क्रिकेटच्या बॅटचा आकार कसा बदलत गेला…?

 

क्रिकेट हा तसा पुरातन खेळ. क्रिकेटमधील सर्वात महत्वाच्या २ गोष्टी म्हणजे बॅट आणि बॉल. आजघडीला आपण क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट बघतो. पण आज आपल्याला जी बॅट क्रिकेटमध्ये बघायला मिळते ती पूर्वीपासूनच तशी नव्हतीच. क्रिकेटमधील बॅटचा उल्लेख सर्वप्रथम मिळतो तो १६२४ साली. त्याकाळात जी बॅट वापरण्यात येत असे ती साधारणतः हॉकी स्टिकच्या आकारात असे. ही बॅट जर आपण आज बघितली तर कधीकाळी ही बॅट क्रिकेट खेळण्यासाठी वापरली जात असे यावर आपल्याला विश्वासच  बसणार नाही. त्यावेळी बॅटच्या लांबी आणि रुंदी विषयीचे देखील काही नियम नव्हते. आज मात्र जी बॅट क्रिकेटमध्ये वापरली जाते तिची लांबी ३८ इंच आणि रुंदी ४.५ इंचपेक्षा अधिक असू नये असा नियम आहे. मेरीलीबोन क्रिकेट क्लब अर्थात ‘एमसीसी’ने अठराव्या शतकात हा नियम ठरवून दिलाय. हा नियम कसा बनविण्यात आला याचा देखील रंजक किस्सा आहे.

किस्सा आहे २५ सप्टेंबर १७७१ रोजीचा. थॉमस व्हाईट नावाच्या इंग्लंडच्या एका खेळाडू सोबत एका स्थानिक सामन्यात घडलेला. या सामन्यात खेळताना थॉमस व्हाईटने एवढी मोठी बॅट मैदानात आणली की जिच्यामुळे थॉमसचे तिन्हीही स्टंपस झाकले गेले. साहजिकच त्यामुळे थॉमस व्हाईट बोल्ड होण्याचे चान्सेस अगदीच कमी झाले. पण त्यावेळी बॅटच्या रुंदीसंदर्भात कसलेही नियम नसल्याने ते त्याच बॅटने खेळत राहिले. यानंतर मात्र वाद निर्माण झाला आणि एमसीसीने बॅटच्या आकारासंदर्भात नियम तयार केला. या नियमानुसार बॅटची रुंदी ४.२५ इंचापेक्षा अधिक असू नये असं  ठरविण्यात आलं.

१९७९ सालचा किस्सा देखील असाच रंजक आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान अॅशेज सिरीजमधला पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर सुरु होता. प्रथम बॅटिंग करणाऱ्या कांगारूंची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या ७ विकेट्स गमावल्या होत्या आणि स्कोअरबोर्डवर होते फक्त २१६ रन्स. अशा स्थितीत डेनिस लिली बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला त्यावेळी त्यावेळी त्याच्या हातात  अॅल्युमिनियमची बॅट होती. क्रिकेटची बॅट फक्त लाकडाचीच असावी असा काही नियम त्यावेळेपर्यंत तरी अस्तित्वात नव्हता. त्यामुळे सर्वप्रथम तरी यासंबंधी कुणी काही आक्षेप घेतला नाही. लीलीने या बॅटनेच खेळायला सुरुवात केली.

http://https://www.youtube.com/watch?v=7Pak_0L3rhc

काही वेळानंतर मात्र इंग्लंडच्या बॉलर्सनी यासंदर्भात अंपायरकडे तक्रार केली की अॅल्युमिनियमच्या बॅटमुळे बॉल खराब होत आहे आणि स्विंग होण्यास देखील अडचणी येताहेत. इंग्लंडच्या तक्रारीनंतर अंपायरने डेनिस लिली यांना लाकडाची बॅट घेऊन खेळण्यास सांगितलं. पण आपण काहीही नियमबाह्य केलेलं नसल्याने लिली ऐकायला तयार नव्हते. शेवटी ऑस्ट्रेलियन कॅप्टन ग्रेग चॅपेल यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली. ते स्वतः लीलीसाठी लाकडाची बॅटघेऊन मैदानात आले. कॅप्टनने समजावल्यानंतर देखील लिली संतापलेलेच होते. त्यांनी रागारागातच  अॅल्युमिनियमची बॅट पॅव्हेलियनच्या दिशेने भिरकावली. कुठल्याही धातूची बॅट खेळण्यासाठी वापरण्यात आलेला हा क्रिकेटच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील पहिला आणि शेवटचा प्रसंग होता.