लावणीसम्राज्ञीची इमेज मोडून सशक्त अभिनयात देखील आपलं नाव कमवणं फक्त त्यांनाच जमलं

सुरेखा कुडची हे नाव गेल्या दोन दशकाहून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. अगदी छोट्या पडद्यावरचे प्रेक्षक ते लावणीच्या बैठकीतले प्रेक्षक अशा सगळ्या क्षेत्रात सुरेखा कुडची यांचे चाहते आहेत. आज आपण सुरेखा कुडची यांच्याबद्दल जरा जाणून घेऊ.

सुरेखा कुडची या ९०च्या दशकापासून मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि लावणी क्षेत्रात करत आहेत. सध्याच्या काळात त्या आपल्याला जरी छोट्या पडद्यावर जास्त दिसत असल्या तरी एक काळ असा होता कि त्यांच्या चित्रपटाला लोकं गर्दी करायचे. ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये त्यांचं विशेष कौतुक आहे.

बापू बिरू वाटेगावकर या चित्रपटातील त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्या पात्रावर येणारी संकटं बघून थिएटरमध्ये बायका रडायच्या इतका सशक्त अभिनय पाहायला मिळणे विरळच.

त्यांचा खरा चाहता वर्ग त्यांना ज्यावेळी कृणाल कॅसेट कंपनीच्या लावणीच्या व्हिडिओ होत्या तेव्हापासून ओळखतो.  बाई मी लाडाची कैरी पाडाची,घोळत घोळ,भाजीवाली सखू ,घ्या हो तांबडा रस्सा यांसारख्या बऱ्याच लावण्या आणि कोळीगीते त्यांनी सादर केली.

त्यांच्या लावणीचा प्रेक्षक महाराष्ट्रात सगळीकडेच आहे. लावणी सादर करताना त्यांच्या अदाकारीवर मराठी रसिक कौतुकाचा वर्षाव करतो. सुरेखा कुडची यांनी सांगितलेला एका लावणी रसिकांचा हा किस्सा-

सुरेखा कुडची यांच्या लावण्यांची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती आणि त्यांच्या लावण्यांना सभागृह तुडुंब भरलेले असायचे, टाळ्या, शिट्ट्यांनी सगळं वातावरण दणाणून गेलेलं असायचं. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा लावण्यांच्या कार्यक्रमाचा खूप वेळा दौरा असायचा. तेव्हा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तासगावचा एक चाहता हजर असायचा.

पहिल्या रांगेतल्या अगदी समोरच्या खुर्चीवर तो चाहता बसलेला असायचा. महिन्यातल्या सुरेखा कुडचींच्या प्रत्येक लावणीला तो पहिल्या रांगेत हजर असायचा. आणि या चाहत्याची सुरेखा कुडची यांना इतकी सवय झाली होती कि तो चाहता थोडाजरी उशिरा कार्यक्रमाला पोहचला तरी त्यांना लावणी सादर करताना चुकल्यासारखं वाटायचं. कार्यक्रम संपल्यानंतर तो सुरेखा कुडचिंसाठी द्राक्षाचा बॉक्स घेऊन यायचा.

त्याचा काहीच हट्ट नसायचा कि मला भेटू द्या वगैरे पण तो फक्त एवढंच म्हणायचं कि हा द्राक्षांचा बॉक्स त्यांच्यापर्यंत पोहचवा.

प्रत्येक शोला त्याचं तेच रुटीन असायचं. एक दिवस उत्सुकतेपोटी सुरेखा कुडची त्याला भेटल्या त्याची विचारपूस केली आणि द्राक्षांबद्दल विचारलं तर तो म्हणाला कि तुम्ही आमचं इतकं मनोरंजन करतात त्यापुढं हे द्राक्ष म्हणजे किरकोळ आहे. अशा प्रकारचे त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते होते.

मराठी चित्रपटाच्या इतिहासात सगळ्यात जास्त लावणी सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

तांदळा चित्रपटातील साकारलेली लक्ष्मी बऱ्याच सिनेरसिकांना चांगलीच आठवत असेल ती भूमिका सुरेखा कुडची अक्षरशः जगल्या असाव्या इतकी हुबेहूब त्यांनी साकारली होती.

गोल गोल चामड्याला दांडकं हे घासतय , बघ बघ अग सखे कसं गुबू गुबू वाजतंय

हे गाणं हे लोकगीत जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना पाठ आहे. हे गाणं ज्यावेळी व्हिडिओ स्वरूपात प्रदर्शित झालं तेव्हा ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुरेखा कुडची यांच्यावर चित्रित झालं होतं. त्यावेळी या जोडीने तुफान लोकप्रियता मिळवून कॅसेटचा विक्रमी खप केला होता.

त्यांच्या चित्रपटातल्या बऱ्याच भूमिका लोकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या त्यापैकी फॉरेनची पाटलीण, तीन बायका फजिती ऐका, मास्तर एके मास्तर, पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर, भरत आला परत अशा अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. देवयानी मालिकेतील त्यांची भूमिका लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

त्यांनी नाटकातही बरंच कामी केलं त्यातील त्यांची गाजलेली नाटकं- भरत आला परत, अप्पाजींचा सेक्रेटरी, नवरा म्हणू नये आपला, बाईचं ऐका घडीभर पैका.

ग्रामीण भागातली सशक्त स्त्री पात्राची भूमिका त्यांच्या ठसकेबाज आवाजाने आणि शैलीने त्यांनी अजरामर करून ठेवली आहे. त्यांच्या पात्रांनी बऱ्याच मराठी म्हणीही मराठी चित्रपटाला दिल्या. अगदी ग्रामीण भागातील आयाबायांना आपलासा वाटणारा चेहरा म्हणजे सुरेखा कुडची.

हे हि वाच भिडू

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.