खरंच राजस्थानच्या विधानसभेत भूत असेल का..?

अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्यातून “काका मला वाचवा” असा आवाज येतो म्हणे. या गोष्टींचं पुणेकरांना फारसं कौतुक वाटत नाही. बाहेरून आलेले या भुताटकीत देखील राजकीय अर्थ शोधत असतात. “राजकारण आणि भूताटकी” हि गोष्ट महाराष्ट्राच्या विद्येच्या माहेरघरात घडत असेल तर ती रंगीलो राजस्थानमध्ये तर घडायलाचं हवी.

उलट आपल्या पेक्षा त्यांच्याकडे भूताखेतांच्या आवश्यक असणारं बाभळीच्या झाडी, वाळवंट, हवेली असं पोषक वातावरण आहे. अशाच राजस्थानच्या राजकारणातल्या भूताटकीचा  आत्ता रंगत जाणाऱ्या राजकारणातला असाच एक किस्सा.

तो देखील थेट राजस्थानच्या विधानसभेतला..

राजस्थानच्या विधानसभेत भूत आहे.

होय होय खरं खुरं भूत. 

तर मॅटर असा आहे की, तिथल्या विधानसभेतील भाजपच्या काही आमदारांना मात्र साधारणतः सहा महिन्यांपूर्वी एका वेगळ्याच भीतीने पछाडलं होतं. भीती काय होती, तर विधानसभा सभागृहातील भूत-प्रेताची. 

किस्सा आहे, या वर्षीच्याच फेब्रुवारीमधला.

भाजपचे आमदार कल्याण सिंह यांचा मृत्यू झाला होता आणि या बातमीने भाजपच्या आमदारांच्या मनात घबराट निर्माण झाली होती. राजस्थान विधानसभेचे काही सदस्य या भीतीने त्रस्त होते की तिथल्या विधानसभेच्या इमारतीत भूताचं वास्तव्य आहे आणि त्यामुळेच या विधानसभेत कधीच संपूर्ण २०० आमदार नसतात. 

प्रत्येकवेळी ही संख्या १९९ वरच अडकून पडते.

राजस्थानमधल्या या भीतीग्रस्त आमदारांचं असं मत आहे की, विधानसभेतल्या कुठल्यातरी आमदाराच निधन होतं, किंवा एखादा आमदार कुठल्या तरी घोटाळ्यात तुरुंगात जातो आणि असंही काही नाही झालं तर कुणीतरी राजीनामा देतो आणि एका जणाच्या अनुपस्थितीत विधानसभेतील सदस्यांची संख्या १९९ इतकीच राहते.

आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय कारण २ दिवसांपूर्वीच रामगड येथून निवडणूक लढवणाऱ्या बसपाच्या लक्ष्मण सिंह यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे तेथील निवडणूक सद्यस्थितीत रद्द करण्यात आलीये. त्यामुळे नवनिर्वाचित विधानसभेत देखील सुरुवतीला १९९ सदस्यच असणार आहेत.

आमदारांच्या मते राजस्थानच्या सध्याच्या विधानसभा सभागृहाची निर्मिती ज्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्याठिकाणी पूर्वी स्मशानभूमी होती. या स्मशानभूमीतील काही अतृप्त प्रेत-आत्मे या विधानसभेत वास करतात आणि त्यामुळेच विधानसभेत कधीच संपूर्ण २०० आमदार असत नाहीत.

विधानसभेत २०० आमदार असले तरी लवकरच एखादी दुर्घटना घडते आणि आमदारांची संख्या १९९ वर पोहचते. राजस्थान भाजपचे आमदार कालू लाल गुर्जर यांनी तर मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्याकडे या स्थानाची एखाद्या पंडिताच्या हस्ते पूजा करून वास्तू पवित्र करून घेण्याची देखील मागणी केली होती.

कालू लाल गुर्जर हे काही एकमेव आमदार नव्हते, ज्यांना भूत-प्रेत असल्याची शक्यता वाटली होती. तर असे अनेक आमदार होते, जे या गोष्टीनं झपाटले आहेत. आमदारांकडून आपल्या दाव्याच्या सफाईसाठी असं सांगण्यात आलं होतं की २००२ साली विधानसभेचं सभागृह नवीन इमारतीत स्थलांतरित झालं. तेव्हापासून फक्त एकदाच अतिशय थोड्या काळासाठी या विधानसभेत संपूर्ण २०० सदस्य होते.

नाहीतर या सभागृहाची संख्या कधीच पूर्ण नसते.

खरं तर हे प्रकरण एवढ्यावरच थांबायला पाहिजे होतं मात्र तसं झालं नाही आणि फेब्रुवारी महिन्यात आमदारांमध्ये,

‘सभागृहात खरच भूताच अस्तित्व असेल का…?’ 

या विषयावर गंभीर चर्चा व्हायला लागल्या. कालू लाल गुर्जर यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी एक खास समिती नियुक्त करण्याची मागणी केली, तर विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांनीही आपण या रहस्यमय गोष्टीबद्दल ऐकलं असून त्यावर चर्चेसाठी एका विशेष सत्राचं आयोजन करण्यात यावं, असं सुचवलं होतं.

नागोरमधून ५ वेळा आमदार राहिलेले हबिबूर रेहमान यांनी देखील थेट मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया यांना या प्रकरणी लक्ष घालून मौलानांना बोलावून जागेचं शुद्धीकरण करण्याचा सल्ला दिला होता. वसुंधरा राजेंनी देखील आपण या प्रकरणी योग्य कारवाई करू असं आपल्याला सांगितलं होतं, अशी माहिती रेहमान यांनीच दिली होती.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.