सरकारकडून वीज घेण्याऐवजी हे गावच सरकारला वीज देऊन पैसे कमवतंय

स्मार्ट व्हिलेज योजना. जी केंद्र सरकारकडून चालवली जाणारी महत्वाकांक्षी योजना आहे. महात्मा गांधींच्या आदर्श ग्राम आणि ग्राम स्वराज या संकल्पनेतून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मार्ट गावाचा उपक्रम सुरु केला. ज्या अंतर्गत गावातल्या मूलभूत अडचणी दूर करून, तिथल्या लोकांना डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे सक्षम करून गाव स्मार्ट बनवायची.

या योजने अंतर्गत तशी काम सुद्धा सुरु झाली. अनेक गाव यात सामील झाली तर अनेकांनी गाव दत्तक घेऊन या योजनेवर काम करायला सुरुवात केली. ज्याचा परिणाम म्हणजे आतापर्यंत १९ राज्यांमधली ६२ गाव ही स्मार्ट व्हिलेज (smart village) बनलीत. ज्यांनी आपल्या भागातले बहुतेक प्रॉब्लेम सोडवलेत.

पण भिडू ओदंथुरई हे असं गाव आहे ज्यानं स्वतःचाचं  नाही तयार अख्ख्या देशाचा प्रॉब्लेम सोडवत स्मार्ट व्हिलेजचा किताब आपल्या नावे केलाय.

ओदंथुरई हे गाव तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील मेट्टापलायम तालुक्यातलं. ज्यांनी काही वर्षातचं मेट्रो सिटीला सुद्धा चाट पाडलंय. पण २० -२५ वर्षांपूर्वी जर पाहिलं तर देशातल्या जश्या बाकीच्या गावांची अवस्था तशीच ओदंथुरईची सुद्धा होती. म्हणजे पायाभूत सुविधांची कमतरता, शौचालयांचा अभाव, विजेचा तुटवडा, स्वच्छ पिण्याचा पाण्याचा प्रश्न  ऐरणीवर आणि गरिबी तर कॉमनचं. पण जसा पिक्चरमध्ये इंटर्वल असतो ज्यांनंतर अख्खा पिक्चरच बदलतो. तसेच या गावासोबत झालं.

१९९६ साली गावात बदलाची सुरुवात झाली. गावात बदल घडवूनचं आणू असा विडा गावकऱ्यांनी उचलला. गावाला स्मार्ट बनवण्यासाठी एक पंचायत तयार करण्यात आली ज्याचे अध्यक्ष झाले आर. शनमुगम.

या पंचायतचं एकचं टार्गेट होत. सरकारनं दिलेल्या निधीचा गावाच्या विकासासाठी पुरेपूर वापर  करणं.

मग काय गावातल्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात झाली. म्हणजे गावातली कौलांची आणि पेंड्यांचं छत असलेली घरं पडून ती काँक्रीटकरण्यात आली, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतः वेगवेगळे उपक्रम राबवले, प्रत्येक घराला शौचालय कंपल्सरी केलं. शासनाच्या मदतीने मिळालेलं पैसे त्यांनी या सगळ्या गोष्टींवर खर्च केले पण त्यातून सुद्धा ४० लाखांच्या आसपास पैसे शिल्लक राहिले.

आता गावात विजेचा प्रश्न तर होता, पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असा निणर्य शनमुगम आणि पंचायतीने घेतला. आणि उरलेले पैसे वापरून पवनचक्की उभारण्याचा विचार केला. पण त्यासाठी दीड कोटींची गरज होती. आता सरकारी योजना परत मिळणं महाकठीण काम त्यामुळे बाकीच्या रकमेसाठी त्यांनी कर्ज घेतलं आणि पवनचक्की गावात आणलीचं.

पंचायतीने कर्ज घेऊन रिस्क तर घेतली पण गावातला विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावला. पण महत्वाचं म्हणजे जसं आपल्या सगळ्यांना सरकार वीज देत तस या गावाबाबत उलट आहे. सरकारने या गावातल्या लोकांना वीज देण्याच्या ऐवजी या गावानं तामिळनाडू वीज मंडळाला वीज द्यायला सुरुवात केली. आणि त्यातून नफा कमवायला सुरुवात झाली. मग काय बघता बघता २०१७ पर्यंत गावकऱ्यांनी पवनचक्कीसाठी घेतलेलं कर्ज फेडून टाकलं. 

ओदंथुरई गाव तामिळनाडू वीज मंडळापासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. गावाला २५ टक्के वीज सौर पॅनेलमधून आणि बाकीची पवनचक्क्यांमधून मिळते.

आता या गावाला स्मार्ट व्हिलेज म्हणण्यामागचं कारण म्हणजे या मिशनच्या ज्या काही टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, त्या सगळ्यात हे गाव खरं उतरलंय. म्हणजे गावात कोणताच माणूस असा नाही ज्याला स्वतःच घर नाहीये आणि साधं शुद्ध नाही तर सिमेंट- क्रॉंक्रिटचं घर आहे.

गावकऱ्यांनी गावातल्या गरीब आदीवासी समाजासाठी ८५० घरं बनवलेत. महत्वाचं म्हणजे असं म्हणतात ओदंथुरई हे देशातील पहिलं असं गाव आहे जिथे एकही व्यक्ती उघड्यावर शौचालयाला जात नाही. आणि त्याहून कमाल गोष्ट म्हणजे टॅक्स देण्यात सुद्धा गाव मागे नाहीये.

प्रत्येक सरकारी योजना इथे काटकोरपणे लागू केली जाते. गावकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी वेगेवगेळे उपक्रम राबवले जातायेत. दूधविक्रीसाठी पंचायतीने दूध विभागाशी करार केलाय. शुद्ध पाण्याबद्दल बोलायचे झाले तर १९९९ साली गावात जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली, ज्याच्यामदतीने प्रत्येक गावकऱ्याला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातोय. 

या गावाच्या विकासात जितकी महत्वाची भूमिका तिथल्या पंचायतीची आहे, तितकीच तिथल्या गावकऱ्यांची. म्हणजे गावातले रस्ते बघाल कुठल्याच ठिकाणी कचरा सापडणार नाही. इथे कचऱ्यासाठी एक चांगली सिस्टीम लागू करण्यानं आलीये.

आपल्या सगळ्या या उपक्रमांमुळेच आणि एकीमुळे ओदंथुराई हे गाव फक्त भारताचं नाही तर सगळ्या आशियातल्या सर्वोत्तम स्मार्ट गावांपैकी एक आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.