एमबीबीएस डॉक्टर, पण आदिवासींसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तुडवतोय रानवाटा !
अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यातलं उपजिल्हा रुग्णालय. कुपोषित मुलांनी खचाखच भरलेलं. आपल्या कुपोषित मुलांना घेऊन आई वडील जागा दिसेल तिथे पसरलेले. इथला प्रत्येक कर्मचारी आज दुप्पट क्षमतेने काम करतोय, कारण ५० बेडची क्षमता असलेल्या या रुग्णालयात तब्बल १२० कुपोषित मुलं उपचार घेत आहेत.
वॉर्डन, कंपोण्डर, नर्स, डॉक्टर सगळे दिवस रात्र नुसते राबत असतात. परिणामी सगळे कर्मचारी आणि डॉक्टर सुद्धा इथून कधी बदली मिळेल यासाठी सतत प्रयत्नशील असतात. यासाठी कधी नोकरी सुटली तरी बेहत्तर अशी त्यांची मानसिकता असते. पण याला अपवाद आहे. नुकताच एमबीबीएस झालेला २४ वर्षांचा एक उमदा डॉक्टर विपीन खडसे..!
काही दिवसांपूर्वीच आलेल्या वृत्तानुसार अनेक डॉक्टर कोट्यावधींचा दंड भरायला तयार आहेत. पण ग्रामीण भागात आणि खेड्यात जाऊन नोकरी करायची त्यांची तयार नाही. महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात ४४०० डॉक्टरांनी खेड्यात जायला नकार दिलाय. ग्रामीण भागातल्या ६९ टक्के नागरिकांसाठी फक्त २० टक्केच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतात ही धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलीये. आशा परिस्थितीत स्वेच्छेने ग्रामीण भागाची वाट धरणारे डॉ. विपीन खडसेंसारखे डॉक्टर आशेचे किरणच म्हणावे लागतील.
विपीन खडसे हे मूळचे अकोला जिल्ह्यातल्या मलकापूरचे. घरी तीन एकर शेती, वडील त्यातच राबणारे. आई गृहिणी. अशाही परिस्थितीत वडील भगवानराव खडसे यांनी मुलांना चांगलं शिकवण्याचा निर्णय घेतला आणि घर अकोल्यात हलवलं. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी विपिनने एमबीबीएसला प्रवेश मिळवला. घरात आनंदोत्सव आणि जल्लोष झाला.
विपीन नागपूरच्या जेएमसी मेडिकल कॉलेजमध्ये शिकू लागला. मुलगा डॉक्टर झाल्यानंतर घरी सुबत्ता येईल याची स्वप्न आई वडील पाहू लागले. पण इकडे विपीनच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार फेर धरू लागले. दरम्यानच्या काळात विपीन मेळघाटात असलेल्या डॉ. आशिष सातव यांच्या ‘महात्मा गांधी आदिवासी दवाखान्यात’ सेवा देण्यासाठी जाऊन आला. याच ठिकाणी त्याच्या मनात आदिवासींची दुःख घर करू लागली आणि त्याने निर्णय घेतला की बस्स आता इथून पुढे आदिवसिंसाठी स्वतःला झोकून द्यायचं.
विपीनचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालं आणि विपीनला जळगावच्या जिल्हा रूग्णालयात नोकरी मिळाली. दुसरा कुणी असता तर शहराच्या ठिकाणी नोकरी मिळाल्याने आनंदी झाला असता, मात्र विपीन नाराज झाला. त्याने डॉ. आशिष सातव यांना गाठलं आणि जळगावच्या जिल्हा रुग्णालयातून आदिवासी बहुल धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात ट्रान्सफर मिळावी यासाठी गळ घातली गेली. हा पहिला असा प्रकार असावा की एक एमबीबीएस झालेला तरुण डॉक्टर चांगल्या शहरातील नोकरी नाकारून ग्रामीण भागात जाण्याचा हट्ट धरत होता.
विपीनच्या अपेक्षेप्रमाणे महिन्याभरातच त्याला ट्रान्सफर मिळाली आणि हा पठ्ठ्या धारणीत दाखल झाला जळगावच्या जिल्हा रुग्णालयातून आलाय म्हटल्यावर इतर सहकाऱ्यांनी कपाळावर हात मारला पण याचा मात्र चेहरा उजळून निघालेला. आता विपीन खडसे धारणीच्या रुग्णालयात जीव लावून रुग्णसेवा करतोय.
एखाद्याला आवडीचं काम मिळावं आणि त्यात लाख पटीचं समाधान मिळावं अशा पद्धतीने रोजचे शंभर ते एकशे वीस रुग्ण तपासणं, त्यांची शुश्रूषा करणं आणि सर्वांशी आस्थेवाईकपणे वागणं यामुळे विपीनने अख्ख रुग्णालय जिंकून घेतलंय. पूर्वी आपल्या मुलांसाठी धास्तवलेले पालक आता विपीनच्या येण्याने निर्धास्त झालेत. अख्ख रुग्णालय टेन्शन फ्री झालंय.
