जिओ इन्स्टिटयूटचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी कितवी शिकलेत…?

मुकेश अंबानी.

आजघडीला भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगभरातील पॉवरफुल लोकांपैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व. आज भारतातील उद्योगजगतात रिलायन्सचं जे स्थान आहे, त्याच्या घडण्या-बिघडण्याच्या प्रक्रियेत वडील धीरूभाई अंबानी यांच्याइतकच महत्वाचं किंबहुना त्यापेक्षा काकणभर अधिक योगदान मुकेश अंबानी याचं आहे. त्यांच्या आयुष्यातील असे काही किस्से आहेत ज्याची कल्पना आपल्याला असण्याची शक्यता कमीच.

आपल्यापैकी अनेकांना याची कल्पना नसेल परंतु मुकेश अंबानी हे जन्माने भारतीय नाहीत. म्हणजेच त्यांचा जन्म भारतातील नाही. १९ एप्रिल १९५७ रोजी ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे वडील मध्य-पूर्व आशियातील यमन या देशातील एका फर्ममध्ये काम करायचे. त्यामुळे मुकेश यांचा जन्म यमन देशातील ‘अदन’ या शहरात झाला होता. मुकेश यांच्या जन्मानंतर वर्षभराने अंबानी कुटुंब मुंबईत दाखल झालं.

धीरूभाई अंबानी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एका खासगी शिक्षकाची नियुक्ती केली होती. या शिक्षकावर जबाबदारी होती ती मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची. त्यामुळे दिवसातले दररोज २ तास हे शिक्षक मुलांना जगभरातील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देत असत. जगभरातील वेगवेगळे खेळ, जागतिक स्तरावरील सांस्कृतिक क्षेत्रात घडणाऱ्या घटना आणि जागतिक सिनेमे यांच्याविषयी मुलांना सांगणं आणि त्यांना ते दाखवणं अशा प्रकारचं अनौपचारिक शिक्षण धीरूभाई अंबानी यांनी आपल्या मुलांना दिलं होतं.

वडील धीरूभाई अंबानी यांचा वारसा तर त्यांना मिळाला होताच पण मुकेश अंबानी हे लहानपणापासूनच अतिशय हुशार समजले जात असत. तरुणपणातील मोठा कालावधी त्यांनी अभ्यासात घालवलाय. विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील अनेक पुस्तके ते अधाशासारखे वाचून काढत असत.

‘माईक निकोलस’ या अमेरिकन दिग्दर्शकाचा १९६७ साली प्रदर्शित झालेला ‘द ग्रॅज्यूएट’ नावाचा सिनेमा बघूनच आपल्याला केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायची प्रेरणा मिळाली असं मुकेश अंबानी यांनीच सांगून ठेवलंय. माटुंगा येथील ‘इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’ या केमिकल इंजिनीअरिंगच्या भारतातील सर्वोत्तम कॉलेजमधून आपली पदवी पूर्ण करणाऱ्या मुकेश अंबानी यांची आयआयटी मुंबईसाठी देखील निवड झाली होती, परंतु त्याऐवजी त्यांनी ‘यूडीसीटी’मध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य दिलं.

मुकेश अंबानी यांना कायमच आपल्या क्षमतांना आव्हान द्यायला आवडायचं. त्यामुळेच जेव्हा मॅनेजमेंट क्षेत्रातील शिक्षण घ्यायचा निर्णय झाला त्यावेळी देखील त्यांनी जगभरातील अनेक प्रतिष्ठीत कॉलेजसाठी अप्लाय केलं होतं. अप्लाय केलेल्या बहुतेक कॉलेजमध्ये त्यांची निवड देखील झाली होती. शेवटी त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाची निवड केली. परंतु काही दिवसानंतर रिलायन्सच्या कामात वडील धीरूभाई अंबानी यांना मदत करण्यासाठी त्यांनी स्टॅनफोर्ड देखील सोडलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.