दुष्काळग्रस्त भागात हा शेतकरी कमावतोय वर्षाला १ कोटीहून अधिक नफा.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जितकी चर्चा आपण आत्महत्येच्या विषयावर करतो तितकीच चर्चा आपण यशस्वी शेतकऱ्याबद्दल पण करायला हवी. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शिक्षण घेऊन मॉडर्न शेती करतात आणि वर्षाकाठी चांगली कमाई करतात. अशाच एका शेतकऱ्याबद्दल जाणून घेऊ ज्याने दुष्काळग्रस्त भागात शेती करून इतर शेतकऱ्यांपुढे नवीन आदर्श मांडला आहे.

धनंजय राऊत या लातूरच्या युवा शेतकऱ्याने आजवर वाडवडील करत आलेली पारंपरिक शेती न करता आधुनिकतेची जोड देऊन त्यातून चांगलं उत्पन्न घेतले. आधुनिक पद्धतीने शेती  करण्यासाठी त्यांनी कृषी विभागातून पॉलिहाऊस फार्मिंगबद्दल प्रशिक्षणही घेतले.

पारंपरिक शेतीकडे न जाता आधुनिक शेती आणि त्यातही वेगळी पिकं घेऊन शेती करण्याची आयडिया कशी सुचली यावर बोल भिडूशी बोलताना धनंजय राऊत सांगतात कि,

लातूर हा आधीच दुष्काळग्रस्त भाग आहे, पाण्याची पुरेशी सोय नाही त्यामुळे मला हायटेक शेतीची कल्पना सुचली आणि त्यातून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो अशी इच्छाशक्ती निर्माण झाली. सुरवातीला चंदन शेती  करण्याच्या विचारात ते होते पण त्याबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून काही करता येत नव्हतं.

कृषी विभागातून पॉलिहाऊस फार्मिंगचं शिक्षण घेत असताना मला एक केरळचा मित्र रूममेट म्हणून लाभला. त्याच्यासोबत माझी चांगली मैत्री झाली ,त्याकाळात आम्ही पूर्णवेळ शेती आणि त्याच्याशी निगडित बारीकसारीक गोष्टींवर चर्चा करत असू. एकदा त्या रूममेटने मला चंदन लागवड करण्याचा सल्ला दिला. त्याचे फायदे सांगितले. उत्पन्न कसं घ्यावं , कुठे विकावं अशी बरीच माहिती दिली.

पण मित्राचं बोलणं मी सिरियसली घेतलं नाही. आणखी एका प्रशिक्षणासाठी मी लखनऊला गेलो. जिथं प्रशिक्षण असेल तिथं मी प्रत्येकाला विचारायचो कि दुष्काळग्रस्त भागात कोणतं पीक घ्यायला हवं ? त्यावर बऱ्याच लोकांचं उत्तर हे चंदनाची शेती असायचं. मग मात्र हि बाब मी गंभीरतेने घायला लागलो.

पुढे त्यांनी त्यांच्या त्या केरळी रूममेटचा सल्ला घेतला आणि त्या मित्राच्या गावी गेले. केरळमधल्या त्रिशूर भागात त्यांच्या मित्राचं गाव होतं आणि त्याचे वडील वन अधिकारी होते. तिथे त्यांनी धनंजय राऊत याना बरीच वेगवेगळ्या प्रकारची चंदनाची झाडे दाखवली. त्यांच्या ऑफिसबाहेर एक चंदनाचे झाड होते धनंजय यांनी मित्राच्या वडिलांना सहज विचारलं कि या झाडाची किंमत किती आहे यावर दीड कोटी उत्तर ऐकून त्यांना धक्काच बसला.

केरळी मित्राच्या सल्ल्यावरून धनंजय राऊत लातुरात आले आणि त्यांनी एक एकर जमिनीमध्ये २०० चंदनाच्या झाडांची लागवड केली. लागवड करून झाल्यानंतर त्यांनी वेळोवेळी कृषी विभागातून आणि या प्रकारची शेती करणाऱ्या लोकांचं मार्गदर्शन घेतलं.

धनंजय राऊत सांगतात कि, ज्यावेळी माझ्या परिसरातल्या कृषी विभागाला कळलं कि हा शेतकरी शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करत आहे तेव्हा त्यांनी याची माहिती इतर शेतकऱ्यांनाही दिली. तेव्हा शेतकऱ्यांनी माझ्याकडे रोपाची मागणी केली. त्यावेळी मी चंदनाची शेती करण्याबरोबरच चंदनाचं रोपही तयार करत होतो. हळूहळू जेव्हा या चंदनाच्या रोपांची मागणी वाढू लागली तेव्हा मी १० एकर शेतात ३००० चंदनाच्या झाडांची लागवड केली. वर्षाकाठी त्याची त्यांची ६लाख रोपे तयार होतात.

१-२ वर्षाचे झाड १० रुपयात तर ४-५ वर्षाचे झाड ४०-५० रुपयात विकले जाते असं ते सांगतात.सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून चांगलं पीक घेता येतं. केवळ चंदनाच्या शेतीवर अवलंबून न राहता त्यात दुसऱ्याही रोपाची लागवड करावी.जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर चंदनाचं उत्पादन घ्यावं असं ते आवर्जून सांगतात.

चंदनाच झाड तोडण्यास मज्जाव आहे तर सरकार याबाबत काही विचारपूस करत का, यावर त्यांनी सांगितलं कि चंदनाची शेती करताना सरकारकडून आपल्याला एक एनओसी दाखला मिळवावा लागतो जो सहज मिळतो आणि आपण शेती करून झाड तोडतोय, यात गैरमार्गाचा संबंध येत नाही . त्यामुळे भीती बाळगायचं काम नाही.

काळया हळदीच्या शेतीकडे कस वळलात यावर ते सांगतात कि, हिमाचल प्रदेशात प्रशिक्षणादरम्यान बऱ्याच शेतात मला काळया हळदीची लागवड दिसून आली. हे बघून मी स्वतःच्या शेतात ८-१० हळदीची झाडे लावली. जसजशी मागणी वाढू लागली तेव्हा मग मी एका एकरमध्ये काली हळद लावली. ज्यावेळी विक्री करत होतो तेव्हा १०००रु किलो प्रमाणे काळी हळद विकली जात होती परंतु मागणी वाढल्यावर मी १५०० रु किलो प्रमाणे विकली आणि सध्यातरी ५०००रु किलो दराने विकत आहे.

चंदन आणि काळी हळद हि दोन पिकं अशी आहेत कि व्यवस्थित काळजी घेतली तर ती तुम्हाला दुप्पट कामे कमाई करून देते. त्यांच्या शेतातील चंदन आणि काळी हळद हि भारतभरात जवळपास चौदा राज्यात वितरित होते.

फक्त चंदन या पिकापासून त्यांना वर्षाला १ करोडपेक्षाही अधिक रुपयांची कमाई होते. एका हंगामात काळी हळद विकून दहा लाख रुपयांची कमाई होते. बराच नफा शेती क्षेत्रात आहे त्यामुळे तरुण वर्गाने जरूर आधुनिक शेती करून जास्तीत जास्त कमाई करावी असंही त्यांनी बोल भिडूशी बोलताना सांगताना.

अंकुर हायटेक नर्सरी असं त्यांच्या नर्सरीचं नाव असून त्यात ते नवनवीन प्रयोग सातत्याने करत असतात. मेहनत आणि योग्य प्रशिक्षण , मार्गदर्शन यांच्या बळावर आपण इथपर्यंत पोहचलो असं धनंजय राऊत म्हणतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.