बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा डेब्यु करीमलाला मुळेच झाला.

‘गंदा है, पर धंधा है’

हे ड्रग्जच्या बाबतीत नेहमीच म्हंटल जातं. हल्ली हल्ली म्हणजे सुशांतसिंग राजपूत पासून ते आर्यन खान प्रकरणापर्यंत ड्रग्जने हायतोबा भसड माजवली आहे. पण ड्रग्जची सुरुवात कुठून तरी झालीच असेल ना ? त्यात आणि ड्रग्जचं अन बॉलिवूडचं कनेक्शन कसं सुरू झालं असेल ?

तर ती सुरवात झाली मुंबईतूनच. जेव्हापासून अंडरवर्ल्ड सक्रिय आहे तेव्हापासून मुंबई आणि अख्या देशाला ड्रग्जचा विळखा पडलाय. आणि जगजाहीर आहे ते बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डच नातं. पण सुरुवात आधी बघू.

खरं तर या गोष्टीची सुरुवात करीमलाला, हाजी मस्तान या गुंडांच्या उदयापासून सुरू झाली. ज्यात नंतर दाऊद इब्राहिमपासून छोटा राजनपर्यंत आणखी अनेक डॉन्सची नावं ऍड झाली. अंडरवर्ल्ड, बॉलीवूड आणि ड्रग्ज यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी, आपल्याला तीस किंवा मग फारतर फार चाळीसच्या दशकापर्यंत मागे जावं लागेल.

याची सुरुवात करीम कालापासून झाली असच म्हणावं लागेल. करीम लाला त्याच्या कपड्यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी त्याच्या एका मामाच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानातून मुंबईला आला.

मुंबईत कपड्यांचा व्यवसाय करत असताना करीम लालाची ओळख झुम्मा खान घासवाला नावाच्या व्यक्तीशी झाली. ओळखीचं रूपांतर पुढं मैत्रीत झालं. त्यात आणि झुम्मा घासवालाही करीमलासारखाच पठाण होता. पण झुम्मा घासवालाची अजून एक ओळख होती. ती ओळख म्हणजे तो आणि त्याचा मुलगा त्यावेळीचे मुंबईतले सर्वात मोठे ड्रग्जसचे डीलर होते.

करीम लालाच्या कपड्याच्या व्यवसायामुळे त्याच्या मुंबई आणि आसपासच्या भागात बऱ्याच ओळखी बनल्या होत्या. सिनेजगतात ही त्याच्या बऱ्याच ओळखी होत्या. त्याच्या ओळखीचा फायदा घेऊन आपला ड्रग्जचा कारभार वाढवायचा विचार घासवला बाप बेट्याच्या डोक्यात आला. आपल्या गोड बोलण्यानं करीम लालाला ही त्यांनी या व्यवसायात भागीदार बनवले.

पुढं करीम लालाला जसं का या धंद्याच गमक सापडलं, त्याने पुढं काही महिन्यांनंतरच, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यातून लालाला प्रचंड पैसा मिळू लागला. मिळालेल्या पैशाने लेमिंग्टन रोडवर त्याने एक गेस्ट हाऊस खरेदी केले. या गेस्ट हाऊसमध्ये बसून करीमलाला केवळ ड्रग्जचाच नाही तर मटक्याचाही व्यवसाय करु लागला. आणि तुफान पैसे कमवू लागला. करीम लालाच्या धंद्यासारखा धंदा करून श्रीमंत व्हायची स्वप्न नुसतंच मिसुरड फुटलेली पोरं बघू लागली. त्यात एक होता हाजी मस्तान.

करीम लाला नंतर ड्रग्जच्या धंद्यात पुढं आला हाजी मस्तान. मस्तान ही तितकाच मोठा तस्कर बनला. पण मस्तानच्या काळात ड्रग्जचा इतका उत नव्हता आला जो दाऊदच्या काळात आला. दाऊद कसा डॉन बनला ते तुम्हाला पिक्चर, स्टोऱ्या वाचून ऐकून बघून माहीतच असेल.

दाऊदने मात्र सगळ्यांच्या काकणभर पुढे जात, ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला.  त्यासाठी त्याने आपल्या चेल्यांचा बखुबी वापर केला. दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज व्यवसायाबद्दल माहिती असलेले लोक सांगतात की,

त्याने ड्रग व्यवसायात कोट्यवधी रुपये कमावले ते फक्त तीन लोकांमुळे आणि या तिघांची नावे खालिद पेहेलवान, मावद खान आणि विकी गोस्वामी आहेत.

मुंबई पोलिस दलातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते,

दाऊदचे ड्रग्स नेटवर्क आशिया आणि आफ्रिकेत पसरलेले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भारत, बांगलादेश, थायलंड आणि लाओसमध्ये हे ड्रग्ज तयार केले जातात. साठवली जातात. दुबईला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका येथून समुद्री मार्गाने नेले जाते. दुबई हा फक्त एक ट्रान्झिस्ट पॉईंट आहे आणि कडक कायद्यांमुळे तिथे ड्रग्जचं सेवन केल जात नाही. दुबईहून ड्रग्ज केनिया, टांझानिया, मोझांबिक, नायजेरियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये पाठवली जातात.

दाऊदचं बॉलिवूडशी असलेलं नातं हे सर्वश्रुत आहे. मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये त्याची ऊठबस वाढली. सिनेतारक आणि तारकांची मांदियाळी त्याच्या अवतीभवती वाढली.

दाऊद प्रमाणेच त्याचे चेले बॉलिवूडच्या नट्यांना पटवण्याची संधी शोधू लागले. यात मग ड्रग्जचा तस्कर छोटा राजन असेल अबू सालेम, विक्की गोस्वामी असतील, यांच्या बॉलिवूड पार्ट्यांमधल्या सहज वावरामुळे, ड्रग्ज ही सहज मिळू लागले. आणि मग इथूनच सुरू झालं बॉलिवूड आणि ड्रग्जच कनेक्शन.

मध्यंतरी अभिनेत्री किम शर्माचा पती अली पंजानी याचंही ड्रग रॅकेटमध्ये नाव आलं होत. 

सप्टेंबर २०१९ मध्ये यूएस ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीने उघड केलेल्या रिपोर्ट मध्ये मोठ्या ड्रग रॅकेटच्या तस्करीमध्ये, बॉलिवूड कनेक्शन असलेल्या अली पणजानीच्या ड्रग कंपनीचा रॅकेटशी संबंध असल्याचे उघड झाले होते. त्याचा संबंध अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमशी सुद्धा होता, असं त्या रिपोर्टमध्ये म्हंटल गेलं आहे.

अली पंजानीच्या या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मॅन्ड्रॅक्स आणि इफेड्रिन सारखी औषधे तयार केली जात होती. यात बॉलिवूडच्या अजून एका हिरोईनच्या पतीचा सहभाग असल्याचं उघड झालं. त्याच विक्की गोस्वामी. अली पंजानी आणि विक्की गोस्वामी या दोघांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर केनियामधून ड्रग्जची तस्करी केल्याचा आरोप होता.

  • अशाप्रकारे दाऊदमुळेच बॉलिवूड आणि ड्रग्जचा संबंध आला. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.