फक्त अडीच सिनेमे बनवून चित्रपटसृष्टीत अजरामर झालेला दिग्दर्शक…!!!
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असा दिग्दर्शक ज्याचा जन्म कदाचित फक्त अडीच सिनेमे बनवण्यासाठीच झाला होता. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. अडीच सिनेमे. आपल्या हयातीत २ सिनेमांचं दिग्दर्शन आणि एका सिनेमाचं काम अर्धवट झालेलं असतानाच आलेला मृत्यू. असं असूनही या अडीच सिनेमांपैकी एका सिनेमाने के.आसिफ यांना इतकी ख्याती मिळवून दिली, दिग्दर्शक म्हणून इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं की जी ख्याती आणि श्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळवायला सिनेजगतात अनेकांना आपलं आयुष्य वेचावं लागतं. के. आसिफ यांना ज्या सिनेमाने हे सगळं काही मिळवून दिलं तो सिनेमा म्हणजे १९६० साली प्रदर्शित झालेला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला ‘मुगल-ए-आजम’ होय.
‘बोल भिडू’च्या वाचकांसाठी याच सिनेमासंदर्भातील काही रंजक किस्से..!
निर्मितीसाठी तब्बल १४ वर्षांचा कालावधी…!!!
चित्रपटाच्या निर्मितीसाठी १४ वर्षांचा कालावधी लागलेला ‘मुगल-ए-आजम’ हा कदाचित भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिला आणि एकमेव सिनेमा असावा. सर्वप्रथम १९४६ साली ‘बॉम्बे टॉकिज’मध्ये चित्रपटाची शुटींग सुरु झाली होती, परंतू चित्रपटाचे निर्माते आसिफ यांचे मित्र सिराज हे फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेल्याने चित्रपटाचं काम रखडलं ते रखडलंच.
त्यानंतर परत १९५२ साली शापूरजी पालनजी यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अर्थसहाय्य करण्याची तयारी दाखवली आणि चित्रपटाचं काम पुन्हा सुरु झालं. सुरुवातीला चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत चंद्रबाबू , नर्गिस आणि डी.के. सप्रू यांना घेण्यात आलं होतं, परंतू नंतर १९५२ साली जेव्हा पुन्हा नव्याने शुटींग सुरु झालं त्यावेळी दिलीपकुमार, मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर यांना घेऊन चित्रपट पूर्ण करण्यात आला.
१९६० साली जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी तो प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. चित्रपटाचं तिकीट मिळविण्यासाठी सिनेमागृहाबाहेर अबालवृद्धांच्या रांगा लागल्या, अनेकांच्या तर खाण्याचा डब्बा आणि रात्रीचा बिछाना देखील रांगेतच असे. परदेशातूनही अनेक प्रेक्षक चित्रपट बघायला येत असत. त्यांच्यासाठी तिकीटाची वेगळी रांग असे. त्यांचा पासपोर्ट बघूनच त्यांना या रांगेतून तिकीट दिलं जात असे.
त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट…!!!
‘मुगल-ए-आजम’ची निर्मिती हे आसिफ याचं असं स्वप्न होतं की ज्याच्या पूर्ततेसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. ‘मुगल-ए-आजम’च्या निर्मितीत कुठेही काहीही कमी पडू नये यासाठी त्यांनी जातीने लक्ष घातलं होतं. साठच्या दशकात जिथे ५ ते १० लाखात संपूर्ण सिनेमा बनत असे, तिथे आसिफ यांनी या सिनेमाच्या निर्मितीवर १ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च केला होता. “प्यार किया तो डरना क्या..” या एकाच गाण्याच्या निर्मितीवर १० लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
या चित्रपटातील एक गाणं आसिफ यांना प्रख्यात गायक गुलाम अली यांच्याकडून गाऊन घ्यायचं होतं. परंतु गुलाम अली साहेबांनी कुठल्याही सिनेमात न गाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने त्यांनी आसिफ यांना आपला नकार कळवला. पण आसिफ काही ऐकायला तयार नव्हते. त्यांना कुठल्याही परिस्थितीत गाणं गुलाम अली यांच्याकडूनच गाऊन घ्यायचं होतं. आसिफ ऐकतच नाहीत हे लक्षात आल्याने गुलाम अली साहेबांनी गाणं गाण्यासाठी मानधन म्हणून आपण २५००० घेऊ असं आसिफ यांना सांगितलं. गुलाम अली साहेबांचा असा होरा होता की एवढी मोठी रक्कम ऐकून आसिफ त्यांचा हट्ट सोडून देतील.
गुलाम अली साहेबांनी शब्द टाकण्याचाच काय तो विलंब आणि आसिफ यांनी लगेच गुलाम अली साहेबांना २५००० रुपये एवढं गलेलट्ठ मानधन देण्याचं मान्य केलं. आता गुलाम अली साहेबांचा नाईलाज झाला होता. शेवटी त्यांनी चित्रपटात एक गाणं गायलं. आज जरी आपल्याला २५००० ही छोटी रक्कम वाटत असली तरी त्या काळात लता मंगेशकर आणि मोहोम्मद रफी यांच्यासारख्या गायकांना देखील एका गाण्यासाठी २५० ते ५०० रुपये एवढं मानधन मिळत असे, यावरून आपल्याला ही रक्कम किती मोठी होती याचा अंदाज येईल.
परिपूर्णता आणि सर्वोत्तमतेचा ध्यास…!!!
चित्रपटाच्या निर्मितीसाठी कुठलीही तडजोड करण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांना सर्व काही सर्वोत्तम हवं होतं. म्हणूनच प्रख्यात संगीतकार नौशाद यांनीच या चित्रपटाला संगीत द्यावं, असा आसिफ यांचा हट्ट होता. नौशाद साहेब काही त्यासाठी तयार नव्हते, परंतु के.आसिफ यांच्या हट्टासमोर नौशाद साहेबांनी माघार घेतली आणि चित्रपटाला आपलं सुमधुर संगीत दिलं.
चित्रपटाच्या शुटींगसाठी भारतीय सैन्यातील हत्ती आणि घोडे आणि सैनिकांचा वापर करण्यात आला होता. भारतीय सिनेमाच्या इतिहासात हे असं प्रथमच होत होतं. त्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांची परवानगी देखील घेण्यात आली होती.
चित्रीकरण वास्तववादी वाटावं आणि कलाकाराला भूमिका करताना ती भूमिका जगल्याचा आभास व्हावा म्हणून आसिफ यांनी अकबराच्या भूमिकेसाठी ६० किलोंचा पोशाख आणि २५ हजारांच्या बूट तयार करून घेतला होता.