देवानंद, दिलीप कुमार आणि राज कपूरचं पुणे.

सदाबहार अभिनेता देवानंद, दिलीपकुमार आणि शो मॅन राज कपूर यांचं पुण्याशी अतिशय जवळचं नातं राहिलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते पुण्याशी जोडलेले होते. तसंही ‘प्रभात फिल्म’मुळे फिल्म इंडस्ट्रीची नाळ त्याकाळी पुण्याशी अतिशय घट्टपणे जुळलेली होती. देवानंद आणि गुरुदत्तच्या मैत्रीचा किस्सा देखील पुण्यातच सुरु झाला होता.

देवानंद असेल किंवा राज कपूर असतील या सर्वांच्या पुण्यातील वास्तव्यात त्यांनी उडवलेल्या धमालीचे किस्से जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी लिहिलेल्या आणि अक्षर प्रकाशनाने छापलेल्या ‘बॉम्बे टॉकिज’ या पुस्तकात वाचायला मिळतात.

ढोल ताशांच्या गजरात पुणेकरांनी केलेल्या स्वागताने देवानंद भारावून गेला होता !  

‘झुबेदा’ या नाटकाच्या तालमीच्या वेळी एक वाक्य सारखंच चुकत असलेल्या देवानंदला चिडलेल्या बलराज सहानी यांनी ‘तू कधीच अभिनेता होऊ शकणार नाहीस’ असं सांगितलं होतं. पण त्यावेळी देखणा देवानंद प्रभात फिल्सच्या मसुरेकर यांच्या नजरेत भरला आणि मसुरेकरांच्या शिफारसीवरून प्रभात कंपनीच्या बाबुराव पै यांनी देवानंदला आपल्याकडे नोकरीला ठेऊन घेतलं, त्यानिमित्ताने तो पुण्यात आला होता. पुढे तो बरीच वर्षे पुण्यातच रमला.

गुरुदत्त बरोबरची त्याची यारी-दोस्ती देखील जमली ती याच काळात. या दोघांनी मिळून पुण्यातच एकमेकांसाठी पिक्चर बनवायचं ठरवलं होतं. ज्याचा पिक्चर आधी बनेल, त्याने दुसऱ्याला लॉच करायचं हे दोघांनी पुण्यातल्याच बारमध्ये बसून ठरवलं होतं. पुढे ‘प्रभात कंपनी’ बरोबरचचा करार संपल्यानंतर देवानंद मुंबईत परतला, पण पुणे मात्र त्याच्या कायमच आठवणीत राहीलं.

१९९५ साली देवानंदच्या फिल्मी करिअरला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुणे महापालिकेने त्याच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुण्यात देवानंदचं जंगी स्वागत झालं होतं. रेल्वेने पुण्यात आलेल्या देवानंदचा पुण्याच्या महापौरांनी स्टेशनमध्ये जाऊन सत्कार केला होता. लेझीम-ढोल-ताशे यांच्या गजरात देवानंदला ओवाळण्यात आलं होतं. या सत्काराने भारावलेला देवानंद मात्र आपल्या गुरुदत्त बरोबरच्या आणि पुण्यातील जुन्या आठवणीत रमला होता.

देविकाराणींनी दिलीपकुमारचा पगार कापला होता !

दिलीपकुमारचे वडील पुण्यातील कॅम्प परिसरात फळांचे व्यापारी होते आणि दिलीपकुमार आर्मी कॅन्टीनमध्ये कारकुनीचं काम करायचे. पुण्यात राहून बऱ्यापैकी पैसे कमावल्यानंतर मग ते मुंबईला निघून गेले.

दिलीपकुमार आणि राजकपूर ज्यावेळी ‘बॉम्बे टॉकिज’सोबत काम करायचे त्यावेळचा एक किस्सा तर अतिशय मजेदार आहे. दुपारच्या वेळी दोघेही गुपचुपपणे एखाद्या पिक्चरच्या शोला जात असत. एका दिवशी असेच ते एका शोला गेले होते. त्या शोचा इंटरव्हल झाला आणि लाईट्स सुरु झाले.

समोर उभ्या होत्या ‘बॉम्बे टॉकिज’च्या मालकीण देविकाराणी आणि त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या मैत्रिणी श्रीमती जमशेदजी टाटा आणि लेडी रामाराव.

देविकाराणी यांनी दिलीपकुमार यांना बोलावलं आणि श्रीमती टाटा यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. ओळख करून देताना दिलीपकुमार यांच्याबद्दल ‘हा एक अतिशय गुणी अभिनेता आहे’ असंही देविकाराणींनी सांगितलं.

पिक्चर बघून ते बाहेर पडले. देविकाराणी यांनी केलीली आपली स्तुती ऐकून खुश झालेल्या दिलीपसाहेबांना वाटलं की मालकीणबाई खुश आहेत. आपली चूक माफ करतील. त्यामुळे ते झालेलं प्रकरण विसरून गेले.

महिन्याच्या शेवटी पगाराच्या वेळी त्यांचे १०० रुपये कपात करण्यात आले आणि ‘परवानगी न घेता स्टुडीओच्या बाहेर जाऊन सिनेमा बघण्यासाठीचा हा दंड असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

राज कपूरने लोणी इथं ‘राजबाग’ नावाचं फार्म हाउस विकत घेतलं होतं !

राज कपूर पुण्यात रमण्याचा किस्सा सुरु होतो तो भालजी पेंढारकर यांच्या ‘फेमस अरुण’ फिल्म कंपनीसोबतच्या कामामुळे. राज कपूर त्यांच्या चित्रपटात काम करायचे त्यावेळी त्यांनी लोणी इथे जवळपास १०० एकरभर पसरलेलं ‘राजबाग’ नावाचं फार्म हाऊस विकत घेतलं होतं.

राज कपूर आपल्या निवांत क्षण घालवण्यासाठी मित्रांना घेऊन राजबगेतच यायचे. लोणीतले शेतकरी सांगायचे की राज कपूर त्यांच्याशी त्यांची शेती, फळे-फुले यांच्याबद्दल मनसोक्त गप्पा मारायचे आणि मग नवीन रोपे आणि बि-बियाणांच्या खरेदीसाठी बाहेर पडायचे.

आर.के. स्टुडिओच्या कामातून जेव्हा कधी मोकळा वेळ मिळायचा त्यावेळी राज कपूरची स्वारी ‘राजबाग’वरच असायची. बराचसा रिलॅक्स वेळ, थोडीशी शेती आणि रात्रीच्या पार्ट्यांसाठी राज कपूरची पहिली पसंत म्हणजे ‘राजबाग’ असायची. पुढे ‘सत्यम शिवम सुंदरम’चं शुटींग देखील राजबागेतच झालं. ‘सत्यम शिवम सुंदरम’मधली पावसात भिजणारी झीनत अमान असेल किंवा धरणफुटीचं दृश्य असेल हे सगळं पुण्यातच शूट झालं होतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.