ज्याचा एन्काऊंटर करायचा होता तोच अंडासेल मध्ये आंग्रेंसोबत मुक्कामाला होता.

महाराष्ट्र पोलीस आणि त्यांनी केलेले एन्काऊंटर हे जितके वादाच्या भोवऱ्यात सापडले जातात तितकेच एन्काऊंटर करणारे अधिकारी जनसामान्यात लोकप्रिय होत जातात. एन्काऊंटर स्पेशालिस्ट हि पदवी ऐकताच भले भले गुन्हेगार अशा अधिकाऱ्यांना वचकून असत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट या नावाने रुजू झालेला अधिकारी ज्या भागात कार्यरत असे तेव्हा तेथील गुन्हेगारीला आपोआप आळा बसत असे. या अधिकाऱ्यांना गुन्हेगार लोकं येडी खोपडीका म्हणत असत.

न्यायालयीन किंवा जेलच्या वाऱ्या न घडवता थेट गोळ्या घालून विषय संपवणे अशी मुंबईतल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्यांची ओळख होती.

प्रदीप शर्मा,विजय साळसकर, सचिन वाझे, रवींद्रनाथ आंग्रे, दया नायक अशी मजबूत फळी महाराष्ट्र पोलिसांकडे होती.

टोळीयुद्ध ,चकमकी अशा ठिकाणी या लोकांनी महत्वाची कामगिरी बजावली. या नावांची धास्ती मुंबई अंडरवर्ल्डने जास्तच घेतली होती. गुन्हेगारांनी मुंबईतल्या विविध भागात माजवलेली दहशत या अधिकाऱ्यांनी आटोक्यात आणून गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त केला.

या अशा एन्काऊंटर स्पेशालिस्ट लोकांपैकी रवींद्रनाथ आंग्रे यांच्याबरोबर झालेला एक जबराट  किस्सा आपण जाणून घेऊया.

रवींद्रनाथ आंग्रे यांच्या नावानेच गुन्हेगार चळाचळा कापायचे, याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ५४ कुख्यात गुंडांचा खात्मा केला होता. त्यातले ३३ कुख्यात गुन्हेगार हे मुंबईतले होते तर २१ जण ठाण्यातले होते.

त्यांच्या एकूण पोलीस कारकिर्दीत त्यांची ठळक  ओळख ठरली ती म्हणजे त्यांनी सगळीच्या सगळी मंचेकर टोळीच देशोधडीला लावली. सुरेश मंचेकर या कुख्यात गुंडाळा गोळ्या घालून त्याची सगळी टोळी संपवली आणि या टोळीकडे असलेला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा शस्त्रसाठा जप्त करणे. १९९८ सालच्या या शस्र जप्तीमध्ये एकूण ११ एके-६६ रायफल्स , २००० हुन अधिक दारुगोळा आणि सुमारे २०० ग्रेनेड असा सगळं साठा होता.

मंचेकरला यमसदनी पाठवून त्यांच्या नावाचा उदो उदो झाला मात्र त्याहीपेक्षा त्यांच्या नावाला मोठा बट्टा लागला. गणेश वाघ या ठाण्याच्या उद्योजकाने रवींद्रनाथ आंग्रे यांच्यावर खंडणी आणि मालमत्ता बळकावल्याचा आरोप केला. या आरोपाखाली आंग्रे याना २२ फेब्रुवारी २००८ रोजी अटक करण्यात आली. त्यांना १४ महिन्यांची शिक्षा झाली पण पुढे आरोपात तथ्य नसल्याने २००९ साली त्यांची या केसमधून सुटका झाली.

ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात कुख्यात गुन्हेगारांसाठी असलेल्या अंडा सेलमध्ये आंग्रेना टाकलं. स्वतःच्या नशिबावर त्यांना हसू आलं. अंडा सेलमध्ये त्यांना अजून एक धक्का बसला. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या हिटलिस्टवर असलेला साजिद चिकना त्यांच्या सोबत अंडा सेलमध्ये शिक्षा भोगायला होता. आंग्रेंना बघून साजिद चिकना खुश झाला आणि तो त्यांना म्हणाला,

क्या साब पहचाना क्या ? तुम्हाला मला चकमकीत मारायचं होत ?

आंग्रेंची गोळी एकदा त्याच्या पार जवळून गेलेली आणि तो आंग्रेंच्या हातून वाचला होता त्याची आठवण साजिद चिकणाने त्यांना करून दिली.

साजिद चिकना हा जबरी गुन्हेगार होता, अर्धा डझन केसेस त्याच्या नावावर होत्या. शरीराने तो दणकट आणि बलदंड होता, तर त्याच्या तुलनेत आंग्रे सडपातळ आणि उतरत्या पन्नाशीत होते. चिकनाने उघड केलेल्या गोष्टींनी आंग्रे इतके विचलित झाले कि फास बसण्याच्या किंवा दुसऱ्या कुठल्यातरी रीतीने या जेलमध्ये मृत्यू येईल या भीतीने त्यांना रात्रभर झोपच लागली नाही. 

ज्यांच्यासोबत आपलं दीर्घकाळ वैर आहे त्याच्याचबरोबर आपल्याला राहायचं आहे या विचाराने ते हैराण झाले. त्याच्याकडून मारले जाण्याच्या भीतीने आणि मानसिक ताणाने त्यांची झोप आणि मानसिक शांती हिरावून घेतली. पोलीस आणि गुन्हेगार एकाच ठिकाणी राहूच कसे शकतात यामुळे ते फार अस्वस्थ झाले.

येनकेन प्रकारे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून ९ मे २००९ ला त्यांनी जमीन मिळवला आणि त्या अंडा सेलमधून ते कायमचे बाहेर आले. पण साजिद चिकना सोबत काढलेले दिवस किती धास्तीचे होते आणि मनस्ताप करणारे होते हे त्यांना चांगलंच जाणवलं.

ज्याला गोळी घालायची होती त्यानीच रवींद्रनाथ आंग्रेंची झोप उडवली होती.

पुढे नक्षलवाद्यांच्या बंडखोरीमुळे गडचिरोली भागात त्यांची कंट्रोल रूमवर नेमणूक करण्यात आली. नोव्हेम्बर २०१८ मध्ये त्यांनी औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.