जगजितसिंह विरुद्घ पुरुषोत्तम जोशी !

साल १९५८, जालंधरमधील डीएव्ही कॉलेज.

त्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सगळ्यात चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलांना आधी प्रवेश मिळायचा आणि चांगल्या रूम त्यांना स्वतःसाठी  निवडता यायच्या. मग उरलेल्या, कुणालाच नको असणाऱ्या रूम असायच्या त्या बाकी कमी मार्कवाल्या मुलांच्या नशिबी असायच्या. आता या नको असणाऱ्या रूम म्हणजे काय प्रकरण होतं? तर पायऱ्याजवळ असणारी रूम. टॉयलेटजवळ असणारी रूम. आणि तिसरा प्रकार म्हणजे जगजीत सिंह यांच्या जवळ असणारी रूम.

हो ! लोकप्रिय गझल गायक जगजीत सिंह यांच्या शेजारी असणारी रूम. कारण काय तर सायन्सचे विद्यार्थी असलेले जगजीतसिंह भल्या पहाटे रियाझ करायचे. संध्याकाळी ठीकय पण भल्या पहाटे कोण ऐकणार? त्याकाळी जगजीतसिंग यांचं करिअरसुद्धा सुरु झालेलं नव्हतं. अर्थात मित्रांना गोळा करून गाण्याची मैफल रंगवायला सुरुवात झाली होती. पण तेंव्हाही कुणी काही कामामुळे त्यांचं गाणं ऐकायला नकार दिला तर जगजितसिंह म्हणायचे,

‘सालो नाशुक्रो, एक दिन ऐसा आयेगा की मेरा गाना सुनने के लिये तुम टिकट खरीदोगे’

सुरेंद्र मोहन पाठक हिंदी कादंबरीकार म्हणून प्रसिध्द आहेत. ते जगजीतसिंह यांचे क्लासमेट. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात जगजीतबद्दल काही आठवणी लिहिल्यात.

उन्हाळ्याच्या दिवसात जगजीत अंगात फक्त ‘कछहरा’ म्हणजे एक बर्मुडासारखी मोठी पँट घालून हॉस्टेलभर फिरायचे. त्याचे दोन्ही लांब नाडे दातात घेऊन गप्पा मारायचे. बोलता बोलता ‘कछहरा’ सुटून पायाशी आलेला असायचा तरी जगजीत गप्पा मारत रहायचे. समोरचाच जास्त लाजून त्यांना जाणीव करून द्यायचा. मालक पँट सुटलीय तुमची.

सुट्टीच्या दिवशी जगजीत प्रत्येकाच्या फर्माईश पूर्ण करत होस्टेलवर गात रहायचे. चपराशी येऊन सांगायचा, ‘वार्डन साहब कह रहे है, अब बस करो’. जगजीत त्याकाळात सगळ्यात जास्त गायचे ते अनाडी सिनेमातलं ‘सच है दुनिया वालों की हम हैं अनाडी’ आणि सुट्टीच्या दिवशी मुलंही भरपूर असायचे ऐकायला. पण इतर दिवशी किंवा जगजीत क्लासिकल गायचे तेंव्हा मात्र मित्र म्हणायचे, ‘ओये, तुने तो पास होना नहीं, हमें तो पढने दे.’

जगजीत अभ्यासात मागे होते, पण त्याकाळातही हार्मोनियम, तबला, तानपुरा, गिटार रूमवर असायचा. त्यांचा असा दावा असायचा की ‘जगातलं कुठलंही वाद्य मला फक्त अर्धा तास द्या. मी ते वाजवून दाखवतो.’ कॉलेजच्या काळात मिळणारी बक्षिसं ठेवायलाच खूप जागा लागायची म्हणून जगजीतना होस्टेलमध्ये एक सेपरेट रूम दिली जायची. अभ्यासात फार हुशार नसूनही.

असे हे जगजीत त्याकाळात शास्त्रीय संगीतात रमले होते. शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा जिंकत होते. पण अचानक कॉलेजात एक पुरुषोत्तम जोशी नावाचा मुलगा आला. जगजीतना ज्युनियर होता. पण शास्त्रीय संगीतात एकदम तयार. त्याने दोन तीन स्पर्धेत पहिला नंबर मिळवला आणि जगजीत दुसऱ्या नंबरवर राहिले.

पुरुषोत्तम जोशी म्हणजे साधी आसामी नव्हती. वयाच्या आठव्या वर्षापासून ऑल इंडिया रेडीओवर त्याचं शास्त्रीय गायन प्रसारित व्हायचं. जालंधरमध्ये कॉलेजात असतानासुद्धा पुरुषोत्तम जोशींचं गाणं ऐकायला हॉल गच्च भरलेला असायचा.

खरंतर जगजीत आणि पुरुषोत्तम जोशी यांच्या गाण्यात उन्नीस बीस करणं तेंव्हाही रसिकांना मान्य नव्हतं. दोघेही पट्टीचे होते पण पुरुषोत्तम जोशीला लोकप्रियता जास्त होती. लहानपणापासून होती. त्याचा पहिला क्रमांक आणि जगजीतचा दुसरा क्रमांक ठरलेला होता. शेवटी वैतागून जगजीतसिंह यांनी शास्त्रीय गाणं सोडून दिलं आणि सुगम संगीताकडे गाडी वळवली. हा निर्णय एवढा महत्वाचा ठरला की त्यानंतर बक्षीस, लोकप्रियता जगजीतसिंह यांच्या पायाशी लोळण घेऊ लागली.

जर पुरुषोत्तम जोशी नावाचा स्पर्धक नसता तर कदाचित आज जगजितसिंह नावाचा गझलगायक आपल्या ओळखीचा नसता. एक शास्त्रीय गायक म्हणून त्यांची ओळख राहिली असती. पण पुरुषोत्तम जोशीमुळे आपली वेगळी वाट जगजीतसिंह यांनी निवडली आणि जगभर लोकप्रिय झालेला आणि गझलला पण लोकप्रिय करणारा गायक म्हणून जगजीतसिंह पुढे आले. पुरुषोत्तम जोशी यांच्याबद्दल जगाला फार माहित नाही पण त्यांच्यामुळे जगजितसिंह रुळलेल्या वाटेने गेले नाहीत हे खूप महत्वाचं. त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.