३० एकर जमिनीतून सुरवात करत ५०० कोटींचा व्यवसाय करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘सुला वाईन’

बाळासाहेब ठाकरे हे वाईनचे अस्सल चाहते होते. शरद पवार युरोपच्या तोडीस तोड वाईन भारतात तयार करावी या प्रयत्नात होते. तर झालं अस की, शरद पवारांनी बारामती मध्ये युरोपप्रमाणे चव असणारी वाईन तयार करण्यात यश मिळवलं.

वाईनचा अभ्यास असणाऱ्या प्रत्येकाने शरद पवारांच्या बारामतीत तयार झालेली ही वाईन युरोपच्या वाईन प्रमाणे असल्याची खात्री दिली. युरोपातील उंची वाईन आणि बारामतीत तयार झालेली ही वाईन यातला फरक देखील समजणार नाही असा निर्वाळा देण्यात आला.

आत्ता पवारांना अस्सल माणसाकडून खात्री करून घ्यायची होती.

पवारांनी थेट मातोश्री गाठली. आपली बारामतीची वाईन सुंदर अशा उंची बाटलीत भरून नेण्यात आली होती. पवारांनी ती बाळासाहेबांना भेट दिली आणि सांगितलं खास युरोपमधून तुमच्यासाठी ही वाईन आणली आहे. टेस्ट करुन कशी आहे ते सांगा.

बाळासाहेबांनी वाईन घेतली आणि पहिलचं वाक्य फेकलं,

बारामतीत तयार केली काय ?

पवारांनी अनेक उद्योग बारामतीत आणले, अनेक आंतराराष्ट्रीय कंपन्या बारामतीत उद्योग उभारू लागल्या पण पवारांना बारामतीच्या माळावरून वाईनचा तितकाच उंची ब्रॅण्ड करणं जमलं नाही. वाईन उद्योग किती धोक्याचा, किती कष्टाचा आहे हे सांगण्यासाठीच पवारांच्या या प्रयत्नांच उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

अशा किचकट परिस्थितीत महाराष्ट्राच्या मातीत सुला वाईन जन्माला आली. फक्त जन्मालाचं आली नाही युरोपातील उंची वाईनसोबत ती स्पर्धा करू लागली. म्हणूनच या ब्रॅण्डचं करावं तितकं कौतुक कमी आहे.

ही गोष्ट आहे सुला वाईन या ब्रॅण्डची.

भारतातल्या एकूण वाईन उद्योगात सुला वाईनचा वाटा हा ७० टक्के आहे. फक्त देशातला प्रमुख ब्रॅण्ड म्हणून नाही तर अगदी जगभरात आज सुला वाईन पोहचला आहे. नाशिकला वाईन कॅपिटल हे नाव मिळण्यामध्ये प्रमुख वाटा देखील एकट्या सुला ब्रॅण्डचा राहिलेला आहे. हा प्रवास कालपरवा सुरु झाला आणि टॉपला पोहचला अस नाही. तर हा ब्रॅण्ड तयार होण्याची गोष्ट आजपासून थेट वीस वर्षांपूर्वीची आहे.

एका माणसाने बघितलेलं स्वप्न आणि त्या दिशेने हार न मानता सातत्याने केलेले प्रयत्न म्हणजे सुला वाईन.

सुला वाईनचे संस्थापक आहेत राजीव सामंत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिकलेला आणि कॅलिफोर्नियात उच्च पदावर काम करणारा हा तरूण. उच्चशिक्षण आणि गलेलठ्ठ पगारामुळे एक सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी जे हवं होतं ते सगळं राजीव सामंत यांच्याकडे होतं. पण त्यांची लक्ष पुर्णपणे भारताकडे होतं. आपल्या वडिलोपार्जित शेतीचा चांगला वापर करुन आपल्याला काहीतरी खास करता येईल अस वाटतं होतं. त्याचंसोबत कॉर्पोरेट कल्चरमध्ये राहून वाईन उद्योगाकडे देखील लक्ष होतं.

नाशिकमध्ये त्याकाळी द्राक्षांच उत्पादन होतं असे ते प्रामुख्याने खाण्यासाठी. मुंबईसह देशभरात इथला माल जात होता. आपल्या या स्थानिक व्यवसायातून वाईन उद्योग उभा करता येवू शकतो हे राजीव सामंत यांच्या डोक्यात घोळू लागलं. त्यानंतर वाईन उद्योग उभा करण्यासंबधित ते माहिती घेवू लागले. यात सर्वात मोठ्ठ आव्हान होतं ते म्हणजे भारतातलं कल्चर.

