अशी ही कहाणी महाराष्ट्राच्या अस्मितेची.. भगव्या ध्वजाची..

६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी सर्व शासकिय कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्यात येईल.

अशा प्रकारचे आदेश सरकारकडून सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. मात्र या गोष्टीला विरोध करत ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी संविधानाच्या कलम ३६२ नुसार संपुष्टात आलेली राजेशाही पुन्हा प्रस्तापित करण्यासारखी ही कृती असल्याचं स्पष्ट केलं आहे.

शासकीय कार्यालयांवर भगवा फडकवणं योग्य की अयोग्य या बाबतीत अनेक संमिश्र प्रतिक्रिया आहेत. तुर्तास चर्चा झटतच राहिलं पण भगवा ध्वजाचा इतिहास आपणाला माहितच हवा हे मात्र नक्की.

म्हणूनच हा लेख….

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या शिवछत्रपतींनी ‘भगवा’ आपल्या साम्राज्याचे प्रतीक म्हणून स्वीकारले ते भगवा म्हणजे त्यागाचे प्रतीक. भगवा म्हणजे भक्तीचे प्रतीक आणि शक्तीचे म्हणूनच.

मराठ्यांनी आपली अस्मिता असलेला ‘भगवा’ अफगाणिस्तानच्या सीमेपावेतो नेला. अक्षरशः अर्धा दक्षिण आशिया भगव्याच्या सावलीत एक शतकाहून अधिक काळ सुरक्षित राहिला. याच भगव्याला खाली खेचून करून इंग्रजांचा ‘युनियन जॅक’ संपूर्ण भारतभर फडकला..

आपल्याला विरोध करणारे हेच मराठे आहेत, जोवर यांचे अस्तित्व संपवणार नाही, तोवर आपली सत्ता या भारतावर कधीही प्रस्थापित होणार नाही, याची जाणीव इंग्रजांना शिवाजी महाराजांच्या काळातच झाली होती. पण त्यांच्या प्रयत्नांना दीडशे वर्ष वाट पाहायला लावली ती मराठ्यांनी.. आणि त्या अत्युच्च संघर्षाचा साठी होता ‘भगवा’..

६ जून १६७४. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा दिन..

एका तरूणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना हाताशी धरत स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्या राज्याचा अधिपती म्हणून राज्याभिषेक करवला आणि तमाम रयतेचा पहिला स्वातंत्र्यदिन ६ जून रोजी साजरा झाला.

याच सोहळ्यात शिवरायांनी ‘भगवा ध्वज’ हे सार्वभौम स्वतंत्र स्वराज्याचे निशाण म्हणून मान्यता दिली तर राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी ‘जरीपटका’ फडकवण्याचे ठरवले. ही नोंद खुद्द इंग्रज अधिकारी हेन्री ओक्झेंडन याने करून ठेवली आहे.

जरीकिनार म्हणजे सोनेरी कापडाचा काठ असलेला भगवा ध्वज स्वराज्याचा मानबिंदू झाला. या भगव्या ध्वजाला शिवरायांनी कायम आपल्या मोहिमांमध्ये सोबत बाळगले होते. फौजेच्या आघाडीला ‘शिवछत्रपतींचे निशाण’ म्हणून मराठ्यांनी नाचवले होते.

शिवाजी महाराजांच्या झेंड्याचे जे एकमेव प्रत्यक्षदर्शी वर्णन आग्राभेटीच्या समयीचे आहे. २९ मे १६६६ रोजी परकालदास नामक व्यक्तीने मिर्झा राजा जयसिंग याला लिहिलेलं एक पत्र आज उपलब्ध आहे. डिंगल भाषेत असलेला हा पत्रव्यवहार अतिशय महत्वपूर्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या मोलाचा आहे.

शिवाजी महाराज पहिल्यांदा आग्रा शहरात आले तेव्हा त्यांच्या लवाजम्याची माहिती देताना परकालदास लिहीतो,

“शिवाजीच्या सोबत शंभर अनुयायी आहेत. संरक्षणपथकात दोन-अडीचशे स्वार आहेत. शिवाजी पालखीतून निघतो. त्याच्यासमोर पायी चालणाऱ्या ‘पायदळ’ शिपायांचे पथक आहे. शिवाजीचा झेंडा हा नारंगी रंगाचा असून त्यावर सोनेरी आकृत्या काढलेल्या आहेत. शिवाजीचे सर्व मोठे अधिकारी पालखीतून प्रवास करतात. त्याच्या लवाजम्यात बऱ्याच पालख्या आहेत.’

परकालदास म्हणतो,

सेवाजीकौ नारंजीसी दरीयाई का नीसान सोनहरी छापा चालौ छे जी..

म्हणजे शिवाजी महाराजांचे निशाण नारंगी रंगाचे असून त्यावर सोन्याचे काम केलेले होते. पत्र लिहिणारा परकालदास हा त्यावेळी आग्रा येथे स्वतः हजर होता त्यामुळे त्याने प्रत्यक्ष डोळ्याने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या निशाणाला पाहिले होते, त्यामुळे त्याने केलेल्या वर्णनांविषयी शंका असण्याचे काही कारण नाही.

ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री य.न.केळकर यांच्या म्हणण्यानुसार, जरीपटका हे निशाण भोसल्यांच्या कुळात पूर्वीपासून होते. ‘भोसल्यांचे कुलाचार’ या इतिहाससंग्रहात लिहिलेल्या प्रकरणात पोशाखखाना पोट कलम नं १ वर पुढील आज्ञा आहे,

“दसऱ्याबद्दल वगैरे दागिने जरीपटका व भगवे निशाण व अब्दागिरे व बाण बैरागा व लगी व कावडी हे नवे जाल्यास जुने दागिने गवसणी अस्तरसुद्धा परत जामदारखान्याकडे यावे म्हणून कलाम लिहिले आहे त्याप्रमाणे येत जातील “

म्हणजेच, शिवछत्रपतींनी महत्वाच्या उत्सवावेळी या दोन्ही निशाणांचा वापर करण्याविषयी घालून दिलेला दंडक पुढेही पाळण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर या निशानाला नैवेद्य ही देण्यात येत असे. याच इतिहास संग्रहातील प्रकरणात पुढे एक नोंद आढळून येते, “निशाण भगवे व जरीपटक्यास नैवेद्य येतो, त्यापैकी केसरकर यांस मुंडी व फरा एक, बाकी निम्मे राहील ते भोसले निम्मे व आम्ही निम्मे म्हणोन कलम लिहिले आहे. त्यास शिरस्ता चालत आल्याप्रमाणे करणे.”

म्हणजे ही केवळ सूचना नसून आज्ञा होती. भगव्या ध्वजाचे महत्व यावरून आपल्या सहजपणे ध्यानात येईल.

भगवा म्हणजे त्यागाचे प्रतीक. शिवरायांच्या जन्माआधी तीनशे वर्ष हा भगवा वारकऱ्यांनी आपल्या खांद्यावर पेलला. भक्तीच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांची ओळख हा भगवा झेंडा होता..

महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण एक व्यक्तीची ओळख हा भगवा होता.

शिवरायांचे वडील महाबली शहाजी महाराजसाहेब यांनी दक्षिणेत तंजावूनपर्यंत आपले राज्य विस्तारले. भलेही आदिलशाही दरबारात त्यांची नेमणूक असली तरीही स्वतंत्र राजाप्रमाणे त्यांचे राहणीमान होते. याविषयी सविस्तर वर्णन आपल्याला राधामाधवविलासचंपु मध्ये वाचायला मिळते.

याच शहाजी महाराजांनी आपल्या स्वाऱ्यांच्या वेळेस आघाडीवर भगवा ध्वज ‘निशाण’ म्हणून वापरल्याच्या कितीतरी ऐतिहासिक नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. शिवरायांना लहानपणी शिक्षण, पैसे, हाताखाली काम करण्यासाठी विद्वान कारभारी, स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी मुद्रा आणि त्या राज्याचे निशाण म्हणून ‘भगवा’ देणारे शहाजी महाराजच होते.

अगदी अलीकडच्या काळातील घटना.

भारत स्वतंत्र झाला. भारताची घटना तयार करण्यासाठी एक घटना समिती स्थापण करण्यात आली होती. भारताचा अधिकृत ध्वज काय असावा, याची चर्चा सुरू होती. यासाठी घटना समितीने अजून एक समिती राजेंद्रप्रसादांच्या अध्यक्षतेखाली स्थापित केली. त्यात सी राजागोपालचारी, मौलाना आझाद, सरोजनी नायडू, के. एम. मुन्शी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता.

१० जुलै १९४७ रोजी दिल्लीमध्ये यासंबंधी एक मिटिंग पार पडणार होती. भारताचा अधिकृत ध्वज भगवा असावा, या मागणीला घेऊन अनंतराव गद्रे, रावबहादूर बोले व मराठा मंदिरचे गावंडे बाबासाहेबांना भेटले. दोन भगवे ध्वज त्यांच्याकडे देऊन आपली मागणी बाबासाहेबांसमोर मांडली.

Rao Bahadur C. K. Bole and other activists met with Dr. Ambedkar member of National Flag Committee for requesting him to plead for making the saffron flag as the National Flag of India on 10 July 1947

असं म्हणतात की बाबासाहेब दोन्ही झेंडे घेऊन दिल्लीला गेले. त्या बैठकीत त्यांनी भगव्या ध्वजाच्या बाजूची भूमिका देखील मांडल्याचं सांगितलं जातं. परंतू, घटना समितीत या मागणीला कमी पाठींबा मिळाला. त्यामुळे, भगवा ध्वज भारताचा राष्ट्रीय ध्वज होऊ शकला नाही.

अशी ही कहाणी महाराष्ट्राच्या अस्मितेची.. भगव्या ध्वजाची..
वारकऱ्यांनी भगवा खांद्यावर घेतला..
शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर तो रक्षिला.
थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात भगवा देशाबाहेर नेण्याचे स्वप्न पाहण्यात आले..
इसवी सन १७५६ मध्ये अफगाणिस्तानच्या सीमेवर भगवा फडकत होता.

आणि इसवी सन १६८४ साली तर दिल्लीच्या तख्तावर भगव्याची सावली पडली.. दिल्लीपती मराठ्यांच्या छत्रछायेखाली राहू लागला..

  • भिडू केतन पुरी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.