लगावलेला सिक्सर स्टेडियममधून थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता !!

कर्नल सी.के. नायडू.

कोट्टारी कंकय्या नायडू अर्थात कर्नल सी.के. नायडू म्हणजे भारताचे पहिले कसोटी कर्णधार होत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता.

१९३२ साली क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानात इंग्लंडच्या संघाविरोधात खेळविण्यात आलेल्या या भारताच्या पहिल्या कसोटीत फिल्डिंग करताना कर्नल जखमी झाले होते. पण अतिशय जिद्दी असणारे नायडू अशाही परिस्थितीत बॅटिंगसाठी मैदानात उतरले आणि त्यांनी ४० रन्स देखील फटकावल्या.

भारत जरी हा सामना इंग्लंडकडून १५८ रन्सनी हरला तरी नायडूंच्या जीद्दीसाठी आणि भारतीय क्रिकेटमधील पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय कसोटी सामना म्हणून हा सामना कायमच लक्षात ठेवला जातो.

क्रिकेटच्या भाषेतच सांगायचं झालं तर सी.के. नायडू ‘लंबे-लंबे’ सिक्सर्स फटकावण्यासाठी प्रसिद्ध होते. १९२६ साली जेव्हा एमसीसीचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता त्यावेळी नायडूंनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील बहुतांश सर्वोत्तम इनिंग खेळत अवघ्या ११६ मिनिटांमध्ये १५३ ठोकले होते. नायडूंच्या या इनिंगमध्ये एकूण ११ सिक्सर्सचा समावेश होता. या इनिंगसाठी त्यांना एमसीसीकडून बक्षीस म्हणून चांदीची बॅट मिळाली होती.

भारताच्या पहिल्याच इंग्लंड दौऱ्यात देखील नायडूंनी ३२ सिक्सर्सचा पाऊस पाडला होता. याच दौऱ्यातील त्यांचा एक सिक्सर तर क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालेला आहे. सी.के. नायडूंनी फटकावलेला एक सिक्सर थेट एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन पडला होता.

किस्सा असा की, इंग्लंडमध्ये खेळत असताना  एका सामन्यात सी.के. नायडूंनी एक सिक्सर फटकावला होता. हा सिक्सर स्टेडीयमच्या बाहेरील र्हिया या नदीत जाऊन पडला होता. विशेष म्हणजे ही नदी मॅच ज्याठिकाणी सुरु होता त्या वार्विकशायर या आणि वॉरशेस्टरशायर या दुसऱ्या देशाची सीमारेषा होती. त्याअर्थाने सी.के. नायडूंचा हा सिक्सर थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता.

आजघडीला विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी जाहिरातीमधून अमाप पैसा कमवत असले तरी त्यांच्यासाठी ही वाट मोकळी करून देण्याचं श्रेय देखील सी.के.नायडू यांचंच. १९४१ साली जेव्हा त्यांनी ‘बाथगेट लिव्हर टॉनिक’ची जाहिरात केली होती त्यावेळी अशाप्रकारे एखाद्या ब्रँडला प्रमोट करणारे ते पहिलेच खेळाडू ठरले होते.

सी.के. नायडूंच्या भारतीय क्रिकेटला असलेल्या योगदानासाठी भारत सरकारकडून १९५६ साली त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आलं होतं. त्यावेळी देखील हा सन्मान मिळविणारे ते पहिलेच क्रिकेटर ठरले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावे ट्रॉफीची सुरुवात केलेली आहे. बीसीसीआयकडून त्यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देखील दिला जातो.

३१ ऑक्टोबर १८९५ रोजी महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये जन्मलेले नायडू मूळचे आंध्रप्रदेशमधले होते. वयाच्या सातव्या वर्षीपासून शाळेच्या संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या नायडूंनी आपला शेवटचा रणजी सामना वयाच्या ६२ व्या वर्षी खेळला होता. १४ नोव्हेंबर १९६७ रोजी इंदोरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.