आयाबायांना रडवणारा “माहेरची साडी” १२ कोटींचा मानकरी ठरला होता.

मला अजूनही आठवतय खास हा पिक्चर बघायला गावाकडून आज्जी, चुलत्या, भावंड एस्टीने आली होती. सगळी कडे पिक्चरची चर्चाच भरपूर होती. वडिलांनी कोणाच्या तरी ओळखीने तिकीट मिळवले होते. थिएटर वर गेल्यावर ही प्रचंड गर्दी. एवढी माणस कधीच बघितली नव्हती.

टेम्पो भरून भरून लोक सिनेमा पाहायला आलेले.

माझं वेगळ तिकीट काढलेलं नव्हत, आज्जीच्या मांडीवर बसून पिक्चर बघत होतो. थोड्याच वेळात मला झोप लागली. मध्येच जाग आल्यावर पाहिलं सगळ थिएटर शांत होतं फक्त मुसमुसण्याचे आवाज येत होते. आमची आज्जी पहिल्यांदाच सिनेमा बघायला आली होती. अलका कुबलवर होणारा अन्याय बघून पडद्यावरच्या सासूला उषा नाडकर्णीला तिने कन्नडमध्ये जळजळीत शिवी घातली. सगळ्या थिएटरची अशीच अवस्था होती.

फक्त बायाच नाही तर बाप्या माणस पण हळूच रुमाल डोळ्याला लावत होते. 

अखेरच्या प्रसंगाने तर कहरच केला. आयुष्यभर आपल्या सख्या पोरीला वाळीत टाकलेला बाप विक्रम गोखले तिला भेटायला येतो तो प्रसंग तर जीवघेणा इमोशनल झाला होता. सिनेमा संपल्यावर बाहेर आलो, जेवढी गर्दी आतून बाहेर पडत होती तेवढीच गर्दी बाहेर उभी होती.

मराठीमधला आज पर्यन्तचा सर्वात हिट चित्रपट,

याच्या यशाची तुलना शोलेबरोबर केली गेली होती.

माहेरची साडी १९९१ साली रिलीज झाला. दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. गाजलेला राजस्थानी सिनेमा “बाई चली सासरीए” याचा माहेरची साडी रिमेक होता.

विजय कोंडकेचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी आधी पिक्चरची एकच प्रिंट काढली होती आणि पूर्ण महाराष्ट्रात फक्त इचलकरंजीमध्ये प्रदर्शित केला होता. तिथे मिळालेला अविश्वसनीय प्रतिसाद बघून पुढे पुण्यामुंबईला माहेरची साडी रिलीज झाला.

पुण्याच्या प्रभात थिएटरमध्ये तब्बल १२८ आठवडे म्हणजेच जवळपास अडीच वर्षे सलग हा सिनेमा दाखवला जात होता. 

विदर्भ मराठवाडा पासून ते कोकणगोव्यापर्यंत जिथे जाईल तिथे सिनेमागृह हाउसफुल होती. प्रत्येक शो ला थिएटरमधल्या लकी महिला प्रेक्षकांना साडी भेट दिली जात होती. तब्बल १२ कोटी रुपयांचा गल्ला माहेरची साडीने मिळवला. पुढे सोळा वर्षांनी अशोक सराफ भरत जाधव यांच्या साडे माडे तीन या सिनेमाने हा रेकॉर्ड मोडला.

प्रत्येक लग्न समारंभात बेंजोवर ‘नेसली माहेरची साडी’ आणि बारश्याच्या प्रसंगी ‘माझं सोनुलं सोनुलं’ या गाण्याचं संगीत वाजवलं जात होत.

सिनेमामध्ये अजिंक्य देव, विक्रम गोखले,रमेश भाटकर, विजय चव्हाण, उषा नाडकर्णी, किशोरी शहाणे, जयश्री गडकर असे एका पेक्षा एक मोठे स्टार होते पण माहेरची साडी ओळखला जातो तो फक्त अलका कुबल यांच्या नावाने.

खरं तर विजय कोंडकेना सुनेच्या मुख्य भूमिकेत मैने प्यार किया मुळे सुपरहिट झालेल्या भाग्यश्री पटवर्धनला घ्यायचं होत. पण काम करीन तर नवरा हिमालयसोबतच अशी अट घालणाऱ्या भाग्यश्रीने त्यांना दीड वर्षे लटकवत ठेवले. अखेर कंटाळून विजय कोंडकेनी अलका कुबलला साईन केले.

लेक चालली सासरला, वहिनीची माया अशा चित्रपटात काम केलेले असल्यामुळे अलका कुबलला गरीब बिचाऱ्या सुनेचा अभिनय नवा नव्हता. तिने या सिनेमामध्ये जीव तोडून अॅक्टींग केली. या सिनेमाच्या यशानंतर तिला सुनेच्या भुमिकेसाठी टाइपकास्ट केले गेले. तिचे माहेरची माया, माहेरचा आहेर असे अनेक पिक्चर आले.

एवढंच काय तर सासू सुनेच्या भांडणावरच्या सिनेमांची लाटच आली तिला अलका कुबल टाईप सिनेमे असे ओळखले जाऊ लागले. 

या सिनेमा मूळ महाराष्ट्रातल्या किती सुनांच, लेकींच जगणं सुसह्य झालं होत ठाऊक नाही. पण स्त्रियांना मध्यवर्ती ठेवून सिनेमे बनवण्यास तरी सुरवात झाली होती. पुढे टीव्ही सिरीयलची लाट येई पर्यंत या अलका कुबल टाईप सिनेमे येतच राहिले.

विजय कोंडके यांनी या पिक्चर नंतर मराठीत एकही सिनेमा दिग्दर्शित केला नाही. हिंदीत ले चल अपने संग नावाचा एक फुटकळ सिनेमा सिनेमा त्यांनी काढला होता पण तो अपयशी ठरला. काही दिवसापूर्वी बातमी आली होती की विजय कोंडके माहेरची साडीचा सिक्वेल बनवणार आहेत आणि त्यासाठी अमृता खानविलकरला विचारणा केलीय.

माहेरची साडी ची जादू परत पडद्यावर दिसेल का याची उत्सुकता सर्वानाच असेल.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Sagar chavan says

    आपले लेख खूपच सुंदर असतात..,ते वाचत असतांना मन भूतकाळात रमत. नव्या पिढी साठी आपले हे लेख खूप छान आहे. थैंक्स यू बोल भिडू.

  2. रोहित says

    खूप छान माहिती दिलीत
    धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.