क्रिकेट इतिहासातले ३ प्रसंग ज्यावेळी, खेळाडूऐवजी टीमला ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आला !

मॅन ऑफ द मॅच. 

मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा हा पुरस्कार. हा पुरस्कार साधारणतः सामना विजेत्या संघाच्या खेळाडूच्याच पदरात पडताना आपल्याला दिसतो. अर्थात काही वेळा खूपच असाधारण कामगिरी केलेली असेल तर सामना गमावलेल्या संघाच्या खेळाडूच्या कामगिरीचा गौरव देखील या पुरस्काराने करण्यात येतो. 

एकूणच काय तर ‘मॅन ऑफ द मॅच’ विजेता खेळाडू हा त्या सामन्याचा हिरो असतो. मग तो विजेत्या संघातील असो किंवा पराभूत संघातील असो. पण तुम्हाला माहित्येय का की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात फक्त ३ वेळा असं झालंय की हा पुरस्कार कुण्या एका खेळाडूला न देता संपूर्ण संघाला देण्यात आला. 

न्युझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज.

क्रिकेटच्या इतिहासात असा पहिला प्रसंग घडला ३ एप्रिल १९९६ रोजी.  न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होता. ५ सामन्यांच्या सिरीजमध्ये वेस्ट इंडीजने २-१ अशी आघाडी घेतली होती आणि मालिकेत टिकून राहण्यासाठी चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला विजय अत्यावश्यक होता.

वेस्ट इंडीजचा कॅप्टन कर्टनी वॉल्शने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करायचं ठरवलं. वेस्ट इंडीजच्या संघाने न्यूझीलंडला अवघ्या १५८ रन्समध्ये गुंडाळलं. ४१ रन्ससह स्पिरमॅन हा त्यांच्याकडून सर्वाधिक रन्स काढणारा खेळाडू ठरला. 

nzvsindies

वेस्ट इंडीजसाठी हे लक्ष अगदीच मामुली वाटत होतं. वेस्ट इंडीज सहज या रन्स काढून सिरीज खिशात घालणार असंच सगळ्यांना वाटत होतं. अडखळत झालेल्या सुरुवातीनंतर वेस्ट इंडीजने विजयाकडे वाटचाल करायला सुरुवात केली होती, पण नंतर न्युझीलंडच्या शिस्तबद्ध आक्रमणासमोर त्यांचा डाव १०५-४ रन्सवरून १२०-८ असा कोसळला. 

नवव्या विकेटसाठी रिक होल्डर (४९) आणि अॅम्ब्रोस (१६) यांनी ३२ रन्सची पार्टनरशिप केली पण ते वेस्ट इंडीजचा पराभव टाळू शकले नाहीत. अॅम्ब्रोस गेल्यानंतर आलेला वॉल्श फक्त १ रन काढू शकला आणि वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १५४ रन्सवर गडगडला. 

न्यूझीलंडने कुठल्याही एका खेळाडूच्या जोरावर नाही तर सांघिक प्रयत्नाच्या आधारे हा विजय खेचून आणला होता, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण संघाला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. 

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड.

१९९६ सालच्याच सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा असं घडलं की एखाद्या संघाला ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आला. ‘मॅन ऑफ द मॅच’ विजेता संघ होता पाकिस्तान.

३ सामन्यांच्या सिरीजमधला शेवटचा मॅच होता. इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना स्कोअरबोर्डवर सन्मानजनक २४६ रन्स लावले होते. यात निक नाईटच्या १२५ रन्सच्या इनिंगचं महत्वाचं योगदान होतं. 

pak vs england

२४६ रन्सचा पाठलाग पाकिस्तानने अगदी आरामात सुरु केला होता. मात्र एक वेळ अशी आली की त्यांची इनिंगची  १७७-२ वरून १९९-६ अशी घसरगुंडी झाली. पण तळाला रशीद लाफितने खेळलेल्या संयमित इनिंगच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना २ बॉल आणि २ विकेट्स शिल्लक ठेऊन जिंकला. 

या सामन्यात देखील पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूचं काही ना काही योगदान असल्याने संपूर्ण संघाला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलं. दरम्यान या निर्णयावर टीका देखील झाली. अनेकांनी ‘मॅन ऑफ द मॅच’ निक नाईटला मिळायला हवी होती, असं मत व्यक्त केलं होतं. 

वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका.

संपूर्ण संघाला ‘मॅन ऑफ द मॅच’ जाहीर होण्याचा तिसरा आणि शेवटचा प्रसंग घडला १९९९ साली. वेस्ट इंडीजच्या आफ्रिका दौऱ्यातील सेंच्युरीअन येथे खेळवल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात. हा सामना जिंकून आफ्रिकेने पाच सामन्यांची सिरीज ५-० अशी जिंकली होती. 

वेस्ट इंडीजसाठी हा दौरा आणि त्यातली त्यात सेंच्युरीअन कसोटी तर अगदी दुस्वप्न ठरली होती. कारण या कसोटीत ३५१ रन्सनी झालेला पराभव हा त्यांचा तोपर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला होता. 

aafrikan team

या सामन्यात देखील दक्षिण आफ्रिकेच्या विजयात त्यांच्या जवळपास सर्वच खेळाडूंचं अतिशय महत्वाचं योगदान राहिलं होतं. त्यामुळे ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून कुणाला निवडायचं हा एक प्रश्नच होता. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण संघालाच ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलं. 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं होतं की संपूर्ण संघाला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जाहीर झाला होता. 

हे ही वाचा. 


Leave A Reply

Your email address will not be published.