बाळासाहेबांच्या एका चिठ्ठीवर सलमान खान एकपात्री प्रयोगाच्या कार्यक्रमाला हजर झाला !

बाळासाहेब ठाकरे आणि सिनेकलावंत हे एक अनोख समीकरण होतं. सुपरस्टार दिलीपकुमार, राज कपूर यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. लता मंगेशकर त्यांना आपला मोठा भाऊ मानायच्या. अमिताभ बच्चनला त्याच्या अपघातावेळी बाळासाहेबांनी केलेली मदत तो आजही विसरू शकलेला नाही.

संजय दत्त जेव्हा बॉम्बस्फोट प्रकरणात अडकला त्यावेळी सुनील दत्त यांनी त्याला बाळासाहेबांच्या पायाशी घातला होता. मराठी सुपरस्टार दादा कोंडके तर बाळासाहेबांचे भक्त होते. त्यांनी शिवसेनेच्या अनेक सभा गाजवल्या होत्या.

बाळासाहेबांनी फक्त मोठे कलाकारच नव्हे तर या इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या ज्युनिअर आर्टिस्ट, कामगार, तंत्रज्ञ यांचे सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

त्यामुळे बाळासाहेबांची विनंती म्हणजे त्याकाळात आदेशच मानलां जायचा.
असाच एक गमतीदार किस्सा जेष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांनी एके ठिकाणी लिहून ठेवला आहे.

शिरिष कणेकर यांचा माझी फिल्लमबाजी नावाचा एकपात्री प्रयोग त्या काळात खूप प्रसिद्ध होता. तर झालं असं की या नाटकाचा एक महोत्सवी प्रयोग होता. महोत्सवी प्रयोग म्हटल्यावर त्याला तसाच मोठा सेलीब्रेटी प्रमुख पाहुणा म्हणून लागणार होता. शिरीष कणेकर यांनी खूप जणांना संपर्क करुन पाहिलं पण काही ना काही कारणास्तव कोणताच सेलिब्रिटी तयार होत नव्हत.

जशी जशी तारीख जवळ येत होती तस कणेकरांच टेन्शन वाढू लागलं होतं. शेवटचा पर्याय म्हणून ते बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेब कणेकरांच्या नर्मविनोदी शैलीच्या लिखाणाचे चाहते होतेच, शिवाय “माझी फिल्लमबाजी” त्यांना खूप आवडल होतं.

कणेकरांना पाहताच बाळासाहेबांनी विचारलं,

“काय काम काढल?

कणेकर म्हणाले “माझी फिल्लमबाजी” च्या महोत्सवी प्रयोगासाठी फिल्मस्टार सेलिब्रिटी प्रमुख पाहुणा म्हणून हवा आहे. पण कोणी तयार होत नाही.

त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली की सलमान खान मिळवून द्या.

आता मराठी एकपात्री प्रयोगाच्या कार्यक्रमाला डायरेक्ट सलमान खान ?

बाळासाहेब काही बोलले नाहीत. त्यांनी तिथल्या तिथे पत्र लिहायला घेतलं. शिवसेनेच्या लेटरहेडवर लिहिलेल्या पत्रात सुवाच्च अक्षरात मराठीत लिहिलं होत.

“प्रिय सलमान खान यांस…”

हे पत्र घेऊन कणेकरांचा मित्र सलमानच्या पर्सनल सेक्रेटरीला भेटला. ती चिट्ठी बघून तो उडालाच !

त्यान दबून विचारलं “बालासाब खुद आनेवाले है क्या?”

कणेकरांनी बाळासाहेबांना काही बोलावलं नव्हतं तरी त्यांच्या मित्राने थाप ठोकली

“अर्थातच ते येणार”.

कणेकराना मात्र विश्वास नव्हता की सलमान खान येईल, कारण निमंत्रण असंच अनौपचारिकरीत्या दिल होतं. सलमान खान सारखा सुपरस्टार एवढ्या छोट्या कार्यक्रमाला कशाला येईल म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणी आपला मित्र राजेश खन्नाला तयार केलं.

कार्यक्रमाच्या दिवशी राजेश खन्ना वेळेत आला.

सलमान येणार नाही गृहीत धरून कार्यक्रम सुरु झाला. राजेश खन्ना आणि शिरीष कणेकर यांची स्टेजवर जुगलबंदी सुरु होती. आणि अचानक स्टेजमागे विंगेत गलबला सुरु झाला,

“सलमान आला. सलमान आला”.

कणेकर म्हणतात,

“सलमान जत्रेत हरवलेल्या मुलासारखा भांबावलेला दिसत होता. त्याला कळतच नव्हते की आपण कुठे आलोय, नेमका कसला कार्यक्रम चाललाय.”

तेवढ्यात स्टेजवर राजेश खन्नाला बघून त्याच्या जीवात जीव आला. मग मात्र त्याने प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटातलं अभिवादन स्वीकारत मंचावर एन्ट्री केली. आल्या आल्या फिल्मी स्टाईलमध्ये आपल्या सिनियर असलेल्या राजेश खन्नांचे पाय धरले. उगीचच जुनी ओळख असल्यासारखं स्माईल देत कणेकरांना शेक हॅण्ड केलं.

त्यानंतर तो थेट माईक कडे गेला. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याने मैने प्यार किया मधला गाजलेला डॉयलॉग म्हणून दाखवला. आणि तसाच टाळ्यांच्या गजरात तो निघूनही गेला.

शिरीष कणेकरांच्या मते आजही सलमानला विचारलं, तरी त्याला सांगता येणार नाही की तो त्या दिवशी तो कोणत्या कार्यक्रमाला गेला होता. तो आला ही फक्त बाळासाहेबांच्या चिठ्ठीची करामत.

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.