रोहिणी भाजीभाकरेंनी दाखवून दिलंय आयएएस होवून प्रवास संपत नसतो…

काही वर्षांपूर्वी युपीएससी पास झालेल्या मुलांचा सत्कार समारंभ ऐकत होतो. अनेकजण नव्याने IAS, IPS झाले होते. प्रत्येकजण आपला संघर्ष, अभ्यास करण्याची पद्धत, घेतलेले कष्ट, किती चिकाटीने इथपर्यन्त आला हे सांगत होता.

अशातच एक मुलगा उभा राहिला. त्याचं पहिलं वाक्य होतं,

UPSC पास होणं हे माझ्या आयुष्यातलं अंतीम ध्येय होतं

खरं सांगू या वाक्यामुळे वाईट वाटलं, भावा खरा संघर्ष इथूनच तर सुरू झालाय. आत्ता तर तुला अडल्यानडलेल्या लोकांसाठी लढायचं आहे. त्या संघर्षांची हीच तर पहिली पायरी होती ना भिडू. असो. तर दरवर्षी युपीएससी पास झाल्यानंतर मुलामुलींच्या सक्सेस स्टोऱ्या होतात व ते वेगवेगळ्या राज्यात पुढच्या कारभारासाठी जातात.

काहीजण आपल्या कामामुळे चर्चेत राहतात तर काहीजण पाट्या टाकण्याचे काम करतात. बरीच लोकं अशा अधिकाऱ्यांना विसरून जातात.

पण महाराष्ट्राच्या मातीतून पुढे येणारी एक अधिकारी अशीही आहे जी सातत्याने दाखवून देते की, 

UPSC पास होवून थांबायचं नसतं…

शेतकरी कुटुंबातील एक मुलगी लहानपणी आपल्या शेतकरी वडिलांवर होत असलेला अन्याय बघून मोठे होऊन जिल्हाधिकारी होण्याचा निश्चय करते. निश्चय करून ती नुसतं जिल्हाधिकारीच होत नाही तर, जिथे २२७ वर्षाच्या इतिहासात कुणी महिला जिल्हाधिकारी बनलेली तिथली ती जिल्हाधिकारी बनते, तिथल्या लोकांची जिल्हाधिकारी बनते.

ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील उपळाई गावच्या रोहिणी भाजीभाकरे तरुणीची.

रोहिणी यांचा जन्म उपळाई गावात एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच एका सरकारी शाळेत झाले. वडील शेतकरी असल्याने शेतकऱ्यांना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात हे त्या लहानपणापासूनच बघत होत्या.

एकदा न राहून त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला की,

शेतकऱ्यांच्या या समस्यांना जबाबदार कोण ? त्यांच्या वडिलांनी उत्तर दिले ‛जिल्हाधिकारी’.

बस त्याचक्षणी त्यांनी मोठे होऊन जिल्हाधिकारी होण्याच्या निर्णय घेतला.

तेव्हा त्या अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या. पुढे सोलापूरला जाऊन १२ वी पास झाल्या आणि नंतर पुण्यातील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीई कॉम्प्युटर पूर्ण केलं. शिक्षणात त्या लहानपणापासूनच अव्वल होत्या.

इंजिनिअरिंग पूर्ण जॉबला न लागता त्यांनी युपीएससी चा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि २००८ च्या बॅच मधून त्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. यासाठी त्यांनी कधीच कुठल्याही खासजी कोचिंग क्लासेसचा आधार घेतला नाही.

IAS ची ट्रेनिंग घेत असताना त्यांच्या वडिलांनी त्याने सांगितले होते की,

“आता अधिकारी झाल्यावर तुझ्या टेबलावर असंख्य फायली असतील. तेव्हा त्या फाईल्सकडे नुसतं पेपर समजून बघू नको. लक्षात ठेव, तुझी एक सही लाखो लोकांचे जीवन बदलेल आणि वाटोळं ही करू शकेल. तेव्हा प्रत्येक वेळी लोकांसाठी चांगले काय याचा विचार कर.”

पास आऊट झाल्यानंतर रोहिणी यांची पहिली पोस्टिंग तामिळनाडू मधील मदुराई येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली.

त्यांनी सांगितले की,

तामिळनाडू मध्ये बाहेरील अधिकारी फक्त इंग्लिश आणि हिंदी वर काम करू शकत नाही. तामिळ भाषा येणे आवश्यक आहे. मी तामिळ भाषा शिकेपर्यंत पहिली पाच-सहा महिने मला काम करणे फार कठीण गेले. पण आता मी शिकले आहे आणि स्थानिक लोकांशी सहज संपर्क साधू शकते.

त्यानंतर त्यांना टिनडीवनमच्या उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. याचदरम्यान २००५ च्या IAS IPS बॅचचे अधिकारी असलेल्या विजयेंद्र बिदारी यांची ओळख झाली. ओळखची रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्नही केले.

गर्भवती असताना घेतलेली सुट्टी संपल्यावर त्यांना चेरनमहादेवीची उपजिल्हाधिकारीची पोस्ट देण्यात आली. त्यानंतर त्या अपर जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा मदुराईला परतल्या.

त्यांच्या अथक परिश्रमाला दाद मिळाली ती २०१६ च्या ऑगस्ट महिन्यात तेव्हाचे राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर याच्या हस्ते देण्यात आलेल्या एक्सलेंस इन इम्प्लीमेंटेशन ऑफ मनरेगा अवॉर्डच्या रूपाने.

ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण करणारा तो दिवस उजाडला.

त्यांना तामिळनाडू मधील सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या नियुक्तीने एक इतिहास घडला. १७० पुरुष अधिकाऱ्यानंतर सेलम जिल्ह्याला रोहिणी यांच्या रूपाने पहिल्या महिला जिल्हाधिकारी मिळाल्या होत्या.

सेलम जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक राष्ट्रपातळीवर देखील करण्यात आल.

सेलमला तामिळनाडूचा पहिला हागणदारीमुक्त जिल्हा बनवण्याचा विक्रम देखील त्यांनी केलाय. शेतकऱ्याच्यासाठी विशेष लक्ष देऊन विकास कामांची अमंलबजावणी त्या करु लागल्या. वडील शेतकरी असलेल्याची जाण त्या कधीच विसरत नाहीत.

१५ ऑगस्ट २०१९ ला नॅशनल जिओग्राफी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने भारताची निवडणूक प्रक्रिया जगाला सांगण्यासाठी ‘द ग्रेट इंडियन इलेक्शन’ या कार्यक्रमच आयोजन केलं होतं. यासाठी त्यांनी संपूर्ण भारतातून दोन जिल्हाधिकाऱ्यांची करण्यात आली होती त्यामध्ये रोहीणी भाजीभाकरे यांचा समावेश होता. 

आत्ता त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी १५ ऑक्टोंबर रोजी जागतिक हात धुवा दिवस साजरा केला जातो. या घटनेचे औचित्य साधून २०१८ साली त्यांनी ४ हजार २४ नागरिकांना एकत्र करुन उपक्रम राबविला होता. त्याचीच नोंद आत्ता गिनीज बुक मध्ये करण्यात आली. 

हे ही वाच भिडू.

5 Comments
  1. prafullkumar says

    Proud of you … And salute her

  2. Sanket Kamthe says

    Very helpful, motivative & impressive

  3. Vaishnavee says

    Nice motivation madum I am proud of you

  4. Vishal says

    Corrupt ias vr liha

  5. Bhagyesha Kurane says

    Proud of her but one small correction , she joined private classes.She was student of Honorable Pravin Chavan Sir.

Leave A Reply

Your email address will not be published.