कोकणातल्या भराडीदेवीच्या जत्रेची तारीख ना कुठल्या पंचागात सापडते ना कॅलेंडरमध्ये

गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांबरोबरच अजून एकदा मुंबई पुण्यात राहणारा कोकणातला चाकरमानी गावी जाण्यासाठी आतुरलेला असतोय ते म्हणजे गावची जत्रा. आधी लाल डब्यानं आणि मग कोकण रेल्वे आल्यापासून रेल्वेनं चाकरमान्यांचे जथेच्या जथ्थे गावाकडं धडकतात. मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या जत्रांना लाखोंच्या संख्येने लोक गर्दी करतात.

अशीच एक प्रसिदध जत्रा आहे आंगणेवाडीची. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणपासून अगदी १५ किलोमीटरच्या अंतरावर हे यात्रा भरते. मालवण तालुक्यातील मसूर या गावातील आंगणेवाडीत  भराडीदेवीचा उत्सव भरतो .

बाकीच्या जत्रांची तारीख, वार ,महीना ठरलेला असतोय मात्र आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यात्रेची तारीख मात्र अशी फिक्स नसते.

हि तारीख ठरवण्यामागे परंपरेनं चालत आलेली एक इंटरेस्टिंग पद्धत आहे.

कशी ठरवली जाते आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रेची तारीख?

जरवर्षी देवीचा कौल घेऊन यात्रा ठरवली जाते. यात देवीचे मानकरी असणारे आंगणे घऱ्याण्याचे लोक यात्रेची तारीख ठरवण्यासाठी कौल मागतात. दिवाळीत भातशेतीची कामं झाली की आंगणे कुटुंबीय एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. यालाच डाळप स्वारी असं म्हणतात . या बैठकीमध्ये डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवला जातो . गावकरी मग जंगलात घुसतात आणि रानडुकरची शिकार करतात. मग डुकराची शिकार वाजतगाजत गावातून फिरवली जाते. आता होते दुसरी ‘डाळप स्वारी’ जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी . यावेळी मग कौल लावून जत्रेचा दिवस ठरवला जातो .

जत्रेचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आता मोबाइलमुळं नाहीसं झालंय ते म्हणजे जत्रेची तारीख चाकरमान्यांपर्यंत पोचवायची पद्धत.

जत्रेची तारीख कळवणं हा अनुभव फक्त या यात्रेतच पहायला मिळतो. जुन्या काळात एसटीवर, रिक्षावर, सुमोवर, ग्रामपंचायतीच्या फळ्यावर खडूनं तारीख लिहली जायची. मग मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांना जत्रेची तारीख कळायची. आता मात्र नुसता व्हाट्सअपवर स्टेटस टाकायचा आणि मग मिनटातंच बातमी पसरतेय.  जुन्या काळात दिवाळीनंतर येणाऱ्या गाडयांची वाट पाहायची.  एकदा का खडूनं लिहलेली तारीख दिसली कि लगेच गाडीत सीट बुक करायची. मात्र मोबाईल आल्यापासून आता या गोष्टी नुसता नॉस्टॅल्जियाच बनून राहिल्यात.  

भराडी देवीच्या मंदिराच्या या देवीच्या उगमाविषयी अनेक सुरस कथा सांगण्यात येतात .

त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. आंगणेवाडीतील एक व्यक्ती चिमाजी आप्पांच्या सेवेत गुप्तहेर होता. या गुप्तहेराच्या स्वराज्यसाठी केलेल्या सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी प्रसन्न झाली व देवी आंगणेवाडीच्या एका भराडावर प्रकट झालीय अस स्वप्न या गुप्तहेराला पडलं . मग त्यानं आपली दुभती गाय ज्या ठिकाणी पान्हा सोडते तिथं लक्ष ठेवलं. गाई जवळच असलेल्या एका  पाषाणावर आपल्या दुधाचा अभिषेक करायची . याच पाषाणाची शुद्धता करून स्वराज्याच्या हेरानं प्राणप्रतिष्ठापना केली. 

भराडीदेवीच्या मंदिराच्या देखभालीसाठी चिमाजी आप्पांनी दोन हजार एकर भरड आणि शेतजमीन इनाम म्ह्णून दिली होती. 

आज आंगणे लोकांच्या वहिवाटीखाली ही जमीन आहे.

आज जत्रेचं रूप इतर यात्रांसारखंच पालटलंय. मात्र तरीही  लोकांनी आपल्या सोयीसाठी यात्रेची तारीख फिक्स केली नाहीए. जरवर्षी ऐनवेळी तारीख जाहीर झाल्यामुळं होणाऱ्या गडबडीची कोकणी माणूस कधीच तक्रार करत नाही. तारीख जाहीर झाली रे झाली याची लगबग सुरु. मग बॉस ने सुट्टी दिली तर सुट्टी घेऊन नाहीतर डायरेक्ट बॉसला फाट्यावर मारत चालला हा आंगणेवाडीच्या भराडीआईच्या जत्रेला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.