फोटोचे पदर…!!!
सन २००८ . नाटकाचं खूळ डोक्यात संचारलेलं. त्याच खुळातून एक दिवस कामधंदा वाऱ्यावर सोडून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चं एक महिन्याचं वर्कशॉप करायचं ठरवलं. त्या वर्कशॉपला महाराष्ट्रभरातून २५ विद्यार्थी व देशभरातून खूप सारे नाटक जगलेले तज्ञ मार्गदर्शक जमले होते.
वर्कशॉपच्या एका संध्याकाळी अभ्यासासाठी दशावतारी नाटकाचा प्रयोग ठेवला होता. दशावतार लहानपणी कित्येकदा पाहिला होता. ‘दशावतारा’ची शेवटची आठवण म्हणजे राजा आणि राक्षसाचं युद्ध सुरू झाल्यावर घाबरून मी ऐन नाटकाच्या ठिकाणी भोकांड पसरलं होतं. त्यामुळे सर्वजण नाटक मध्येच टाकून घरी आलो होतो. त्यानंतर दशावताराचा कधी संबंध आला नाही. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी दशावतार पाहणार होतो. तो दिवस अद्भूत होता! दशावतारी रंगले. मेक-अप करण्याला दशावतारात ‘रंगणे’ म्हणतात. नाटक सुरू झालं. पुढचा एक तास आमचा जवळपास चाळीस जणांचा गृप अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन नाटक पाहत होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे स्त्री भूमिका करणारा कलाकार ओमप्रकाश चव्हाण याचा अभिनय. प्रयोग संपला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’सारख्या ठिकाणी नाटक शिकलेली तज्ञ मंडळीसुद्धा अवाक् झाली. सर्वांनी ओमप्रकाशला गराडा घातला. प्रत्येकाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. ओमप्रकाशने मेक-अप उतरवला. साडी सोडून ट्रॅकेत भरली आणि कसल्याही अविर्भावाशिवाय तो ट्रॅंक हातात घेऊन चालू लागला. इतका मोठा कलाकार आपल्या गावात आहे आणि आपल्याला कल्पनाच नाही, याबद्दल मला स्वतःचीच लाज वाटली.
मग २०१२ ला कॅमेरा घेतल्यावर मला पहिली आठवण ओमप्रकाशचीच आली. ओमप्रकाशला फोन करून तो जिथं असेल तिथं ‘दशावतारा’चे फोटो काढत फिरलो. त्याचं प्रदर्शन भरवलं. प्रदर्शनाचं उद्धाटनही ओमप्रकाशनेच केलं. अगदी उत्तम मैत्री जमली आमची. मग २०१५ ला ठरवलं की फक्त ओमप्रकाशला केंद्रस्थानी ठेवून त्याच्यावर एक सिरीज करायची. या सिरीजसाठी त्याच्या मोटरसायकलहून रात्री-अपरात्री गावोगावी फिरलो. निव्वळ अद्भूत दिवस होते ते. गावोगावी ओमप्रकाशला असलेलं ग्लॅमर, स्त्री वर्गाचा त्याच्यावर असलेला जीव..सगळं काही जवळून पहात होतो. त्याच्या सोबत मी किमान ४० ते ४५ गावं फिरलो असेन. हे करत असताना सुरुवातीपासूनच माझ्या डोक्यात एक गोष्ट फिट्ट होती की मला त्याचा एक असा फोटो काढायचाय ज्यात त्याचं संपूर्ण आयुष्य दिसून येईल. पन्नास गावं फिरलो पण तसा फोटो काही मिळाला नाही.
या भटकंती दरम्यान ओमप्रकाशची आई आजाराने खिळलेली होती. तीचं आजारपण आणि नाटक हे दोन्हीही एकाच वेळी करताना सहा-आठ महिने ओमप्रकाशची खूप ओढाताण झाली आणि एक दिवस त्याला नाटक चालू असताना ह्रदयविकाराचा झटका आला. तरीही या पठ्ठयानं तशा अवस्थेत नाटक पूर्ण केलं. नंतर ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया झाली आणि काही वर्ष नाटक बंद हे नक्की झालं. एक वेळ ह्रदयाशिवाय जगेल पण नाटकाशिवाय जगू शकणार नाही असा हा माणूस. सहा महिन्यातच त्याने पुन्हा काम सुरू केलं आणि दिड वर्षांनंतर पुन्हा जोमाने कामाला लागला. पुनरागमनानंतर मी पहिल्यांदाच त्याचे फोटो काढायला सातार्डा या गावी गेलो होतो. नेहमी नाटक संपल्यावर तो आपल्या पेटाऱ्यासमोर बसायचा. केस सोडवायचा. मेकअप पुसायचा आणि हे सर्व झाल्यावर साडी सोडायचा. पण तो दिवस माझा होता. त्यादिवशी त्याचं मन का बदललं माहित नाही. पण त्यानं पहिल्यांदा साडी सोडायला घेतली आणि नेमका हाच क्षण मला मिळाला.
माझ्या फोटोग्राफीच्या कामामध्ये हे छायाचित्र सर्वात प्रिय छायचित्रांपैकी आहे. हे छायाचित्र प्रेक्षकाला दोनदा धक्का देतं. छायाचित्र पाहता क्षणी पहिला धक्का असतो तो म्हणजे एक स्त्री इतक्या मोकळेपणाने साडी कशी बदलतेय? पण पुढच्याच क्षणाला प्रेक्षकाला लक्षात येतं की ही बाई नसून बाईच्या वेषातला पुरूष आहे. हीच ज्ञानाची अनुभूती प्रेक्षकाला एक वेगळं समाधान, आनंद, आश्चर्य या सर्व भावना एकाचवेळी देते असं मला वाटतं. साडीच्या आड झाकलेला भाग प्रेक्षक आपल्या कल्पनाशक्तीने पहातो. छायाचित्रात दिसणाऱ्या सर्व देहात प्रेक्षक पुरूषत्वाच्या खुणा शोधायचा प्रयत्न करतो. परत परत करतो. पण त्या फारशा मिळत नाहीत. मिळाल्या तरी त्यावर विश्वास बसत नाही किंवा विश्वास ठेवावासा वाटत नाही.
या छायाचित्राच्या निमित्ताने रघू राय यांचं एक कोट आठवतं…
Either you capture the mystery of things or you reveal the mystery. Everything else is just information.
रघू राय म्हणतात त्याप्रमाणे या फोटोत दोन्हीही गोष्टी आहेत असं मला वाटतं. पहिलं म्हणजे गूढ (mystery)व लगेचच गूढाची उकलही (reveal the mystery) झालेली आहे. मला वाटतं की हे श्रेय ओमप्रकाशचं, मी फक्त एक साक्षीदार…!!!
पदर आणि चेहरा पाहताच क्षणी बुचकळतो पण दुसर्या क्षणी कळत व्यक्ती स्त्रिपार्टी नट आहे…… छायाचित्रकार आणि ओमप्रकाश दोघांना सलाम……