिकेने हे करून दाखवलं आणि “कचरा पसरवणार नाही, पसरू देणार नाही” या घोषणे अंतर्गत लोकांनीही त्याला भरपूर प्रतिसाद दिला.

याच प्रयत्नांतून पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये इंदौरने शहराला उघड्यावर शौचमुक्त करून ODF पुरस्कार आपली नावे केला. सोबतच सेग्रीगेशन म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. ओल्या कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन, सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन. सफाई कामगारांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात केली.

यानंतर इंदौर महापालिकेनं झिरो वेस्ट ट्रेंचिंग ग्राउंड ही महत्त्वाची कामगिरी बजावली. इंदौरमध्ये अनेक वर्षांपासून ट्रेंचिंग ग्राउंडमध्ये पसरलेला १२ लाख मेट्रिक टन कचऱ्याचा डोंगर नष्ट करण्यात आला. २०२० मध्ये, इंदौर महानगरपालिकेने कचरा शुल्कातून ४० कोटींचा महसूल जमा केला. एवढेच नव्हे तर कचऱ्यापासून तयार होणाऱ्या कच्च्या मालातून महापालिकेला वर्षाकाठी दीड कोटींचे उत्पन्नही मिळाले.

इंदूर महानगरपालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन उत्कृष्ट आहे. बाकीच्या शहरांमध्ये आपण पाहिलं तर लग्न समारंभ, सभा, रॅलीनंतर मोठी घाण पसरल्याचं पाहायला मिळत पण इंदौरमध्ये प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमानंतर लगेच साफसफाई केली जाते.

इंदूरमधील महापालिकेची साफसफाईची यंत्रणा इतकी सुव्यवस्थित आणि वेगवान आहे की, आपण शहरात एखादी चक्कर मारली तरी कुठेही घाण दिसत नाही. यात महत्वाची भूमिका तिथल्या नागरिकांची आहे. जे स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करतात. 

लोक आपल्या गाड्यांमध्ये डस्टबिन घेऊन जातात.  एखाद्या नवीन व्यक्तीने रस्त्यावर कचरा पसरवला तर तिथली मंडळी त्यांना कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकण्यास सांगतात.  एकंदरीत काय तर इथली नागरिक स्वतः कचरा पसरवत नाहीत आणि इतरांनाही तो पसरवू देत नाहीत. 

त्यामुळे बाकीच्या शहरांनीसुद्धा इंदौरची ही स्ट्रॅटेजी आपल्या भागात राबवायला काही हरकत नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.