कधीकाळी कारकून असणाऱ्या भाऊने ब्रिटीशांच्या वास्तुकलेला लाजवेल असा ‘भाऊचा धक्का’ उभारला

गोष्ट अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील. या काळात कोकणातून आलेला एक माणूस आपल्या हुशारीने मुंबईत कामाला लागला. मुंबईचा चाकरमानी होता. काही वर्षातच त्याने कुलाब्यातल्या गनर्केरिएज कारखान्यात कारकून म्हणून जम बसवला. हा कारखाना युद्धाच साहित्य बनवायचा. इथे कॅप्टन रसेल नावाचा एक ब्रिटीश अधिकारी होता. या कॅप्टनचा हा माणूस एकदम खास झाला.

कॅप्टनचा खास होण्याच कारण देखील तसच होतं ? 

झालं अस की, एकदिवशी एका कामगाराने काही गोष्टी चोरल्या. ब्रिटीशांनी आपल्या नियमांप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यास सुरवात केली. ब्रिटीशांचे नियम म्हणजे मारहाण. त्या व्यक्तिला आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला आहे त्याला सोडून द्या अशी मागणी या कारकूनाने ब्रिटीश अधिकारी कॅप्टन रसेल यांच्याकडे केली. कारकूनचा गहिवरलेल मन पाहून ब्रिटीश अधिकारी त्याला ब्रदर म्हणाला, याच ब्रदरचा पुढे भाऊ झाला. 

ही गोष्ट आहे मुंबईचा प्रसिद्ध भाऊचा धक्का बांधणाऱ्या बांधकाम तज्ञ लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ यांची. 

लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य अस त्यांच नाव त्यांचा जन्म उरण नजिकच्या करंजा गावचा. ते गनर्केरिएज या कारखान्यात कारकून होते. तेव्हा मुंबईचं स्वरूप हे एखाद्या मोठ्या खेड्याप्रमाणेच होतं. सात बेटावरून वेगवेगळ्या ठिकाणचे कामगार इथे कामासाठी येत. 

कारकून पदावर काम करत असताना या कामगारांच्या दूपारच्या जेवणाची सोय होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कॅप्टन रसेल यांच्याकडे तशी विनंती केली तेव्हा कॅप्टन रसेल यांनी तूम्हीच ते चालू करून तुम्हीच ते चालवावं अशी ऑफर दिली.   

काही काळातच कॅप्टन रसेल यांच्या कृपेमुळे भाऊंच उपहारगृह सुरू झाल. त्यांच्या निष्ठेमुळे कॅप्टन रसेल त्यांना आपल्या भावाप्रमाणे वागवू लागले.

कॅप्टन साहेबांनी त्यांना नोकरीत बढती तर दिलीच त्यांच्यासाठी व्यापारी क्षेत्र देखील सुरू करून दिलं. 

बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांनी काम करावं म्हणून ब्रिटीशांना आवश्यक असणाऱ्या कामांच कॉन्ट्रक्ट त्यांना मिळवून देण्याची सोय करण्यात आली. पहिल्या टप्यात मुंबईच्या बेटांवर असणारे खोलगट भाग मुजवण्याच काम त्यांच्या कंपनीला मिळालं. हे करत असताना त्यांनी आपल्या नोकरीला रामराम ठोकला आणि पुर्णवेळ बांधकाम व्यावसायिक म्हणून काम पाहण्यास सुरवात केली. 

पुढे मशिद बंदर ते क्राफर्डमार्केट, डोंगरी ते समुद्रसपाटीपर्यन्त भराव टाकणे व रस्ताबांधणीची कामे त्यांना मिळाली. स्थानिक लोकांना भाड्याने जागा देवून विकास साध्य करण्याची युक्ती त्यांनी अंमलात आणल्यानंतर ब्रिटीशांनी त्यांना सढळहस्ते कामे देण्यास सुरवात केली. रस्तेबांधणीच्या आपल्या कामामुळे भाऊ काही वर्षातच “बांधकाम व्यावसायिक” म्हणून गणले जावू लागले. 

मुंबई हे नैसर्गिक बंदर होते मात्र इथे धक्का नव्हता.

लहान मोठे मचवे आणि गलबत्ताद्वारेच वहातूक होतं असे. मालाची चढउतार करण्यासाठी धक्का नसल्याने मोठी जहाजे दूर उभा रहात तिथून चिखलातल्या पाण्यातून किनारी यावे लागत असे. अशा वेळी मोठे सामान आत घेवून येणं हे सर्वात मोठ्ठ कष्टाचं काम होतं. व्यापार वाढू लागला तसं ब्रिटीशांनाही धक्क्याची गरज जाणवू लागली. पण हे काम प्रचंड खर्चीक असल्याने रखडलेलच होतं. 

भाऊंनी या कामासाठी अर्ज करण्याची तयारी केली. भाऊंच्याकडे साठलेले सर्व पैसे या कामात खर्च करावे लागणार होते. काम पुर्ण झाले नसते तर सर्व ऐश्वर्य गेले असते. तरिही त्यांनी धाडस करुन मोठ्या कामात हात घालण्याचं ठरवलं. 

भाऊंनी समुद्राची भरती आणि ओहोटीचा अंदाज घेतला होता. त्यानुसार त्यांनी नियोजन केले होते. ब्रिटीशांनी नवख्या भाऊंवर विश्वास टाकला आणि त्यांना कामाची मंजूरी दिली. 

किनाऱ्यावर मातीचा भराव टाकून टिकणार नाही हे त्यांना माहित होते. याविरुद्ध कचऱ्याचा भराव टाकला तर तो पाण्यामुळे लगदा होवून चिटकून राहतो याचा अंदाज भाऊना होता. रॉबर्ट ग्रॅंट यांच्याकडून ६ टक्के चक्रवाढ दराने दिड लाखांच कर्ज करून त्यांना या कामास सुरवात केली. कर्जाच ओझ आणि बदलणारे नियम. त्यात स्थानिक लोकांचा विरोध या सर्व अडथळ्यांवर मात करत भाऊंनी चार वर्षांत धक्क्याच काम पुर्णत्वास नेलं. 

धक्याच्या बांधकामात वखार बांधून वखार असणारं भारतातलं पहिलं बंदर उभा करण्याच काम देखील त्यांनी केलं.

भाऊंच हे काम पाहून कंपनीने त्यांना पुढील पन्नास वर्षांसाठी मालाची चढ उतार करण्याचा मक्ता बगाल केला. 

त्यामुळे या बंदरला भाऊचा धक्का हेच नाव मिळाले. पुढे मुंबईच्या गव्हर्नरपदी जेम्स कॉरनॅक आले. त्यांच नाव या धक्क्याला द्यावं अशी शिफारस भाऊंनीच केली. त्यांच्या इच्छेप्रमाणे धक्क्याचं नाव कॉरनॅक अस करण्यात आलं तरिही लोकांसाठी तो भाऊचा धक्काच राहिला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.