किस्से क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांकडून खेळाडूंना केल्या गेलेल्या ‘किस’चे !!

क्रिकेटच्या मैदानावर खेळाव्यतिरिक्त अनेक रंजक गोष्टी घडत असतात. क्रिकेटरसिक आपल्या देशाप्रतीचं किंवा एखाद्या विशिष्ट खेळाडू प्रतीचं आपलं प्रेम दाखवण्यासाठी नाना क्लृप्त्या करतात. चाहत्यांनी क्रिकेटर्सशी लगट करण्याचे अनेक प्रसंग आपल्याला बघायला मिळतात.

सध्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या दरम्यान हैद्राबाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात देखील मोहम्मद खान नामक व्यक्ती सुरक्षेचा घेरा तोडून मैदानात घुसला. मैदानात घुसलेल्या मोहम्मद खान याने भारताचा कॅप्टन विराट कोहली याला किस करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर पोलिसांनी मोहम्मद खान विरोधात सुरक्षा घेरा तोडण्यासंबंधीची केस दाखल केली आहे.

यानिमित्ताने आजचा किस्सा आहे क्रिकेटच्या मैदानावरील चालू सामन्यातील ‘किस’चा.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात असं फक्त २ वेळा घडलंय की जेव्हा एखाद्या खेळाडूला चालू सामन्यादरम्यान मैदानावरच ‘किस’ करण्यात आलंय. विशेष म्हणजे दोन्ही वेळा भारतीय खेळाडूंवरच हा प्रसंग ओढावला आणि या दोघांनाही लाजेनं चूर व्हायला झालं.

पहिला किस्सा आहे १९६० च्या दशकातला. कानपूरमधलं ग्रीन पार्कचं मैदान. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या सिरीजमधला पहिला कसोटी सामना.

अब्बास अली बेग

अब्बास अली यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की त्या काळातल्या जगातल्या सर्वात हँडसम क्रिकेटर्सपैकी ते एक होते. तर सामन्यादरम्यान अब्बास अली बॅटिंग करत होते आणि ते चांगल्या फॉर्ममध्ये होते. त्यांनी आपली फिफ्टी झळकावली होती.

abbas ali baig
अब्बास अली बेग

बॅटिंग सुरु होती आणि अचानक असं काही झालं की क्षणभर नेमकं काय झालंय हे त्यांनाही समजलं नाही. ग्राउंडवरील ‘गर्ल्स स्टँड’मधून धावत आलेल्या एका युवतीने त्यांना खुल्या मैदानात ‘किस’ केलं होतं. क्षणभर मैदानात शांतता पसरली होती, पण नंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांनी या शांततेचा भंग केला आणि जिकडेतिकडे या ‘किस’ची चर्चा सुरु झाली.

अब्बास अलींना तर आपला चेहरा कुठे लपवू आणि कुठे नको असं झालं होतं. ग्राउंडवरील ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील त्यांची खिचाई करत होते. ‘कॉमेंट्री बॉक्स’मध्ये बसलेले  विजय मर्चंट हे देखील विनोदी ढंगात म्हणाले,

आम्ही खेळत असताना ही मुलगी कुठे होती कुणास ठाऊक

दुसरा किस्सा आहे मुंबईतला. साल १९७५.

क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजचा संघ भारतीय दौऱ्यावर होता. सिरीजमधली शेवटची कसोटी सुरु होती. चौथ्या डावात भारतीय  संघ जिंकण्यासाठी ४०५ रन्सचा पाठलाग करत होता. भारत संघर्ष करत असताना एक खेळाडू मात्र लढत होता.

लढणारा खेळाडू म्हणजे ब्रिजेश पटेल.

brijesh patel
ब्रिजेश पटेल

ब्रिजेश पटेल मैदानात होते. त्यांची बॅटिंग सुरु असताना एक महिला अचानक मैदानात घुसली आणि थेट ब्रिजेश पटेल यांना जाऊन बिलगली. तीने भर मैदानात ब्रिजेश यांना ‘किस’ केलं. ब्रिजेशची परिस्थिती देखील अब्बास अलींपेक्षा फार काही वेगळी नव्हती.

अचानकपणे घडलेल्या या प्रकाराने ते देखील गोंधळून गेले होते. पोलिसांनी या महिलेचा पाठलाग केला होता, परंतु ते तिला थांबवू शकले नाहीत.

क्रिकेटमधील या ‘किस्स्या’नंतर मात्र  मैदानातील सुरक्षाव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. त्यामुळे कुठल्याही चाहत्याला आता खेळाडू पर्यंत पोहोचणं पहिल्याइतकं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे त्यानंतर मात्र क्रिकेटच्या मैदानावर अजूनतरी असा किस्सा पुन्हा कधी घडला नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.