सुपरहिट कोळीगीते देणाऱ्या ‘वेसावकार आणि मंडळी’ या ग्रुपची सुरवात कॉलेजच्या गॅदरिंगमूळेच झाली होती

शाळेच्या गॅदरिंगच्या गाण्यांचा एक ठरलेला पॅटर्न असायचा. कार्यक्रमाची सुरवात व्हायची अजय अतुलच्या मोरया गाण्यांनं. मग व्हायचा मराठी मोळं गाणं आमचं लाख मोलाचं सोनं. पण कार्यक्रमाला खरी रंगात चढायची कोळीगीतांनी.

मी हाय कोळी, वेसवची पारो, डोंगराच्या आरुन बाई चांद उगवला, ‘डोल डोलतोय वाऱ्यावरी  ह्यातला एकतारी गाणं तुमच्या शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तर नक्कीच वाजली असणार.

एवढंच काय हळदीच्या डीजेला म्हणू नका की वरातीच्या बॅन्जोला ही गाणी तुफान चालायची.

ही अजरामर गाणी दिली आहेत वर्सोवा मधल्या वेसावे कोळीवाड्यात राहणाऱ्या लोकशाहीर काशीराम चिंचय यांनी. 

आपल्या कोळीगीतांच्या माध्यमातून काशीराम चिंचय यांनी कोळी समाजाची संस्कृती भारतातच नाही तर जगभरात पसरवली. गाण्यात नावीन्य असलं तरी पारंपरिक टच या गाण्यांनी सोडला नव्हता. कोळी भाषेचा गोडवा आणि तेव्हडीच कॅची धून यामुळं ही गाणी अजरामर झालेत.

”दर्याचं तुफान कोळी रक्तात सळसळतं आणि त्यातून आपोआपच काव्यरचना होते” असं आपल्या गाण्यांबद्दल शाहीर सांगायचे.

 गाण्याची कुठली पार्श्वभूमी ना शिक्षण फक्त आवडीपोटी काशीराम चिंचय यांनी गीतं लिहण्यास सुरवात केली. अवघ्या सहावीत असताना त्यांनी पाहिलं कोळीगीत लिहलं होतं. ‘बाबा मी नवा नवा नाखवा धंदा करू तरी कवरा’ हे शाहिरांच्या लेखणीतून उतरलेलं पाहिलं गीत होतं.

 गॅदरिंगमध्ये अजुनपण गाणी वाजवल्या जाणाऱ्या वेसवकरांना ओळख ही एका गॅदरिंगनच मिळवून दिली होती. 

मुंबईच्या पार्ल्याच्या कॉलेजमध्ये तिथल्या पोरांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोळी डान्स बसवायचा होता. मात्र त्यांना मनासारखा गाणं भेटत नव्हतं. मग त्या कॉलेजचा जिएस विष्णू दांडेकर  काशीराम चिंचय या आपल्या मित्राकडे आला. या मित्रांनी मग रात जागवून कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गाणं बसवलं. मग विष्णू दांडेकर यालाच सिंगर बनवून चिंचय यांनी लिहलेलं ते गाणं कार्यक्रमात तुफान चाललं.

 त्याच बरोबर मित्रांनी आपला कोळीगीतांचा ग्रुप काढायचं ठरवलं आणि आपल्या गावच्या नावावरून ग्रुपला नाव दिलं ‘वेसावकार आणि मंडळी’.

वेसावकार आणि मंडळी आजतागायत कोळी गीतातलं सगळ्यात नवजेलला ग्रुप म्हणून ओळखला जातो.

काशीराम चिंचय यांचा सगळ्यात जास्त चालेला अल्बम होता ‘पारु गं पारु वेसावची पारु’ . या अल्बमसाठी त्यांना ‘प्लॅटिनम डिस्क’चा सन्मान ही मिळवला होता. सुदेश भोसले यांच्याबरोबर काशिनाथ चिंचय यांचा संवादांची कॅसेट हिरोंची धमाल एकेकाळी जोरदार चालली होती. 

अमेरिकेचे माजी  राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनीही शाहीर काशीराम यांच्याबरोबर कोळीगीतांवर ताल धरला होता. 

मात्र पडद्या मागच्या कलाकारांना पडद्यावरील कलाकारांच्या तुलनेत नेहमी हेळसांड होत राहीली ही शाहिरांनी बोलून दाखवलेली सल खरी ठरली. आज शाहिरांची जेवढी गाणी चालली तेवढी त्यांना ओळख मिळालीच नाही.

१३ जानेवारीला वयाच्या ७१व्या वर्षी त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. वेसावची पारू आज अनाथ झाली अशी हळहळ आज शाहीर काशीराम चिंचय यांचे लाखो चाहते व्यक्त करत आहेत.  

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.