प्रतिभा सिंगना बाजूला सारून सुक्खू मुख्यमंत्री झाले पण दोन घराण्यातला राडा जुनाय
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ४० जागा जिंकून मैदान जिंकलं, पण त्यानंतर काँग्रेसच्या अंतर्गत लढाईला सुरुवात झाली होती. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांची पत्नी प्रतिभा सिंग आणि सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री कोण होणार यावर खलबतं चालू होती.
काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाची निवड केलीय,या माहितीमुळे सुक्खू यांचे समर्थक जल्लोष साजरा करत आहेत, तर प्रतिभा सिंग यांचे समर्थक नाराज आहेत.
हिमाचलमध्ये काँग्रेसच्या या दोन गटांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनानंतर सुखविंदर सिंह सुक्खू यांचं पारडं जड ठरलं, पण यामागे दोन घराण्यातला वाद आजचा नाही तर ९ वर्ष जुना आहे.
हा वाद समजून घेण्यासाठी आधी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचं राजकारण समजून घ्यावं लागेल.
९ वेळा विधानसभा, ५ वेळा लोकसभा आणि तब्बल ६ वेळा मुख्यमंत्री असं रेकॉर्ड असणारे राजकीय नेते वीरभद्र सिंह हे हिमाचल कॉंग्रेसमध्ये मोठं नाव होतं. वर सांगितल्याप्रमाणे ते अनेक वेळा विधानसभेचे आमदार होते. त्यांच्या राजकीय अनुभवाचा अंदाज त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरून बांधता येतो.
त्यांचे वडील राजा पद्मसिंह हे बुशर रियासतचे राजा होते.
वीरभद्र सिंह यांचा जन्म २३ जून १९३४ रोजी राजघराण्यात झाला होता.
हिमाचल प्रदेशात राजा साहेब म्हणून ओळखले जाणारे वीरभद्र सिंह १९६२ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. यानंतर १९६७, १९७१, १९८० आणि २००९ मध्ये ते खासदार म्हणून निवडले गेले. ते इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात १९७६-७७ मध्ये पर्यटन व नागरी उड्डाण मंत्री झाले. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात २००९ मध्ये त्यांना स्टील मंत्री बनविण्यात आले. २०११ मध्ये त्यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचं मंत्री केलं गेलं.
१९८३ मध्ये ते प्रथमच मुख्यमंत्री झाले आणि १९९० पर्यंत सलग दोन वेळा या पदावर राहिले. यानंतर १९९३ ते १९९८, २००३ ते २००७ आणि २०१२ ते २०१७ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
इथपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण २०१३ मध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाची ठिणगी पडली.
झालं असं की २०१२ मध्ये हिमाचलच्या नदौन सीटवरून दोनदा आमदार राहिलेल्या सुखविंदर सिंह सुक्खू यांचा २०१२ च्या विधानसभेत पराभव झाला होता. तेव्हा काँग्रेसने सुक्खू यांना हिमाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. सुक्खू प्रदेशाध्यक्ष झाले पण त्यांचं कोणाशी वैर नव्हतं.
परंतु प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर सुक्खू यांनी थेट हिमाचल काँग्रेसचे मातब्बर नेते असणाऱ्या वीरभद्र सिंग यांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली. त्यांनी काँग्रेसच्या सर्व कार्यकारिणीत बदल केला आणि वीरभद्र सिंग यांच्या समर्थकांना महत्वाच्या पदांवरून काढून टाकलं. सुक्खू यांच्या या निर्णयामुळे वीरभद्र सिंग चांगलेच तापले आणि वादाची ठीणगी पडली.
सुक्खू यांच्यामुळे वीरभद्र सिंग इतके नाराज झाले की, २०१७ मध्ये निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार दिला. मात्र पक्षात त्यांचाच वट असल्यामुळे काँग्रेसने २०१७ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याच नावाची घोषणा केली.
काँग्रेसने वीरभद्र सिंग यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पण हिमाचलच्या प्रथेप्रमाणे सत्ता बदलली.
कारण दोघांच्या मधात असलेल्या अंतर्गत कलहामुळे दोन्ही गट एका व्यासपीठावर येत नव्हते. पक्षाकडून प्रयत्न केल्यानंतर देखील गटबाजी थांबली नाही आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली.
त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील हाच मुद्दा उगाळून निघाला होता. २०१९ मध्ये सुक्खू यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या सुक्खू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत कोणताच प्रचार न करता घरी बसले होते, असं सांगितलं जातं.
२०२१ मध्ये वीरभद्र सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसने गेल्या ६ महिन्यांपूर्वी प्रतिभा सिंग यांना प्रदेशाध्यक्ष केलं होतं. त्यांच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसच्या जागा निवडून आल्या परंतु त्यानंतर सुद्धा ही गटबाजी सुरूच आहे. वीरभद्र सिंग यांच्यानंतर सुक्खू यांनी काँग्रेसमध्ये स्वतःचं चांगलंच वजन वाढवलं आहे.
काँग्रेसच्या एकूण ४० आमदारांपैकी २५ आमदारांचं सुक्खू यांनाच समर्थन आहे. याच बळावर हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसने सुक्खू यांची निवड केलीय. तर प्रतिभा सिंह यांचे समर्थक असलेल्या मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केलीय.
अखेर ९ वर्षांपूर्वी सुरुवात केलेल्या सुक्खू यांनी हिमाचल काँग्रेसवर नियंत्रण मिळवलंय असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाच भिडू
- कधीकाळी संपल्याची चर्चा होती, तेच विनोद तावडे हिमाचल प्रदेशचे किंगमेकर ठरु शकतात…
- हिमाचलमध्ये काँग्रेसची हवा नाही, मुख्यमंत्र्यांच्या मते भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय
- इंदिरा सरकार ते मनमोहन सिंग सरकारपर्यंत मंत्री असलेले नेते एका CD मुळे वादात अडकले होते.