राष्ट्रपती निवडणुका दर ५ वर्षांनी येतीलच पण याबातच्या १० इंटरेस्टींग गोष्टी बदलत नसतात
“कौन बनेगा राष्ट्रपती” ?
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा?
मतांचं गोळाबेरीज आणि द्रौपदी मुर्मू यांना मिळणारा पाठिंबा पाहता द्रौपदी मुर्मूच राष्ट्रपती बनतील असं सर्वांनाच वाटत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार निकाल लागणार आणि २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती ‘राष्ट्रपती पदाची’ शपथ घेतील.
असो या निवडणुकीच्या अपडेट्स आपण नाही पाहणार आहोत तर याच निवडणुकीबाबतच्या १० इंटरेस्टिंग गोष्टी पाहणार आहोत जे तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्यातील फॅक्टस म्हणजे,
१. द्रौपदी मुर्मू यांनाच भाजपने उमेदवार म्हणून का उभं केलं?
याआधी बिहारचे माजी राज्यपाल राम नाथ कोविंद यांना दलित चेहरा म्हणून भाजपने राष्ट्रपतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली होती आणि यावेळेस भाजप झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी चेहरा म्हणून समोर केलं आहे.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणी आदिवासी महिला देशाच्या सर्वांत मोठ्या पदावर पोहोचणार आहे. ही छोटी गोष्ट नाहीये. देशाचे नवे राष्ट्रपती हे आदिवासीच निवडण्यामागे भाजपचा मास्टरस्ट्रोक म्हणजेच भाजप ‘ट्रायबल कार्ड’ खेळून पूढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचं प्लॅनिंग करतंय. कारण भारतात अनेक राज्यात आदिवासी समाजाचे बऱ्यापैकी मतदार आहेत ज्याचा फायदा येत्या निवडणुकीत होणार आहे.
२. NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला विरोधी पक्षांचा अनपेक्षित पाठिंबा.
राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलेली असतांना मात्र काही विरोधी पक्षांचा पाठिंबा भाजप्रणित ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळतोय.
महाराष्ट्रातून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या शिवसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. तर झारखंडमध्ये काँग्रेससोबत आघाडी असलेल्या सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चानेही द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दिलाय. तर ओडिशातून नवीन पटनायक यांचाही पाठिंबा मिळालाय. देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाने तसेच चंद्रा बाबु नायडू यांच्या तेलगू देसमने देखील पाठिंबा दिलाय.
३. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मोठ्या नेत्यांनी दिलेला नकार हा देखील एक इंरेस्टिंग फॅक्ट राहिलेला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यासारख्या तगड्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळी कारणे सांगून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी साठी नकार दिलेला, त्यानंतर विरोध पक्षांकडून यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
४. ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मतं मिळाली तो उमेदवार निवडून येतो असं नाही तर कोटा पूर्ण करणारा उमेदवार निवडणून येत असतो.
या निवडणूकीची खासियत अशी की येथे जास्तीत जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरेल, याची खात्री देता येत नाही. कारण सर्वात जास्त मते मिळाली तरी कोटा पूर्ण झाला नाही तर दूसऱ्या क्रमांकाची मते मोजून कोटा पुर्ण केला जातो. अशा वेळी दूसऱ्या क्रमांकावरचा उमेदवार देखील विजयी होवू शकतो.
मात्र राष्ट्रपतीपदासारख्या निवडणूकीत उमेदवार हा कोटा पुर्ण करतात. हा कोटा प्रत्येक एकूण झालेल्या मतांची बेरीज करून, नंतर या बेरजेला २ ने भागून आणि भागामध्ये १ मिळवून काढला जातो. आत्ताच्या निवडणूकीत एकूण मतांच मुल्य आहे १० लाख ९८ हजार ८०३ या मतांपैकी कमीत कमी ५ लाख ४९ हजार ४४३ हजार मतं कोटा पुर्ण करण्यासाठी मिळवावी लागतात.
५. ज्या पक्षाची केंद्रात सत्ता आहे म्हणून त्या पक्षाचा उमेदवार राष्ट्रपती म्हणून निवडून येतो का तर नाही.
आजच्या स्थितीत भाजपाचे लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असले तरी काही राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाहीये. तरीही काही विरोधी पक्षांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकूनही येईल.
मात्र आपल्या देशातील राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया अशी काही आहे की फक्त केंद्रात सत्ता असून भागत नाही तर महत्वाच्या राज्यांतील सत्ता हातात पाहिजे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक वनडे क्रिकेट मॅचसारखी असते शेवटच्या क्षणालासुद्धा निकाल फिरू शकतो.
६. या मतदानात कोणताही पक्षाचा व्हिप जारी होत नाही.
भारतात राष्ट्रपती पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक होत असते, ज्यामध्ये जनतेला मतदानाचा अधिकार नसतो मात्र जनतेतून निवडून गेलेले लोकसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात. सोबत राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार सोडून उर्वरित खासदार मतदान करत असतात.