एवढ्यावरच थांबेल तो विपिन कसला..? सध्या तो दोन रुग्णालयात अथकपणे काम करतोय. धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात पूर्ण नाईट काम केल्यानंतर, तो पुन्हा डॉ. आशिष सातव यांच्या महात्मा गांधी आदिवासी रुग्णालयातही विनामोबदला रुग्ण सेवा देतोय. सकाळी साडेसातला शिफ्ट संपल्यानंतर तो १२ वाजेपर्यंत अराम करतो आणि दुपारच्या १२ नंतर तो महात्मा गांधी आदिवासी रुग्णालय गाठतो.
रुग्णालयाची अँब्यूलन्स घेऊन गावोगावं फिरणं, तिथले कुपोषित मुलं तपासणं, आवश्यक तिथे औषधोपचार करणं आणि जर पेशंट क्रिटिकल असेल तर त्याच अँब्यूलन्सने पेशंटला रुग्णालयात आणून अॅडमिट करून घेणं, हे आता विपिनसाठी नित्याचंच झालंय. विपीनच्या या भागात जाण्याने आदिवासींना देवदूत भेटलाय असंच वाटत राहतं.
विपिनला मात्र स्वतःला देवदूत म्हणवून घेणं आवडत नाही. या भागातले प्रश्न खूप जटील आहेत आणि आपल्याला अजून खूप काम करायचंय, असं तो विनम्रपणे सांगताना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणखी खूप हातांची मदत लागणार असल्याची गरज देखील तो बोलून दाखवतो.
ग्रामीण भागात प्रशिक्षित सर्जन नसल्याने कसा लोकांना आपला जीव गमवावा लागतो यासंबंधीचा आपलाच एक अनुभव विपिन सांगतो. एकदा पोटातच अॅपेंडीक्स फुटलेला एक आदिवासी रुग्ण त्याच्या रुग्णालयात आला होता. पण रुग्णालयात जनरल सर्जनच नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आजतागायत कुठल्याच जनरल सर्जनने धारणीत येऊन नोकरी करण्याचं सौजन्य दाखवलेलं नाही.
विपीन सर्जन नसल्याने त्याने आपल्याकडे आलेला पेशंट अमरावतीला रेफर केला. खरं तर वाटेतील सातपुडा पर्वत रांग, अवघड चढण आणि चार तासांचा कठीण प्रवास करून पेशंट जगणार नाही, याची त्याला खात्रीच होती. त्यामुळे अँब्यूलन्समधून स्वतः विपिन पेशंटसोबत गेला. पण लाख प्रयत्न करूनही पेशंटचे प्राण वाचवता आले नाही. धारणीत जनरल सर्जन असता तर त्या पेशंटला वाचवता आलं असतं. जनरल सर्जनचं मास्टर्स केलेला डॉक्टर गलेलठ्ठ पैसे कमावण्यासाठी शहरातच ठाण मांडून बसतात भलेही कितीही दंड सरकारला भरावा लागो.
परिस्थितीसमोर हात टेकायचे नाही आणि आपल्याला करता येतील तितके प्रयत्न करत राहायचे हे मनाशी पक्कं केलेल्या विपिनने आता स्वतःच जनरल सर्जन करायचा निर्णय घेतलाय. या वर्षाच्या शेवटी मास्टर्सला जायचं आणि त्यानंतर जनरल सर्जन पूर्ण करून पुन्हा एकदा मेळघाटात दाखल व्हायचं असं त्याने ठरवलंय.
अस्वलाने तोडलेले, वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले किंवा इतरही कठीण सर्जरीचे रुग्ण विपिनला बरे करायचेत. त्यासाठीच त्याला स्वतःला वाहून घायचंय. पण त्यासाठी तो स्वतःचा वेगळा दवाखाना न उघडता सरकारी इन्फ्रास्ट्रक्चरचाच उपयोग करू इच्छितोय. या संपूर्ण कामात त्याचे आईवडीलही पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहेत. सुबत्ता वगैरे असली फुटकळ स्वप्न आता त्यांनीही बाजूला ठेवलीत.
सोशल मीडियाच्या जमान्यात आणि सगळीकडे कॉर्पोरेटायझेशन झालेल्या झमगटाच्या जगात एक उच्चविद्याविभूषित मुलगा भरमसाठ पैसे कमवून ऐशोआरामीने जगायचं सोडून दुर्लक्षित वंचित जंगलाच्या वाटा तुडवायचं म्हणत असेल तर ही एक थक्क करणारी बाब आहे. डॉ. विपीन खडसे सारख्या नवख्या आणि उमद्या डॉक्टरला सलाम करावा तितका तोकडा पडणारा आहे.
दत्ता कानवटे, औरंगाबाद.
- लेक वाचविण्यासाठी घरदार पणाला लाऊन धडपडणाऱ्या अवलिया माणसाची गोष्ट !!!
- चीनमधला सर्वात आदरणीय मराठी माणूस, ज्याच्या सन्मानार्थ चीन सरकारने पुतळा उभारलाय !
- माय नेम इज गोविंदाप्पा वेन्कटास्वामी उर्फ डॉ. व्ही.
- ज्या मराठवाड्यातल्या पोराचं कौतुक इंग्लडच्या युवराजानं केलेलं, त्याचा आज मात्र रावण झालाय !