वाईनकडे भारतीय पब्लिक खेचलं जाईल अस काहीही नव्हतं. इथे अगदी टॅंगो पंच पासून ते सिंगल माल्टपर्यन्त प्रत्येक गोष्टीसाठी गिऱ्हाईक होतं पण वाईनसाठी नव्हतं. किती चढते या एकमेव निकषावर भारतात दारूचं मार्केट चालतं अशा वेळी कमी चढणारी दारू फक्त चवीसाठी कोण पिणार हा प्रश्न होता?

हे सर्व प्रश्न घेवून ९० च्या दशकात हा माणूस जगभरातली माहिती गोळा करत फिरू लागला. १९९६ च्या दरम्यान वाईन उद्योगातला बाप माणूस समजल्या जाणाऱ्या केरी डामस्की या माणसाला राजीव सामंत भेटले. चर्चा सकारात्मक झाली. एक भारतीय तरुण या उद्योगात उतरु पाहतोय शिवाय त्याला व्हिजन आहे ही गोष्ट समजल्यानंतर केरी डामस्की तयार झाले व एकत्रित येवून सुला वाईनयार्ड सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाईन तयार करणं ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नव्हती. त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट होती ती म्हणजे शासकिय पातळीवर सर्व परवानग्या मिळवणं. यासाठी राजीव सामंत यांना दोन वर्ष लागली.  आपल्या आईच्या नावाने ब्रॅण्ड तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व आई SULBHA या नावावरून सुला असे नामकरण करण्यात आलं.

वडिलोपार्जित ३० एकर मध्ये खास वाईनसाठी तयार करण्यात येणारे द्राक्षे पिकवण्याची मोहिम हाती घेण्यात आली.

गुणवत्ता हाच एकमेव निकष ठेवून काम करण्याचा निश्चय करण्यात आला.

वरती सांगितल्याप्रमाणे वाईन उद्योगातलं सर्वात मोठ्ठ आव्हान होतं ते म्हणजे गुणवत्ता. आपण क्वॉलिटीवर भर दिला तर आपोआप यातून काहीतरी मोठ्ठ करु हे राजीव सामंत यांना ठावूक होतं. म्हणून जगभरातील वाईनसाठी प्रसिद्ध असणाऱ्या द्राक्षांच्या जाती आणण्यात आल्या.वाईन कल्चर उभा करण्याच्या हेतूने प्रयत्न करण्यात आले.

त्यानंतर वाईनयार्ड वर फोकस करण्यात आला.

राजीव सामंत यांची बिझनेस स्टॅटेजी सर्वात परिणामकारक ठरली. कारण आजपर्यन्त भारतात तरी हे कल्चर तयार झाले नव्हते. आपण काय पितो आणि ते कसे तयार केले जाते हेच कोणी पाहिले नव्हते. अशा वेळी प्रत्यक्षात वाईनयार्डमध्ये जावून वाईन तयार करताना पहाणे आणि तिथे बसून वेगवेगळ्या वाईनची चव चाखणे ही अनोखी आयडिया होती. त्यामुळे सर्वात महत्वाचा फरक काय पडला तर वाईनबद्दल लोक साक्षर होवू लागले. दारू म्हणजे फक्त चढण्यासाठी प्यायची असते या विचारातून चवीवर लोक फोकस होवू लागले.

२००८-०९ हे वर्ष भारतातून वाईन उद्योगाला तडीपार करणार ठरलं.

नाशिक, पुणे, सांगली या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाईनसाठी लोक द्राक्षशेती करु लागले. छोट्या छोट्या स्केलवर वाईनयार्ड उभा रहात होते. अशा काळातच आर्थिक मंदीचा फटका बसू लागला. वाईन पिणारा जो क्लास होता त्यावरच मंदीचा आघात झाल्याने मोठ्या प्रमाणात वाईनची मागणी घटली. या वर्षीच सुला वाईनमार्फत दोन गोष्टींवर भर देण्यात आला.

सुला फेस्ट नामक तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पण त्याहून अधिक महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे कमी किंमतीत वाईन उपलब्ध करुन देणे. यामुळे नवीन ग्राहक कंपनीकडे ओढला गेला व या मंदीच्या फटक्यातून सुला वाईन तग धरून बाहेर पडली.

त्यानंतर मात्र पाठीमागे वळून पाहण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. वाईन म्हणलं की सुला हेच नाव भारतात फेमस होवू लागलं. आजची गोष्ट सांगायची तर सुला वाईन तीस हून अधिक देशात निर्यात केली जाते. सुमारे ५०० कोटींचा टर्नओव्हर केला जातो तर भारतीय वाईन उद्योगामध्ये ७० टक्के हिस्सा एकट्या सुला वाईनचा आहे.

मार्केट नसेल तर मार्केट तयार करा आणि क्वॉलिटीवर विश्वास ठेवा या मंत्रावर अशक्य वाटणारी गोष्ट उभा राहू शकली.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.