राष्ट्रपतीनियुक्त १२ खासदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांनामतदानाचा अधिकार नसतो. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानासाठी कोणत्याही पक्षाचा व्हिप जारी होत नाही. यात मतदान करणारे खासदार आणि आमदार त्यांच्या इच्छेनुसार मतदान करू शकतात.
७. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत देखील उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होत असतं.
निवडणूक आल्या कि राजकीय नेते एकमेकांना चॅलेंज देत असतात, ‘या निवडणुकीत तुझं डिपॉझिटच जप्त करून दाखवतो’. बरं हे काय आमदार -खासदारांच्याच निवडणुकीत होतं का तर नाही..राष्ट्रपतींच्या निवडणुकीत देखील निवडणूक आयोगाच्या नियमानुसार डिपॉझिट भरावं लागतं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॅटेगरीच्या आरक्षणानुसार उमेदवारांना वेगवेगळं डिपॉझिट भरावं लागतं पण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये इक्वल डिपॉझिट भरावं लागतं आणि हे डिपॉझिट १५ हजार एवढं असतं…उमेदवार कोणत्याही कॅटेगरीतला असो त्यांना सामनाच डिपॉझिट भरावं लागतं.
८. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत असणारी मतपेटी ही ‘भारताची नागरिक’ असते आणि त्या मतपेटीचं विमानाचं तिकीटही काढलं जातं.
राष्ट्रपती पदासाठी राज्याच्या संबंधित ठिकाणी मतदान होतं. देशाच्या सर्वोच्च पदासाठी झालेल्या निवडणुकांची मतपेटी म्हणजेच बॅलेट बॉक्स २४ तासांच्या आत दिल्लीला घेवून जाण्याची जबाबदारी खास अधिकाऱ्यांना देण्यात आलेली असते. त्यासाठी विमानाची २ तिकिटं काढली जातात, एक त्या अधिकाऱ्यांचं आणि दूसरं तिकीट “मिस्टर बॅलेट बॉक्सचं.
या बॉक्सचा उल्लेख सामान म्हणून नसतो तर एखाद्या व्यक्तीप्रमाणे मिस्टर बॅलेट बॉक्स असाच केला जातो. हा बॅलेट बॉक्स घेवून जात असताना त्याला खास सिटबेल्ट बांधण्याची देखील काळजी घेतली जाते. पहिल्या लाइनमध्येच मिस्टर बॅलेट बॉक्सची सीट बुक केली जाते.
या बॅलेट बॉक्सला तिकीट कसं मिळतं तर निवडणूक आयोगाने बॅलेट बॉक्ससाठी हे विशेष अधिकार १९६९ मध्येच नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मिळवले होते.
९. नववा फॅक्ट म्हणजे देशाचे नवीन राष्ट्रपती २५ जुलैलाच शपथ घेतात.
आज १८ जुलैला मतदान पार पडलं. २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आणि २५ जुलै रोजी नवीन राष्ट्रपती शपथ घेतील. पण देशाच्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैला होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
तर २५ जुलै १९७७ रोजी नीलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर १९८२ मध्ये ग्यानी झैल सिंग, १९८७ आर वेंकटरामन, १९९२ मध्ये शंकर दयाळ शर्मा, १९९७ मध्ये केआर नारायणन, २००२ मध्ये एपीजे अब्दुल कलाम, २००७ मध्ये प्रतिभा पाटील, २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी, २०१७ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अशा प्रकारे आतापर्यंत देशाच्या एकूण ९ राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली.
शेवटी याच तारखेला राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडण्याची परंपरा भारतात सुरू आहे.
१०. दहावा फॅक्ट म्हणजे देशाच्या राष्ट्रपती पद एकही दिवस रिक्त राहिलेलं नाहीये.
स्वातंत्रोत्तर भारताच्या इतिहासात असा एकही नव्हता की ज्या दिवशी राष्ट्रपती पद रिक्त असेल. ज्या दिवशी माननीय राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपतो, त्याच दिवशी दुसऱ्या नवीन निवडून आलेल्या राष्ट्रपतींचा शपथविधी होत असतो. १९५० मध्ये देशाला राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती लाभले आणि त्यानंतर सलग कोणी ना कोणी राष्ट्रपती पदावर नियुक्त होत राहिलं.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५६ नुसार, राष्ट्रपती त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी पद धारण करतात. त्यांच्या पदाची मुदत संपल्यानंतरही, त्यांचा उत्तराधिकारी येईपर्यंत ते पदावर कायम असतात. त्यामुळे राष्ट्रपती पद एकही दिवस रिक्त राहत नाहीत.
तर या आहेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतीच्या १० इंटरेस्टिंग गोष्टी.
हे ही वाच भिडू :
- इंदिरा गांधींनी स्वतःच्याच पक्षाचा उमेदवार राष्ट्रपती होऊ नये म्हणून ताकत लावली होती
- हनुमान नगर झोपडपट्टीचा मुलगा मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये गेला, पण पक्षांतर्गतच…
- राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीपेक्षा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक वेगळी असते ती अशी ..