वैशिष्ट्यपूर्ण मानसिश्वराचा दशावतार…!!!

 

वेंगुर्ला शहरात भरणाऱ्या मानसिश्वर जत्रेतील दशावताराचा हा फोटो. सिंधुदूर्गातील मोठ्या जत्रांपैकी ही एक जत्रा. २०१२ साली मला पहिल्यांदा या जत्रेबद्दल समजलं. त्यानंतर यावर्षी २०१८ मध्ये पुन्हा मी जत्रेला भेट दिली. मानसिश्वराचे भक्त देवाला नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाला की एक बत्ती पेटवून ती या देवाला अर्पण करतात. म्हणूनच या जत्रेला ‘बत्तीची जत्रा’असंही म्हटलं जातं. दरवर्षी जानेवारी अखेरीस ही जत्रा संपन्न होते.

वेंगुर्ल्याहून शिरोड्याडे जाताना ‘मानसिश्वर’ हे ठिकाण आहे. जत्रेच्या तारखेपूर्वी आठवडाभर रस्त्याच्या दुतर्फा खेळण्यांचे आणि खाऊचे स्टॉल उभारण्याचं काम सुरू होतं. भाताच्या मळ्यांमध्ये बांबूचा मंडप उभारला जातो. त्या मंडपाच्या छताला या बत्त्या अडकवल्या जातात. शेजारीच एक बत्तीवाला आपलं दुकान थाटून बसलेला असतो. तो भाविकांना या बत्त्या भाड्यानं देतो. काही लोकं घरून घेऊन येतात.

या जत्रेत पुर्वंपार पार्सेकर दशावतार मंडळाचं नाटक होतं. ‘पार्सेकर’ हे एक नावाजलेलं दशावतारी मंडळ. वेंगुर्ला, सावंतवाडी आणि उत्तर गोव्यात यांची नाटकं फार चालतात. या छायाचित्रात गणपतीचं नमन चालू आहे. एका कोपऱ्यात संगीतवाली मंडळी बसलीत. पेटी, तबला आणि झांज अशी वाद्य वाजवणारा तिघांचा गट असतो. हे सर्व चालू असताना दोघं कार्यकर्ते बत्तीही बदलत आहेत. त्यांच्या या कृतीचा नाटकाच्या प्रेक्षकांना फार त्रास होत नाही. या सर्व गोष्टी एकाच फ्रेममध्ये पकडण्याचा मी प्रयत्न केलाय.

दशावतार नाटक हे मुळात फार लवचिकतेवर आधारलेलं आहे. या नाटकांना लिखित संहिता नसते. नाटकापूर्वी तासभर पुराणातील एक कथा वाचून ती सादर करायचं असं कलाकार मंडळी ठरवतात. मग प्रसंग क्रमाने लिहून काढले जातात. पात्रं वाटून घेतली जातात. नंतर थेट नाटकाला सुरूवात. नाटक चालू असताना कोणीतरी प्रेक्षक मध्येच जाऊन कलाकारांच्या हातात बक्षीस टेकवतो. कलाकारही तेवढ्याच सहजपणे ते स्विकारून प्रेक्षकाचे नावासहीत आभार मानतो. अगदी त्याच सहजतेने या छायाचित्रत विझलेली बत्ती काढून त्या ठिकाणी नविन बत्ती जोडण्याचं काम चालू आहे. लवचिकता व प्रयोगशीलता हा दशावताराचा गाभा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.